गेल्या शतकात विद्युत निर्मितीसाठी कोळसा, तेल यांसारखे इंधन मोठ्या प्रमाणात वापरले गेले. या इंधनाच्या वापराने कार्बन डाय-ऑक्साइडसारख्या हरितगृह वायूचे प्रमाण वाढल्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी वीजनिर्मितीसाठी सध्या नूतनीकरणीय ऊर्जास्रोतांचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे सर्व देशांचा कल आहे. भारत सरकारने २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट क्षमता स्थापण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यांमध्ये सौर ऊर्जेचा सिंहाचा वाटा आहे. छोटे विद्युत ग्राहक घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मितीचे उपकरण बसवून ऊर्जा निर्मिती आणि त्याची ग्रिडशी जोडणी करू शकतात. या पद्धतीत विद्युत ग्राहक हा केवळ विजेचा ग्राहक न राहता तो वीजनिर्मिती यंत्रणेचा भाग बनतो, म्हणून त्यास प्रोझ्युमर किंवा उत्पादिग्राहक (Prosumers – Producers + consumers) असे संबोधले जाते. अशा परिस्थितीत ऊर्जा मापन आणि देयके कशा पद्धतीने करावीत, यासाठी भारत सरकारने याबद्दलची प्रणाली जाहीर केली आहे. त्याचा अंतर्भाव वीज (ग्राहक अधिकार) सुधारणा नियम २०२१ [The Electricity (Rights of Consumers) Amendment Rules, 2021] मध्ये केला आहे. हे सुधारणा नियम २९ जून २०२१ च्या राजपत्रात प्रसिद्ध झाले असून तेव्हापासून ते लागू झाले आहेत.
सौर ऊर्जानिर्मितीचे उपकरण ग्रिडशी जोडले असल्यासच यातील तरतुदी लागू होतात. यामध्ये तीन पद्धती सुचविल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे:
निव्वळ ऊर्जा मापन (Net metering) : या पद्धतीत उत्पादिग्राहकाने ग्रिडमधील वापरलेली ऊर्जा आणि सौर ऊर्जा संयंत्राने निर्माण केलेली ऊर्जा याची वजावट करून शिल्लक ऊर्जेचा आकार उत्पादिग्राहकाकडून दरपत्रकाप्रमाणे घेतला जातो. सौर ऊर्जा संयंत्राने निर्माण केलेली ऊर्जा वापरापेक्षा अधिक असेल, तर ती उत्पादिग्राहकाच्या नावे जमा ठेवून त्याचा वर्ष अखेरीस हिशोब केला जातो. यासाठी द्वि-दिशा (Bi-directional) पद्धतीचे एक मीटर वापरावे लागते.
स्थूल ऊर्जा मापन (Gross metering) : उत्पादिग्राहकाने ग्रिडमधील वापरलेली ऊर्जा आणि सौर ऊर्जा संयंत्राने निर्माण केलेली ऊर्जा या दोन्हींची स्वतंत्रपणे नोंद केली जाते. उत्पादिग्राहकाने ग्रिडमधील घेतलेल्या ऊर्जेसाठी सामान्य दरपत्रकाप्रमाणे हिशोब (क) केला जातो. सौर ऊर्जा संयंत्राने निर्माण केलेल्या ऊर्जेच्या खरेदीचा प्रति एकक (Unit) दर राज्य विद्युत नियामक आयोगाद्वारे ठरविला जाईल, त्या दराने सौर ऊर्जा संयंत्राने निर्माण केलेल्या ऊर्जेचा हिशोब (ख) करून (क वजा ख) असा अंतिम हिशोब होईल.
निव्वळ देयक (Net Billing) : सौर ऊर्जा संयंत्राने निर्माण केलेल्या ऊर्जेपैकी काही ऊर्जा उत्पादिग्राहकाकडे वापरली जाईल आणि शिल्लक ऊर्जा ग्रिडमध्ये दिली जाईल. ग्रिडमध्ये दिलेली ऊर्जा आणि त्याची राज्य विद्युत नियामक आयोगाद्वारे ठरविलेल्या दराने त्याचे मूल्य (च) काढले जाते. तसेच उत्पादिग्राहकाने ग्रिडमधून घेतलेल्या ऊर्जेचे सामान्य दरपत्रकाप्रमाणे मूल्य (छ) काढले जाते. अंतिम हिशोब (छ वजा च) असा होतो. सौर ऊर्जा संयंत्राने ग्रिडला दिलेली ऊर्जा वापरापेक्षा अधिक असेल, तर ती उत्पादिग्राहकाच्या नावे जमा ठेवून त्याचा वर्ष अखेरीस हिशोब केला जातो. यासाठी द्वि-दिशा पद्धतीचे एक मीटर वापरावे लागते.
