तीजनबाई : (१९५६). पंडवानी गायिका. छत्तीसगडमधील पंडवानी या गाथागायन परंपरेला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मान्यता प्राप्त करून देणाऱ्या प्रख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई देशात आणि परदेशात प्रसिद्ध आहेत. तीजनबाईंचा जन्म छत्तीसगड मधील दुर्ग जिल्ह्यात अटारी- पाटन येथे झाला. बहेलिया पारधी या शिकारी आदिवासी जमातीत जन्मलेल्या तीजनबाईंचे बालपण अतिशय कष्टप्रद होते. जंगलातील खजुराची पाने गोळा करून त्यापासून झाडू आणि चटया बनविण्याचे काम त्या आपल्या कुटुंबियांसोबत करीत. बालपणी आपल्या मैत्रीणी सोबत फुले वेचता वेचता मध गोळा करता करता तीजनबाई गाणे गावू लागल्या. ददरिया, कर्मा या सारखी लोकगीते त्यांच्या कंठातून येवू लागली. त्यांचे वडिल छनुकलाल पारधी वेळुची बासरी वाजवायचे. त्यांची आई सुखवती वेळुच्या बासरीवर गाणे गायची. छत्तीसगढी भाषेत त्याला ‘बास के गीत’ असे संबोधिले जाते. बालपणीच आई वडिलांनी तीजनबाईंचे लग्न लावून दिले. त्यांच्याच जातीच्या देव बलवदा येथील उंचेलाल पारधी यांचा पुत्र दयाराम सोबत तीजनबाईंचा बालविवाह झाला. बालविवाह झाल्यावरही आपले आजोबा बृजलाल पारधी यांच्यासोबत तीजनबाई पंडवानी गायन करीत गावोगाव फिरत असत. विवाह झाल्यावरही पंडवानी गायन करणाऱ्या तीजनबाईंना समाजाच्या टिकेला अनेकवार सामोरे जावे लागले. बृजलाल पारधी यांच्याकडून आदिपर्वापासून ते स्वर्गारोहण पर्वापर्यंत १८ पर्वांचे पंडवानी गायन तीजनबाईंनी शिकून घेतले. तमुरा, ढोलक, चिमटा,हार्मोनियम, मंजिरी या वाद्यांच्या साथीने तीजनबाई पंडवानी सादर करू लागल्या.

भिलाई प्लांट मधील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून तीजनबाईंचे कौतुक केले. याच भिलाई प्लँट मध्ये त्या कामगार कल्याण विभागात कामाला लागल्या. १९७६ साली छत्तीसगढ महोत्सवात तीजनबाईंनी आपली कला सादर केली. इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय खैरागड, भारत भवन भोपाळ,आदिवासी लोक कला परिषद मध्यप्रदेश, अशोका हाॅटेल दिल्ली,अशा अनेक प्रतिष्ठित महोत्सवात तीजनबाईंनी पंडवानी सादर केली. १९८५ साली पॅरिस येथील भारत महोत्सवात पंडवानी सादर करण्याची संधी तीजनबाईंना प्राप्त झाली. अपना उत्सव, भारत महोत्सवात कला सादर करणाऱ्या तीजनबाईंना पद्मश्री प्राप्त झाल्यानंतर त्यांचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते. छत्तीसगढ मधील नाचा संस्कृतीचे संस्कार तीजनबाईंच्या अभिनय, गायनावर आहेत. पद्मश्री,पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या तीजनबाईंनी इंदिरा संगीत कला विश्वविद्यालय खैरागड तर्फे मानद डी.लिट् पदवी प्राप्त झालेली आहे. फ्रान्स , रशिया, अमेरिका, स्वित्झर्लंड, पोलंड,जपान अशा अनेक देशांमध्ये पंडवानी सादर करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकशैली दिग्दर्शक हबीब तन्वीर यांनी तीजनबाईंच्या कला सादरीकरणाचे विश्लेषण अतिशय समर्पकपणे केले आहे. ते म्हणतात ‘महाभारतातील कथांच्या प्रासंगिकतेला तीजनबाईंचे सादरीकरण अधिक महत्त्वपूर्ण बनविते. तीजनबाईंची तंबोरी म्हणजेच एकतारा, कधी भीमाची गदा होते, कधी शिवधनुष्य होते. तीजनबाई म्हणजे लोकरंगभूमीवरील अद्भुत चमत्कार. ज्येष्ठ गीतकार गुलजार म्हणतात ‘डोंगर दऱ्यातल्या निर्झरांचा किल किल निनाद म्हणजे पंडवानी. छत्तीसगढच्या लोककलाकारांच्या रोजीरोटीतून, दैनंदिन जीवनातून पंडवानी उभी रहाते. समाजातील दुर्बल घटकांच्या बाजूने उभे राहा, स्त्रियांचा सन्मान करा, संघर्ष, युध्द, विवादांपासून बचाव करा असा संदेश पंडवानी देते. झाडूराम देवांगन, पूनाराम निशाद तीजनबाई हे पंडवानीचे अतिशय संपन्न, बहुआयामी कलावंत आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाट्य दिग्दर्शक बी.व्ही.कारंथ म्हणतात, पाहतांना ऐकणे आणि ऐकतांना पाहणे ही तीजनबाईंच्या पंडवानीची आंतरिक शक्ती आहे. नाच्या आणि पंडवानी गायकांच्या अभिनय,गायनात अशी अलौकिक लयबद्धता आहे की प्रेक्षक संम्मोहित होतात. तीजनबाई अभिनय करतांना महाभारतातील पुराण पात्रांमध्ये त्यांचा परकाया प्रवेश अतिशय सहज होतो. मौखिक परंपरांनी आपल्या लोककथांना श्रृती, स्मृतींच्या सुंदर परिवेशात ठेवले आहे. पद्मविभूषण तीजनबाई या भारताच्या लोक संस्कृतीचे आणि त्या अंतर्गत असलेल्या मौखिक परंपरेचे वैभव आहेत.
संदर्भ :
- खांडगे, प्रकाश, कालनिर्णय, सांस्कृतिक दिवाळी २०१९.