कुलकर्णी, द. भि. : (२५ जुलै १९३४ – २७ जानेवारी, २०१६). मराठी साहित्यातील ख्यातनाम समीक्षक आणि ललितनिबंधकार. त्यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे झाले. नागपूर विद्यापीठाच्या एम. ए. (मराठी) पदवी परीक्षेत प्रथम क्रमांकाचे ना. के. बेहरे सुवर्णपदक (१९५९) त्यांना प्राप्त झाले होते. ‘महाकाव्य : स्वरूप आणि समीक्षा’ या विषयावर तत्कालीन नागपूर विद्यापीठाची पीएच.डी. पदवी (१९६८) त्यांनी प्राप्त केली. १९५७ ते १९९४ अशी ४१ वर्षे त्यांनी मराठी भाषासाहित्याचे प्राध्यापक म्हणून विविध ठिकाणी काम केले. बनारस हिंदू विश्वविद्यालय, गोखले महाविद्यालय, कोल्हापूर आणि मराठी विभाग, नागपूर विद्यापीठ येथे मराठीच्या अध्यापनाचे कार्य केले. त्यांचा इंग्रजीसह संस्कृत, हिंदी आणि रशियन भाषेचाही अभ्यास होता. प्राचीन-अर्वाचीन साहित्य, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र, इत्यादी ज्ञानशाखांतही त्यांचा व्यासंग होता. त्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात कथा, कविता व लघुनिबंध यांच्या रूपाने साहित्यनिर्मितीला प्रारंभ केला. १९५५ च्या सुमारास त्यांचे ‘आई : दोन कविता’ हे समीक्षा-टिपण छंद या नियतकालिकामध्ये मध्ये प्रकाशित झाले होते. अशा टिपणात्मक लेखनानंतर ते समीक्षक म्हणून नावारूपाला आले. प्राचीन, अर्वाचीन, नवसाहित्य आणि समकालीन अशा सर्वच साहित्यप्रवाहांची त्यांनी समीक्षा केली. महाकाव्य, आधुनिक मराठी काव्यपरंपरा,भारतीय साहित्यशास्त्र, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र, ज्ञानेश्वरी, नवसाहित्य, कादंबरी यांवरील त्यांचे भाष्य मौलिक असून मराठी साहित्यपरंपरेला त्यांनी दिलेले ते महत्त्वाचे योगदान आहे.
द.भि. कुलकर्णी यांच्या नावावर १ कवितासंग्रह, ४ ललित ग्रंथ, ३० समीक्षाग्रंथ व ७ संपादित ग्रंथ आहेत. मेघ, मोर आणि मैथिली, जुने दिवे, नवे दिवे (ललित निबंधसंग्रह); मेरसोलचा सूर्य (कवितासंग्रह); बालकांचा बगीचा (बालवाङ्मय); अपार्थिवाचा यात्री (आत्मपर लेखन) हे त्यांचे ललित साहित्य असून, दुसरी परंपरा (१९७४), महाकाव्य स्वरूप आणि समीक्षा (१९७५), ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद, (१९७६), पहिली परंपरा (१९७६), तिसऱ्यांदा रणांगण (१९७६), चार शोधनिबंध (१९७७), पार्थिवतेचे उदयास्त (१९७७), नाट्यवेध (१९७८), मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना (१९८२), प्रतीतिविश्रांती (१९९२), दोन परंपरा (१९९३) युगास्त्र (१९९३), द्विदल (१९९४), हिमवंतीची सरोवरे (१९९६), पहिल्यांदा रणांगण (१९९९), अपार्थिवाचे चांदणे (१९९९), पस्तुरी (२००२), कादंबरी : स्वरूप व समीक्षा (२००३), समीक्षेची सरहद्द (२००५), सुरेश भट – नवे आकलन (२००५), प्रतीतिभेद (२००७), अंतरिक्ष फिरलो पण (२००७), जीएंची महाकथा (२००८), समीक्षेची वल्कले (२००८), ज्ञानेश्वरांची प्रतीतिविश्रांती (२००८), मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना (दु. आ. २००९), अनन्यता मर्ढेकरांची (२००९), नाटक : स्वरूप व समीक्षा (२०१०), समीक्षेची चित्रलिपी (२०११), स्फटिकगृहीचे दीप (२००८) इत्यादी त्यांचे समीक्षा व संशोधनपर ग्रंथ आहेत.