अन्य तरतुदी : निव्वळ ऊर्जा मापन, स्थूल ऊर्जा मापन वा निव्वळ देयक कोणत्या उत्पादिग्राहकास लागू करावे याबद्दल राज्य वीज नियामक आयोग पद्धती ठरवेल. अशी तरतूद नसल्यास ५०० किलोवॅट (kW) किंवा मंजूर भार यापैकी जे कमी असेल त्यास निव्वळ ऊर्जा मापन लागू करावे.
निव्वळ देयक पद्धती स्वीकारणाऱ्या उत्पादिग्राहकांसाठी राज्य वीज नियामक आयोग ‘वेळेनुसार दर आकारणीची पद्धती’ (Time Of the Day Tariff -TOD) ठरवू शकेल. त्यायोगे उत्पादिग्राहकास ऊर्जा संग्रहित करून स्वतःच्या किंवा ग्रिडच्या गरजेच्या वेळी त्याचा पुरवठा करण्यास प्रोत्साहन मिळेल. यामुळे कमाल मागणीचे काळात उत्पादिग्राहक ग्रिडला मदत करू शकतील.
वरील पैकी निव्वळ ऊर्जा मापन वा निव्वळ देयक पद्धत स्वीकारली तरी, विद्युत वितरणाचे परवानाधारक सौर ऊर्जा निर्मितीचा एकत्रित आढावा घेण्यासाठी सौर ऊर्जा मापनासाठी स्वतंत्र मीटर बसवू शकतील. जे उत्पादिग्राहक निव्वळ ऊर्जा मापन वा निव्वळ देयक न स्वीकारता संपूर्ण सौर ऊर्जा वितरणाचे परवानाधारकास देऊ इच्छितात, त्यांच्यासाठी राज्य वीज नियामक आयोग ‘स्थूल ऊर्जा मापन’ पद्धतीनुसार सामान्य दरपत्रक लागू करू शकेल.
उदाहरण :
वरील पद्धती समजण्याचे दृष्टीने एक साधे उदाहरण पाहू. त्यासाठी खालील साधी गृहीते धरली आहेत.
उत्पादिग्राहकाचा भार ०.७५ kW अखंड २४ तास – महिन्याचे ०.७५ x २४ x ३० = ५४० एकक (kWh)
सौर ऊर्जा निर्मिती १ kW दिवसा ६ तास – महिन्याचे १ x ६ x ३० = १८० एकक (kWh)
वितरण कंपनीचा ग्राहकास दर ७ रु. प्रति एकक (सामान्य गृहित)
सौर ऊर्जा खरेदीचा वितरण कंपनीचा दर ४ रु. प्रति एकक
सौर ऊर्जा ६ तास उपलब्ध असताना १ kW पैकी ०.७५ kW ग्राहक वापरेल आणि ०.२५ किलोवॅट (०.२५ x ६ x ३०= ४५ एकक) ग्रिडमध्ये जाईल.
बाकीच्या १८ तास उत्पादिग्राहकाचा भार ०.७५ kW (०.७५ x १८ x ३०= ४०५ एकक) ग्रिडमधून दिले जातील.
निव्वळ ऊर्जा मापन = (५४० – १८०) x ७ = २५२० रु.
स्थूल ऊर्जा मापन = (५४० x ७) – (१८० x ४) = ३०६० रु.
निव्वळ देयक = [(०.७५ x १८ x ३०) x ७ – (०.२५ x ६ x ३०) x ४] = २६५५ रु.
पहा : विद्युत ऊर्जा दरमापन पद्धती, वीज (ग्राहक अधिकार) नियम २०२०.
संदर्भ : The Gazette of India; Extraordinary; Part II – Section 3 – Sub-section (i) dated June 29, 2021; The Electricity (Rights of Consumers) Amendment Rules, 2021.
समीक्षक : विनय जोशी