एक बुद्धिप्रामाण्यवादी इस्लामी धर्मपंथ. ‘मुतझिल’ ह्याचा अर्थ ‘फुटीरतावादी’ असा होतो. बसरा (इराक) ही मुतझिलांची जन्म व कर्मभूमी होती. विशेषत: ग्रीक तत्त्वज्ञानाच्या प्रभावातून आपल्या विचारांना व्यक्त करणारा मुतझिला हा इस्लाममधील आद्य पंथ आहे. या पंथाचे मूळ इस्लामी राजकारणात आहे. अली व त्यांचे विरोधक यांच्या झगड्यात जे तटस्थ (इतझिला) राहिले, ते मुतझिला म्हणून ओळखले जाऊ लागले. या पंथाच्या लोकांना ‘मुतझिलिया’ म्हणण्याचे आणखी एक कारण असे दिले जाते की, ते सत्यापासून फुटून निघून दूर चालते झाले. परिणामी इस्लामी तत्त्वे व धर्मनिष्ठा यांचा ते त्याग करून बसले.

एक प्रातिनिधिक चित्र

मुतझिला पंथाचे संस्थापक वासिल बिन अता (सु. ६९९–सु. ७४९) आणि अमर बिन उबैद (मृ. ७६२) हे होत. ते हसन अल्-बसरी (६४२–७२८) यांच्या पंथापासून फुटून निघाले. ते मोमिन (श्रद्धावान) व मुसलमान (इस्लामचे अनुयायी) या दोघांपासूनही वेगळे झाले. महापापी माणूस हा काफिरही (अश्रद्ध) नसतो किंवा मोमिनही नसतो; अशा तटस्थ भूमिकेमुळे त्यांना ‘मुतझिला’ (तटस्थवादी) ह्या नावाने संबोधण्यात येऊ लागले आणि तेव्हापासून ह्या पंथाचे हेच नाव रूढ झाले. मुतझिलिया हे वासिल बिन अता व अमर बिन उबैद यांचे अनुयायी आहेत. या पंथाच्या अनुयायांना ‘मुतझिलाइट’ असेही म्हटले जाते.

या पंथाला कद्रिया असेही म्हणतात; कारण त्यांचा असा विश्वास आहे की, परमेश्वराच्या इच्छेने नियत झालेल्या प्रारब्धाशी (तकदीराशी) माणसांच्या पातकांचा काडीमात्रही संबंध नाही. म्हणजेच माणसांची पातके परमेश्वराने नियत केलेल्या प्रारब्धानुसार घडत नसून ती त्यांच्याच दुष्ट इच्छेनुसारच घडतात. कर्माचा संबंध व्यक्तीशी निगडित असतो; परमेश्वराच्या इच्छेचा त्यात काहीच हस्तक्षेप नसतो. परमेश्वराच्या ठिकाणी असलेले दैवी गुण त्यांनी (मुतझिलांनी) नाकारल्यामुळे मुतझिला, जबहीरिया व कद्रिया हे सर्व पंथ या दृष्टीने सारखेच आहेत.

धार्मिक बाबतीत मानवी विवेकबुद्धीचाच निकष असावा; तसेच मनुष्य हाच स्वतःच्या कृतींचा कर्ता-करविता असतो, यांवर मुतझिलियांचा विश्वास होता. त्यातूनच पुढे परंपरावादी व सुधारणावादी असा संघर्ष आला. मुतझिलियांच्या मते परमेश्वर एक असून परमेश्वरी कृपा ठरावीक स्थळीच होत असल्याचे मानले गेले आहे; तर मुहासिबी संप्रदाय ती स्वतंत्र आणि सार्वस्थळीक मानतात. मुतझिली परमेश्वराचा शब्द मानवनिर्मित संकल्पना मानतात. परिणामी कुराणालाही ते मानवनिर्मित समजून त्यातील तत्त्वांचा तर्कसंगत अर्थ करू इच्छितात. मात्र अल् मुहासिबी कुराणास सहसा अपौरुषेय मानत नाहीत; पण परमेश्वराच्या शब्दाला कालातीत मानतात.

कुराणाचा अर्थ प्रत्येकाने बुद्धीला आणि तर्काला धरून करावा; पंडित सांगतील तोच अर्थ खरा मानू नये, असा मुद्दा आठव्या शतकातच मुतझिला विद्वानांनी मांडला. प्रत्येक मानवी कृत्य सर्वशक्तिमान परमेश्वराच्या इच्छेमुळे होते, माणसाला आचारस्वातंत्र्य नाही हे प्रस्थापित धर्मगुरूंचे मतही मुतझिलियांना अमान्य होते. एकमेकांविरुद्ध मते असलेल्या कुराणातील आयतांचा अर्थ लावताना कालक्रमाने आधी सांगितलेले मत नंतर सांगितलेल्या मताने रद्द (मन्सूख) होते, या पंडितांच्या मतालाही मुतझिलियांनी विरोध केला. यातून वादंग निर्माण झाले. अल्-खल्दूनसारख्या काही पंडितांनी ईश्वर सर्वज्ञ असून व्यर्थ चर्चा करण्यात स्वारस्य नाही, असे मत मांडले. उलट, मुतझिला विद्वानांच्या हाताखाली शिक्षण घेतलेल्या आणि मागाहून धर्मपंडित झालेल्या अल्-अशअरींनी (८७३–९३५) मुतझिलियांना त्यांच्याच पद्धतीने, म्हणजे तर्कशुद्ध वाटणार्‍या युक्तिवादाने उत्तरे देण्यास सुरुवात केली. पुढे खलिफांच्या दरबारांत मुतझिलियांचे वजन कमी झाले आणि त्यांचे ग्रंथ जाळून टाकले गेले तरी अल‌्-अशअरींची युक्तिवादाची पद्धती इतर धर्मपंडितांनी चालूच ठेवली. या पद्धतीला कलाम असे नाव पडले.

मुतझिलियांच्या सहा प्रमुख शाखा : (१) हुजलिया, (२) नजामिया, (३) मामरिया, (४) काबिया, (५) जुबाइया व (६) बहुशमिया. ह्या सर्व शाखा परमेश्वराचे दैवी गुण नाकारणाऱ्या आहेत. त्यांचे प्रतिपादन असे आहे की, माणसांच्या कर्माचा निर्माता परमेश्वर नसून स्वतः माणूसच आहे. परमेश्वर आपल्या अनुयायांना निषिद्ध नसलेल्या मार्गानेच आवश्यक अशी जीवनशक्ती पोहोचवत असतो. परमेश्वराची एकता तसेच न्याय यांचे मुतझिला पुरस्कर्ते होत.

मुतझिला पंथाचे सिद्धांत : (१) जीवास कर्म करण्याचे स्वातंत्र्य आहे. (२) परमेश्वर फक्त चांगुलपणाचा निर्माता आहे. (३) परमेश्वर निर्गुण आहे. (४) परमेश्वराची सर्वशक्तिमानता सीमित आहे. (५) परमेश्वरी चमत्कार वा दैवी चमत्कार ही चुकीची संकल्पना आहे. (६) जगत् अनादी नसून आदियुक्त आहे. (७) परमेश्वराप्रमाणेच कुराणास अनादी समजण्याच्या कल्पनेस मुतझिलिया द्वैतवाद व मूर्तिपूजेइतकेच दुष्कर्म मानतात. बगदादचे मुतझिली मताचे अब्बासी खलिफा कुराणास अनादी मानण्याच्या सिद्धांतास ‘कुफ’ (अश्रद्ध) समजत व अशा व्यक्तींना शिक्षाही करत. अब्बासींचा या पंथास आश्रय होता. तात्पर्य, मुतझिलियांचा भर ग्रंथोक्त धर्मापेक्षा निसर्गसिद्ध धर्मावर अधिक आहे. वासिल बिन अता, अमर बिन उबैद, अबु-अल्-हुदायल, अल्-नझ्झाम इ. ह्या पंथाचे प्रमुख विचारवंत होत.

संदर्भ :