द. भि कुलकर्णी हे संवेदनशील, सर्जनशील, चिंतनशील प्रवृत्तीचे समीक्षक आहेत. वाङ्मयीन महात्मतेचा त्यांना कायम ध्यास होता. मराठी साहित्याची महात्मता ज्ञानेश्वर-तुकाराम, मर्ढेकर, गंगाधर गाडगीळ, विश्राम बेडेकर, जीए- यां मानदंडावर उभी आहे, असे त्यांना वाटे. चित्रे-ग्रेस, मुक्तिबोध-म.म. देशपांडे, भालचंद्र नेमाडे हे या महात्मतेचे आधार आहेत, असे ते मानत. मराठी अभिरुची या लेखकांशी संवादी राहावी असा त्यांच्या समीक्षेचा ध्यास होता. त्यांच्यापूर्वी मराठी समीक्षा विषयनुसारी, लेखकानुसारी व ग्रंथानुसारी होती; त्यांनी तिला प्रतीतिनिष्ठ व अभिरुचिनिष्ठ केले. त्यांनी मराठी समीक्षेत ‘नवअलौकिकतावादाचा सिद्धांत’ मांडला आहे. त्यात अभिनवगुप्ताच्या ‘व्यंग्यार्थ’ व मर्ढेकरांच्या ‘घाट-लय’ या सिद्धांतांची सांगड घातली आहे. त्यासाठी ‘साहित्यकृतीतील अर्थव्यूह’ ही नवी संकल्पना त्यांनी मांडली आहे. साहित्यकृतीत व्यंग्यार्थ असतो म्हणजे तिच्यात ‘अर्थाचा अर्थ’ असतो. म्हणून तिच्या आस्वादातून रसिकाला अर्थसमृद्धी मिळते, असे अभिनवगुप्त म्हणत; तर साहित्यकृतीमध्ये आशय लयतत्त्वातून घाटाचे रूप धारण करतो, असे मर्ढेकर म्हणत. या दोन भूमिकांचा समन्वय या सिद्धांतात त्यांनी साधला. त्यांच्या मते, साहित्यकृतीत नुसता व्यंग्यार्थ वा नुसता घाट नसतो, तर ‘अर्थव्यूह’ असतो. म्हणजे अभिनवगुप्त म्हणतात त्या ‘अर्थाचा स्फोट’ (व्यंग्यार्थ) व मर्ढेकर म्हणतात ते ‘आशयाला संघटनारूप प्राप्त होणे’ (घाट) यांचा समन्वय‘ साहित्यकृतीतील अर्थव्यूह’ या संकल्पनेने साधला. त्यांच्या नवअलौकिकतावाद सिद्धांतानुसार, संपूर्ण कलाकृतीत व्यंग्यार्थ सुटा व विस्कळीत नसतो; तर तिच्यात व्यंग्यार्थाचा एक व्यूह असतो आणि तो शब्द, अलंकार, प्रतिमा, प्रतीक, यांतून साकारला जातो. अशा शब्द-प्रतिमा-प्रतीकादी लहान लहान घटकांचे अनंत व्यूह साहित्यकृतीत जिवंत असतात. त्याचाही एक मोठा व्यूह होतो. अशा विविध व्यूहांतून साकारलेला नवीन अर्थ रसिकाला भावतो. म्हणूनच साहित्यकृतीची भाषा ही व्यूहाची भाषा आहे, असे ते म्हणत. त्यांच्या मते, व्यंग्यार्थात हे जे अनंतव्यूह असतात, ते मात्र मर्ढेकर मानत असत तसे केवळ संवाद, विरोध, समतोलात्मक नसतात; तर या व्यूहांचे एक ऊर्जाकेंद्र असते. मात्र ते साहित्यकृतीच्या केंद्रस्थानी नसते, ते कलाकृतीत कुठेही असते. केंद्रापासून घाटापर्यंत साहित्यकृतीच्या परिसरात जे लयतत्त्व कार्य करते. त्या लयतत्त्वाला या उर्जाकेंद्रातूनच आकृती (घाट) मिळते. अशाप्रकारे साहित्यकृतीत आशयाची संघटना असते, निव्वळ आकृतीची नाही. या सिद्धांतात अर्थ-व्यूहात्मक साहित्यकृतीचे तत्त्व मांडत त्यांनी अभिनवगुप्त व मर्ढेकर यांचा समन्वय साधला आणि समीक्षेतील कलावाद-जीवनवाद, अलौकिकतावाद- लौकिकतावाद हा पेच सोडवण्याचा प्रयत्न केला. जीवनमूल्ये व कलामूल्ये यांचे एकत्रीकरणही केले. तसेच भारतीय साहित्यशास्त्र व पाश्चात्त्य सौंदर्यशास्त्र यांचा समन्वयही साधला. हे त्यांचे मराठी समीक्षेला दिलेले मौलिक योगदान होय.
द. भि. कुलकर्णी यांच्या समीक्षालेखांतून साहित्याच्या स्वरूपाविषयीची, साहित्याच्या निर्मितिप्रक्रियेविषयीची, लेखकाचे व्यक्तिमत्त्व व प्रतिभेविषयीची तत्त्वे दडलेली आहेत. आस्वादातूनच साहित्यकृतीचे स्वरूप व साहित्यकृतीचे परंपरेतील स्थान ठरवणे, लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे, साहित्यकृतीचे अर्थनिर्णयन करणे, वाचकांच्या अभिरुचीचा विकास करणे ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये होती. काव्य-कादंबरी, आत्मचरित्र अशा साहित्यप्रकाराचे स्वरूप; कुसुमाग्रज, मर्ढेकर, जी. ए.कुलकर्णी, विश्राम बेडेकर, सुरेश भट यांच्या प्रतिभेचा व कार्याचा शोध; मराठी अभिरुची व साहित्यनिर्मिती यांचा परस्पर संबंध व निर्मितीच्या मर्यादा; लेखकाची निर्मितिप्रक्रिया; वाचकाची अभिरुची यांचा शोध अशी सूत्रे त्यांच्या समीक्षेत सापडतात.
आधुनिक मराठी कवितेच्या दोन परंपरा पहिल्यांदा त्यांनीच सांगितल्या. पहिल्या लौकिकतावादी म्हणजे सौंदर्यवादी परंपरेची-स्वातंत्र्य आणि आत्माविष्कार (कविव्यापार), क्लृप्ती आणि उत्तरदायित्व (काव्यव्यापार) ही वैशिष्ट्ये सांगितली; आणि त्या परंपरेत त्यांनी केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज व मुक्तिबोध यांचा समावेश केला. दुसऱ्या अलौकिकतावादी म्हणजे अभिजातवादी परंपरेची – सांस्कृतिक अनुवंशशून्यता, व्यक्तिवाद, व्यक्तित्वाचा आविष्कार या तत्त्वांचा त्याग; आणि परंपरादर्शन, लौकिक व्यक्तित्वाचा विलोप, लौकिक अनुभवाची–परा अनुभवाची जोड – ही वैशिष्ट्ये सांगितली; आणि त्या परंपरेत त्यांनी, म. मो. कुंटे, भा. रा. तांबे, माधव जूलियन्, कुसुमाग्रज, वसंत बापट, मधुकर केचे यांचा समावेश केला. ‘युगदर्शन’ या निबंधात त्यांनी जीए., दिलीप चित्रे, विजय तेंडुलकर, ए. वि. जोशी, पु. शि. रेगे, कमल देसाई ते भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंतच्या नववाङ्मयाबद्दलची मौलिक निरीक्षणे नोंदवली. या वाङ्मयामागचे तत्त्वज्ञान व जागतिक पार्श्वभूमी सुद्धा सांगितली. त्यांनी कथा हाच मूलगामी लेखन प्रकार मानून मराठी कथेच्या पडत्या काळात कथेची प्रकृती सांगून तिचा गौरव त्यांनी केला.
द. भि. कुलकर्णी यांच्या पाच ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाले असून दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या ‘वाग्विलासिनी पुरस्कारा’ सह सुमारे २० च्यावर पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत. शिवाय न्यूयॉर्कच्या हेरॉल्ड ट्रिब्यूनचा उत्कृष्ट कथा पुरस्कार (१९५३), महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (१९९१), महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रेष्ठताग्रंथ इत्यादी पुरस्कार; तसेच कारंजा लाड (१९९०) आणि नागपूर (१९९१) येथील नागपूर विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष, ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (पुणे, २०१०), अभिजात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (सातारा, १९९३) हे सन्मानही त्यांना प्राप्त आहेत. समकालीन मराठी साहित्य : प्रवृत्ती व प्रवाह (संपा. मदन धनकर, डॉ. वि. स. जोग, मृणालिनी बांडे), समीक्षेची क्षितिजे (संपा. श्यामला मुजुमदार), सप्तपर्णी स्त्रीसंवेदन, द. भि कुलकर्णी दर्शन (संपा. स्मिता लाळे) हे त्यांच्यावरील गौरवग्रंथ प्रसिद्ध आहेत. पुणे येथे त्यांचा मृत्यू झाला.
संदर्भ :