मार्टिन, फ्रान्स्वा : (१६३४–१७०६). दक्षिण भारतातील पाँडिचेरी (पुदुच्चेरी) या तत्कालीन फ्रेंच वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा आयुक्त आणि व्यापारी. त्याचा जन्म पॅरिसमध्ये झाला. त्याचे वडील पॅरिसमधील छोटे व्यापारी होते. मार्टिनला तीन बहिणी होत्या. त्याच्या वडिलांनी त्याला चांगले शिक्षण दिले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या वडिलांचा व्यापार सांभाळण्यास सुरुवात केली. वयाच्या २९व्या वर्षी मेरी कूपर्ली हिच्याबरोबर त्याने लग्न केले. पुढे त्याने १६६४ मधे सुरू झालेल्या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीत व्यापारी म्हणून नोकरी पतकरली. या काळात त्याने मादागास्कर, सुरत, मछलीपट्टम येथे प्रवास केला. १ मार्च १६६५ रोजी तो मायदेश सोडून मादागास्करला गेला. तेथे चार वर्षे काढून १६६९ मध्ये तो सुरतेला पोहोचला. यानंतर त्याची पाँडिचेरी येथे व्यापारी म्हणून नेमणूक झाली (१६७४). पुढे तो येथे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा संचालक म्हणून काम बघू लागला (१६८६).

मार्टिनचे लेखन म्हणजे दक्षिण भारतातील घडामोडींचा समकालीन वृत्तांत आहे. तो आपल्या लेखनात छ. शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील हल्ल्याबद्दल ऐकलेली माहिती सांगतो, ‘प्रसिद्ध शिवाजी राजाने चार ते पाच हजाराची फौज घेऊन सुरतेवर हल्ला केला. त्याने सोने, चांदी, मौल्यवान जवाहीर आणि इतर सामानाची अगणित लूट केली. आम्ही आमचा दूत नजराणा घेऊन त्याच्याकडे पाठवला, म्हणून त्याने आमच्या वखारीवर हल्ला केला नाही; पण इंग्रजांच्या वखारीवर हल्ला केला; मात्र इंग्रजांनी त्यांच्या वखारीचे संरक्षण केले. त्याने डच वखार दूर असल्यामुळे त्यांच्या वखारीवर हल्ला केला नाही. सुरतेतील लोक स्वतःच्या संरक्षणासाठी शहराबाहेर गेले होते; परंतु ते जेव्हा परतले तेव्हा त्यांचे सर्व सामान लुटले असल्याचे त्यांना दिसले.’ मार्टिनने त्याच्या लेखनात वखारीला ‘लॉजʼ म्हणून संबोधले आहे.

छ. शिवाजी महाराजांच्या कर्नाटक मोहिमेबद्दल तो लिहितो, शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह गोवळकोंड्याला आले. त्यांचे गोवळकोंड्यात मोठा नजराणा देऊन भव्य स्वागत झाले. गोवळकोंड्याच्या राजाकडून शिवाजी महाराजांना सहकार्य करण्याबाबत कर्नाटकातील सर्व सरदारांना पत्रे पाठवण्यात आली.ʼ तसेच शिवाजी महाराजांनी वेल्लोर, जिंजी वगैरे आदिलशाही मुलूख जिंकून घेतल्याचे वर्णन त्याने केले आहे.

मार्टिन सप्टेंबर १६९३ ते फेब्रुवारी १६९४ या काळात डचांचा युद्धकैदी होता. त्याने फ्रान्समधून निघाल्यापासून मृत्यू होईपर्यंतच्या प्रत्येक दिवसाच्या नोंदी आपल्या दैनंदिनीत लिहून ठेवल्या व त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या. त्याच्या दैनंदिनीचे मेम्वार दि फ्रान्स्वा मार्टिन (Memoire de Francois Martin) या नावाने तीन खंड पाँडिचेरी येथे प्रसिद्ध करण्यात आले (१९३१). यांमध्ये छ. शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम, औरंगजेबाची दक्षिण मोहीम आणि छ. राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेबद्दल विस्तृत माहिती मिळते. याचबरोबर तत्कालीन व्यापार, आदिलशाही, गोवळकोंड्यामधील राजकारण, पूर्वेकडील इंग्रज, डच, पोर्तुगीज कंपन्यांची व्यापारवाढ, दक्षिण समुद्रातील डच व इंग्रज लोकांच्या हालचाली, सुरत, मद्रास, मदुराई, सयाम, चीन येथे झालेला धर्मप्रसार यांबद्दल भरपूर माहिती मिळते. तसेच गोवळकोंडा व डच यांच्यातील संघर्षाबद्दलही माहिती मिळते.

पाँडिचेरी येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ :

  • Varadrajan, Lotika, Trans. India in the 17th Century Memoirs of Francois Martin: Vol.1, Part: 1, Manohar Publications, New Delhi, 1981.
  • Sharma, Yogesh, ‘From Pondicherry to Surat : the travels of Francois Martinʼ, India International Centre Quarterly, 30 (3/4) : 122-136,  https://www.jstor.org/stable/23006128

                                                                                                                                                                             समीक्षक : प्रमोद जोगळेकर