शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा वाढलेले तापमान म्हणजे ज्वर. मनुष्याच्या शरीराचे सामान्य तापमान ३६.५ से. ते ३७.५ से. असते. यातापमानात कोणत्याही कारणांनी वाढ झाल्यास त्या स्थितीला ज्वर म्हणतात. सामान्यपणे याला ‘ताप येणे’ असेही म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान वाढते, तेव्हा थंडी वाजून येते. मात्र वाढलेले-तापमान स्थिर झाले की त्या व्यक्तीला अंग गरम झाल्यासारखे वाटते. ज्वराची कारणे सामान्य तसेच गंभीर असू शकतात. सामान्य ज्वरावर फारसे उपचार करावे लागत नाहीत. तापशामक औषधांचा वापर केल्यास रुग्णाचे तापमान सामान्य होते.

ज्वरमापींचे प्रकार

मेंदूमधील अधोथॅलॅमसचे कार्य तापस्थापी (थर्मोस्टॅट) सारखे असते. ते तापमान नियंत्रित करते. ज्वर निर्माण करणारा तापजनक पदार्थ (पायरोजेन) शरीराबाहेरील असतो किंवा शरीरात निर्माण होतो. या तापजनक पदार्थामुळे प्रोस्टाग्लँडिन ई-२ हे संप्रेरक स्रवते. या संप्रेरकाची अधोथॅलॅमसवर क्रिया होते आणि अधोथॅलॅमसद्वारा शरीराचे ज्वराशी जुळेल एवढे तापमान वाढते. त्वचेमार्फत होणारा उष्णतेचा ऱ्हास थांबविण्यासाठी शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचित होतात. याच्या परिणामी थंडी भरते. जर या उपायांनी शरीराचे तापमान वाढले नाही तर शरीरातील स्नायूंच्या ऱ्हालचालींद्वारे अधिक उष्णता निर्माण होण्यासाठी हुडहुडी भरून येते. जेव्हा ज्वर थांबतो, तेव्हा अधोथॅलॅमसयोजित तापमान उतरते आणि या प्रक्रियांच्या उलट प्रक्रिया घडून येतात तसेच घाम सुटून शरीराचे तापमान कमी होते.

शरीराचे तापमान निरनिराळ्या भागांत वेगवेगळे असते. जसे, तोंड (३७.७ से.) , काख किंवा कान (३७.२ से.), गुदद्वार (३७.५ से. – ३८.३ से.). शरीराचे सामान्य तापमान वय, लिंग, दिवसातील विशिष्ट वेळ, कामाचे स्वरूप इत्यादी घटकांवर अवलंबून असते. व्यायामामुळे व खेळामुळे शरीराचे तापमान वाढते. परंतु त्याला ज्वर म्हणता येत नाही.

सामान्य शरीराचे तापमान ३६.५ से.- ३७.५ से. असते. अतिशीत प्रदेशात किंवा शरीरात पुरेशी ऊर्जा निर्माण न झाल्यास शरीराचे तापमान कमी होऊ लागते. या स्थितीला अवतापन (हायपोथर्मिया) म्हणतात. यावेळी शरीराचे तापमान ३५ से. पेक्षा कमी होते. काही वेळा ज्वरामुळे शरीराचे तापमान ३८.३ से. पेक्षा अधिक वाढते. हे तापमान ४१.२ से. पेक्षा अधिक वाढल्यास मृत्यू ओढवू शकतो. या स्थितीला अतितापन (हायपरथर्मिया) म्हणतात. नेहमीपेक्षा शरीराचे तापमान वाढलेले असणे, हे गंभीर लक्षण समजतात.

ज्वर आल्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपण आजारी असल्याची भावना होते. ज्वराबरोबर मरगळ येणे, निरुत्साही वाटणे, तोंडाची चव जाणे, झोप येणे, कामामध्ये एकाग्र न होणे, शरीराला वेदना होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. ज्वर हे अनेक आजारांचे मुख्य लक्षण आहे. उदा., जीवाणुसंसर्ग (न्यूमोनिया, श्वसनमार्ग दाह, विषमज्वर), हिवताप, फ्ल्यू, त्वचेवरील गळू, सर्दी, कर्करोग,  विषाणुसंसर्ग (गोवर, नागीण) इत्यादींमुळे ज्वरासारखी स्थिती निर्माण होते.

जीवाणू व विषाणूंनी सोडलेल्या विषाचा प्रतिकार करण्यासाठी ज्वर वाढतो. त्वचेतील किंवा बाह्य परजीवीने सोडलेल्या पदार्थामुळे त्या भागाचे तापमान वाढल्यास रक्तप्रवाऱ्हामधून पांढऱ्या पेशी संसर्गस्थानी येतात. ज्वर आल्यामुळे रुग्णाच्या प्रतिकार यंत्रणेस मदत होते. वाढलेल्या तापमानाला व्यक्तीची प्रतिकार यंत्रणा अधिक कार्यक्षम बनते. या यंत्रणेचा वेग वाढतो. अधिक तापमानाला काही परजीवी लवकर नष्ट होतात. रक्ताभिसरणाचा आणि पांढऱ्या पेशींच्या विभाजनाचा वेग वाढतो. परजीवींनी शरीरात सोडलेली विषारी द्रव्ये निरुपद्रवी होतात. टी-लसीका पेशी विभाजनाची क्रिया लवकर होते.

ज्वर आल्यानंतर शरीराचे तापमान ४२ से. झाल्याशिवाय मेंदूवर परिणाम होत नाही. बहुधा बऱ्याचदा आजारात, शरीराचे तापमान ४१ से. झाल्यानंतर ज्वर कमी होत जातो. बालकांमध्ये आणि अर्भकांमध्ये शरीर स्वच्छ ओल्या कापडाने अधूनमधून पुसून काढल्यास ज्वर कमी होतो. खोलीत विजेचा पंखा चालू असल्यास किंवा खोली वातानुकूलित असल्यास रुग्णास आराम मिळतो. तसेच ज्वर नियंत्रणात येतो. मात्र, शरीराचे तापमान ४२ से. एवढे वाढल्यास शरीर थंड पाण्याच्या टबात बुडवून शरीराचे तापमान कमी करावे लागते . ऊष्माघात झाल्यास असे करतात. ज्वर आलेल्या व्यक्तीला क्षार, पाणी, फळे व फळांचा रस दिल्यास अशक्तपणा येत नाही. ज्वर कमी होण्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा. प्रौढ व्यक्तीसाठी पॅरॅसिटॅमॉल या औषधाचा परिणाम लवकर होतो. लहान मुलांमध्ये ज्वराचे नियंत्रण आयब्युप्रोफेन या औषधाने होते. बालकांमध्ये आयब्युप्रोफेन त्वरित परिणाम करते.