(टर्निप). एक द्विवर्षायू वनस्पती. सलगम ही वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका रॅपा प्रकार रॅपा आहे. ही वनस्पती नवलकोल या वनस्पतीसारखी दिसते. कोबी, फुलकोबी, मोहरी इत्यादी वनस्पतीही ब्रॅसिकेसी कुलातील आहेत. या कुलात सु. ३७२ प्रजाती आणि सु. ४,०६० जाती आहेत. सलगमच्या मांसल सोटमुळांकरिता ही वनस्पती सु. ४,००० वर्षांपासून लागवडीखाली असावी असे मानले जाते. जगातील समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात पांढऱ्या व मांसल सोटमुळांसाठी सलगमची लागवड केली जाते. भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, हरयाणा या राज्यांत तिची लागवड होते. सलगमचा लहान व कोवळा प्रकार भाजीसाठी पिकवतात, तर मोठा प्रकार जनावरांना चारा म्हणून वापरतात.
सामान्यपणे पांढरी साल असलेला (जमिनीवरील १–६ सेंमी. भाग वगळता) सलगमचा प्रकार लागवडीखाली सर्वत्र दिसून येतो. सलगमच्या जमिनीवरील वाढलेल्या भागाचा रंग सूर्यप्रकाशात जांभळा, लाल किंवा हिरवा दिसतो. सलगमचा हा भाग (गड्डा) वस्तुत: खोडाच्या ऊतींपासून तयार होतो, परंतु तो मुळाबरोबर एकजीव झालेला असतो.
सलगम वनस्पतीची पूर्ण वाढ होईपर्यंत सु. दोन वर्षे लागतात. पहिल्या वर्षात या वनस्पतीची वाढ होऊन मुळांमध्ये पोषक घटक साठवले जातात, तर दुसऱ्या वर्षात फुले व बिया येतात आणि वनस्पती मरते. सलगमच्या रोपाची वाढ होताना पहिल्या खोडाच्या लांबीत फारशी वाढ होत नाही. मुळाच्या वरच्या टोकावर एक गडद हिरव्या रंगाच्या केसाळ व मुळ्यासारखा पानांचा झुबका तयार होतो. पाने पातळ व बारीक देठाची असतात; दुसऱ्या वर्षी पानांच्या झुबक्यातून लहान व मजबूत खोड तयार होते. त्यावर अनेक फांद्या असून निळसर पाने येतात. ही पाने आकाराने नवलकोलाच्या पानासारखीच असतात. त्यानंतर फांद्याच्या टोकावर मोहरीच्या फुलांसारखी अनेक, पिवळी फुले झुबक्याने येतात. फळे (शेंगा) कूटपटिक प्रकारची (मोहरीसारखी) असून गुळगुळीत, शुष्क व अनेक बीजी असतात. पहिल्या वर्षाच्या शेवटी पहिले मूळ व त्यावरच्या खोडाचा भाग यांची एकत्र वाढ होऊन ‘गड्डा’ बनतो व त्यालाच सामान्यपणे ‘मांसळ मूळ’ म्हटले जाते. त्याच्या आतील भाग पांढरा व मऊ असतो. गड्ड्याच्या आकारानुसार (लांब, गोल, भोवऱ्यासारखा) तसेच रंगानुसार (पांढरा, पिवळा) सलगमचे प्रकार केले जातात. पिवळ्या मगजाचे सलगम अधिक मोठे, मंदपणे वाढणारे व अधिक पोषणमूल्य असलेले आहे.
सलगमच्या १०० ग्रॅ. गड्ड्यात पाणी – ९३.२ ग्रॅ.; प्रथिने – १.१ ग्रॅ.; मेद – ०.२ ग्रॅ.; कर्बोदके – ४.४ ग्रॅ. असतात. त्यात कॅल्शियम – १३७ मिग्रॅ.; फॉस्फरस – २९ मिग्रॅ.; लोह (आयर्न) – ०.८ मिग्रॅ. ही खनिजे असतात, तसेच अ आणि ब-समूह जीवनसत्त्वे अंशमात्र असून क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असते.
भारतात सलगमचे देशी तसेच परदेशी प्रकार लागवडीखाली आहेत. सलगमचे पर्पल टॉप, गोल्डन बॉल आणि स्नो बॉल हे परदेशी प्रकार; तर पंजाब सफेद, पुसा कांचन, पुसा स्वेती, पुसा चंद्रिमा, पुसा स्वर्णिमा हे देशी प्रकार लागवडीखाली आहेत. भारतात गड्ड्याची भाजी करतात, कढीत घालतात किंवा त्याचे लोणचे करतात आणि पाल्याची भाजी करतात.
रूटबेग (स्वीडिश टर्निप) : इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, कॅनडाचा पूर्व भाग या ठिकाणी सलगमचा पिवळ्या रंगाचा प्रकार आढळतो. ती वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका कँपेस्ट्रिस प्रकार नॅपोब्रॅसिका आहे. कोबी व सलगम यांच्या संकरातून हा प्रकार निर्माण झाला आहे. याची पाने मांसल व निळसर असून त्यांचे देठ तसेच मध्यशीर जाड व मांसल असतात. गड्ड्याच्या टोकाला मानेसारखा भाग असून त्यावर देठाचे पांढरे किण (व्रण) दिसतात. यातील मगज अधिक घट्ट व पोषक असून यूरोपातील हिवाळ्याच्या थंडीतही तो टिकून राहतो. या जातीतील पांढऱ्या मगजाचे गड्डे अनियमित आकाराचे असून त्यावर खरबरीत हिरवी साल असते; पिवळ्या मगजाच्या गड्ड्यावर हिरवी, जांभळी किंवा गर्द तपकिरी रंगाची गुळगुळीत साल असते. फुले मोठी, लालसर किंवा पिवळसर किंवा जांभळट रंगाची असतात. रूटबेग हे क-जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे.