इस्लामी कायदेशास्त्र. फिका, फिक्ह असेही उच्चार केले जातात. हे मुसलमानी विधीच्या दोन संकल्पनांपैकी एक असून उसूल-अल्-फिक् म्हणूनही ते ओळखले जाते. ज्याचा शब्दशः अर्थ आकलनशक्ती किंवा अक्कलहुशारी असा आहे. फिक् या शब्दाचे वेगवेगळे अर्थ धर्मपंडितांनी सांगितलेले असले, तरी मुसलमानी विधीच्या सर्व मूलस्त्रोतांचा तौलनिक अभ्यास करून व्यक्तीचे हक्क व कर्तव्ये यांसंबंधीचे झालेले ज्ञान म्हणजे फिक्, हा बऱ्याच अंशी सर्वमान्य झालेला अर्थ स्वीकारण्यास हरकत नसावी. ज्याला फिक् किंवा असे धर्मज्ञान आहे, अशा धर्मपंडिताला ‘फकीह’ अशी संज्ञा आहे. म्हणजेच इस्लामचे शारिअ आणि फिक् अशी दोन शास्त्रे विधिसंग्रह आणि न्यायशास्त्र यांच्याशी अनुक्रमे तुलनीय आहेत, असे दिसते. फिक्चे दोन भाग म्हणजे उसूल व फुरूअ. उसूल हे झाडाच्या मुळांसारखे असून त्यामध्ये कायद्याच्या मूलतत्त्वांचे निर्वाचन केलेले असते; तर फुरूअ हे फांद्यांसारखे असून त्यामध्ये कायद्याच्या निरनिराळ्या शाखोपशाखा (उदा., विवाहविधी) इ. विषयांवर चर्चा केलेली असते. शारिअ आणि फिक् या दोहोंमध्ये मुख्य भेद म्हणजे शारिअ केवळ ईश्वरनिर्मित किंवा प्रेषितनिर्मित आहे, तर फिक् हे शास्त्र मानवनिर्मित आहे. शारिअ मानवाच्या सर्व जीवनाला व वर्तनाला लागू आहे, तर फिक् हे केवळ त्याच्या कायद्याच्या कक्षेतील वर्तणुकीचा विचार करते.
इस्लामी धर्मशास्त्रवेत्ते अल्-गझाली यांनी प्रामुख्याने ‘कलाम’वर (धर्मशास्त्रावर) लिखाण केले असले, तरी त्यांचे अगदी सुरुवातीचे ग्रंथ ‘फिक्’वर आहेत. कुराण, हदीस आणि सुन्नत यांमधून शरीयतचा कायदा अभिव्यक्त होत असल्याने शरीयतचा वेगळा असा ग्रंथ नाही. गेल्या चौदाशे वर्षांत या शरीयतच्या आधारे जे कायदेशास्त्र विकसित झालेले आहे, त्यास फिक् असे म्हटले जाते. या फिक्चा विकास अनेक उत्पत्तिसाधनांतून झाला आहे. ‘कियास’ म्हणजे तर्कशास्त्रातील निगमन पद्धतीचा वापर करून तयार केलेला कायदा. यातून इस्लामी ‘फिक्’चा विकास झालेला आहे. कालौघात सुन्नी आणि शिया पंथाचे आपापले स्वायत्त कायदेशास्त्र प्रस्थापित झाले. तसेच ‘फिक्’चे चार मुख्य प्रवाह किंवा संप्रदाय निर्माण झाले. ते म्हणजे हनफी, मलिकी (मालिकी), शाफई (शाफी) आणि हंबली (हनबली). भारतातील इस्लामी ‘फिक्’चे हे चार आधारस्तंभ आहेत.
संदर्भ :
- Anderson, J. N. D. Islamic Law in the Modern World, London, 1959.
- Coulson, N. J. A History of Islamic Law, Edinburgh, 1964.
- Majid, Khadduri, Islamic Jurisprudence, Baltimore, 1961.
- Schacht, Joseph, The Origins of Mahammadan Jurisprudence, Oxford, 1950.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.