व्यक्तीला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या तीन प्रकारच्या भांडवलांपासून जो लौकिक, प्रतिष्ठा, सन्मान प्राप्त होतो, त्याला प्रतिकात्मक भांडवल म्हणतात. प्रतिकात्मक भांडवल हे व्यक्तीच्या समाजातील लौकिकाशी निगडित असून ही प्रतिष्ठा त्या व्यक्तीकडे असलेल्या इतर प्रकारच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या भांडवलांवर अवलंबून असते. प्रतिकात्मक भांडवल ही संकल्पना सर्वप्रथम फ्रेंच तत्त्वज्ञ व समाजशास्त्रज्ञ पिअरी बॉर्द्यू यांनी मांडली. त्यांच्या मते, भांडवल हे केवळ आर्थिक स्वरूपात अस्तित्वात नसून ते सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि प्रतिकात्मक या स्वरूपात अस्तित्वात असते.
वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था व संघटन क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकात्मक भांडवलाला महत्त्व प्राप्त होते. उदा., व्यवसायासारख्या काही क्षेत्रांमध्ये प्रतीकात्मक भांडवल हे नफा मिळविण्याच्या क्षमतेशी जवळून जोडलेले आहे, तर अकादमिक क्षेत्रात ते व्यक्तीची शैक्षणिक पात्रता, प्रकाशने इत्यादी गोष्टींशी जोडलेले असते. धोरणात्मक संप्रेषण आणि जनसंपर्क हे आपापल्या क्षेत्रात प्रतिकात्मक भांडवल निर्माण करण्याचे, तसेच त्याचे संरक्षण करण्याचे संस्थात्मक प्रयत्न करतात. प्रतिकात्मक भांडवलाची संकल्पना आणि लौकिक यांमध्ये खूप जवळचा संबंध असून त्यात साधर्म्य आहे. सामरिक संवाद व जनसंपर्क क्षेत्रांत भांडवलाची संकल्पना आणि लौकिक या दोन्ही संकल्पनांना विशेष महत्त्व आहे. लौकिक म्हणजे योग्यतेतून येणारी प्रतिष्ठा आणि व्यक्तीची एक आदरणीय व सन्माननीयतेची प्रतिमा होय; तथापि बॉर्द्यू यांच्या मते, प्रतिकात्मक भांडवल ही लौकीकापेक्षा अधिक विस्तृत आवाका असलेली बहुआयामी संकल्पना आहे. प्रतिकात्मक भांडवल सत्तेशी असलेले संबंध आणि समाजातील दुवा यांच्या आधारे निर्माण केले जाते.
प्रतिकात्मक भांडवल हे व्यक्तीकडे असलेल्या अनेक भांडवलांपैकी एक भांडवल आहे. भांडवलांमध्ये भौतिक आणि अभौतिक या दोन्ही प्रकारच्या संसाधनांचा समावेश होतो. बॉर्द्यू यांनी राजकीय, वैयक्तिक, कार्यशील/प्रकार्य, व्यावसायिक, भाषिक, बौद्धिक आणि शैक्षणिक या भांडवलांबद्दल विस्तृत लेखन केले आहे. त्यांनी आर्थिक भांडवल, सांस्कृतिक भांडवल (ज्ञान, कौशल्ये, शैक्षणिक पात्रता) आणि सामाजिक भांडवल (सामाजिक संबंधांचे जाळे, एखाद्या गटाचे सदस्यत्व) या तीन प्रकारच्या भांडवलांमधील मूलभूत फरक अधोरेखित केला आहे; तथापि त्याच वेळी वरील सर्व प्रकारचे भांडवल हे प्रतिकात्मक भांडवल मानले जाऊ शकते, असाही युक्तिवाद त्यांनी केला आहे. सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक हे भांडवलदेखील कर्त्याच्या प्रतिकात्मक भांडवलाच्या स्वरूपात कार्य व योगदान देत असतात. सामाजिक भांडवल हे ज्ञान आणि ओळखीच्या तर्काद्वारे नियंत्रित केले जाते. म्हणूनच सामाजिक भांडवल नेहमी प्रतिकात्मक भांडवलाच्या स्वरूपात कार्य करते.
भांडवलाचे प्रकार वेगवेगळे करणे किती कठीण ठरू शकते, हे निवडक क्लब किंवा गटातील सदस्यत्व यांचे उदाहरण देऊन सांगता येते; कारण निवडक गटातील सदस्यत्व हे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच प्रतिकात्मक भांडवल या सर्वांवर अवलंबून असू शकते. तरीसुद्धा व्यक्ती किंवा संस्थेचा लौकिक/प्रतिष्ठा जी त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे सामाजिक रीत्या जोडल्या गेल्यामुळे लाभते, ती नक्कीच प्रतिकात्मक भांडवलाशी निगडित असते. तसेच प्रतिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान भांडवलाच्या मदतीने प्रतिकात्मक भांडवल मिळविले जाऊ शकते. प्रतिकात्मक भांडवल हा व्यापक आणि भांडवलाचा सर्वांत महत्त्वाचा म्हणजे ‘मेटाकॅपिटल’चा एक प्रकार आहे.
प्रतिकात्मक भांडवलाची मुळे इतर प्रकारच्या भांडवलांमध्ये असली, तरी ते एक ‘नाकारलेले’ भांडवलच आहे; कारण ते स्वारस्यपूर्ण संबंध लपविते. प्रतिकात्मक भांडवल हे बक्षिसे आणि पुरस्कारांच्या माध्यमांतून वस्तुनिष्ठ स्वरूपात अस्तित्वात असते; परंतु इतर स्वरूपाच्या भांडवलाच्या विरुद्ध ते मुख्यत्वे व्यक्तिनिष्ठ स्वरूपात असते. असे असले, तरी प्रतिकात्मक भांडवल हे लौकिक किंवा प्रतिष्ठेचा एक अधिकृत मार्ग समजला जातो. ते सत्ता संबंधांना कायदेशीर/अधिकृत मान्यता देते.
संदर्भ :
- Heath, Robert Lawrence; Johanesen, Winni, The International Encyclopedia of Strategic Communication, 2018.
- Richardson, John, Handbook of Theory and Research for the Sociology of Education, USA, 1986.
समीक्षक : वैशाली दिवाकर