नंददास : (सु. १५३३—सु. १५८६). अष्टछाप कवींतील एक प्रसिद्ध हिंदी संतकवी. अष्टछाप कवींमध्ये सूरदासां नंतर उत्कृष्ट कवी म्हणून नंददासांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म, मृत्यू किंवा एकंदर जीवन याबद्दलची निश्चित माहिती उपलब्ध नाही. तुलसीदासांचे ते चुंलतबंधू व गुरुबंधू असावेत, असे अनुमान आहे. उत्तरप्रदेशातील एटा जिल्ह्यातील रामपूर गावी त्यांचा जन्म झाला असावा, असे अभ्यासक मानतात. नंददास प्रारंभी स्त्रीलंपट होते आणि नंतर त्यांची विषयासक्ती कृष्णभक्तीत परिणत झाली, अशी आख्यायिका आहे.
त्यांच्या नावावर २०-२१ ग्रंथ सांगितले जातात. त्यांपैकी नंददासांचे मोठेपण रासपंचाध्यायी व भँवरगीत या दोन ग्रंथांमुळे मानले जाते. रासपंचाध्यायीमध्ये श्रीमद्भागवताच्या दशम स्कंधामधील रासासंबंधीच्या पाच अध्यायांची कथा अत्यंत ललितमधूर पदावलीमध्ये सांगितली आहे. या ग्रंथातील लालित्यामुळे नंददासांची गीतगोविंदकार जयदेवाशी तुलना केली जाते. यात कृष्ण व गोपी यांच्यातील कांताप्रेम त्यांनी भक्तीच्या उंचीवर नेऊन चित्रित केले आहे. सिद्धांत-पंचाध्यायी या ग्रंथात रास आणि कांताप्रेम यांचे अध्यात्मदृष्ट्या महत्त्व सांगितले आहे. भँवरगीतमध्ये उद्धव-गोपी यांच्या संवादाचा प्रसंग अनेक पदांत त्यांनी मांडला आहे. मात्र सूरदासांच्या भ्रमरगीताइतकी रसात्मकता यात आढळत नाही व याचे कारण नंददासांच्या गोपी तर्क, विचार, बुद्धिवाद करून कृष्णप्रेमाचे महत्त्व वर्णितात, हे होय. त्या अध्यात्म व न्यायदर्शनाचा आधारही घेतात. प्रेममार्गाने ईश्वरभक्ती करणाऱ्याला प्रेमाचे रहस्य व मर्म अवगत असायला हवे, म्हणून त्यांनी शृंगाररस प्रधान रसमंजरी लिहिली. अनेकार्थमंजरी, मानमंजरी नाममाला हे आगळ्या प्रकारचे कोश आहेत. विरहमंजरी व रूपमंजरी यांत अनुक्रमे विरह आणि परकीय प्रेमाचे वर्णन आहे. यांशिवाय दशमस्कंध, रक्मिणीमंगल, श्याम सगाई इ. ग्रंथ नंददासांनी लिहिले.
काव्यशक्ती, भक्ती, अध्यात्म आणि विद्वत्ता या चारही गोष्टी नंददासांमध्ये सारख्याच प्रमाणात एकवटल्या होत्या. शृंगार आणि भक्ती, रूपासक्ती आणि वैराग्य, सौंदर्याची ओढ आणि समर्पणाची भावना यांचा संमिश्र अनुभव त्यांचे काव्य वाचताना येतो. नंददासांना काव्यकलेची चांगलीच जाण होती व शब्दांच्या निवडीच्या बाबतीतही ते अत्यंत चोखदंळ होते. म्हणूनच अन्य कवींच्या तुलनेने ‘और सब गढिया नंददास जडिया’ असे म्हटले जाते. छंदांची आणि शब्दांची योजना त्यांनी आकर्षकपणे केली आहे. कृष्णभक्तिपर काव्यांत विविध प्रकारच्या शैलींचा वापर करण्याची प्रथा त्यांनी पाडली.
संदर्भ :
- खट्टर, रमेशकुमार, नंददास, दिल्ली, १९६७.
- गुप्त, दीनदयालू, अष्टछाप और वल्लभ संप्रदाय, अलाहाबाद, १९४७.
- रूपनारायण, नंददास विचारक रसिक कलाकार, दिल्ली, १९४८.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.