मारवाडी बारायेव्ह : (इ. स. अठरावे शतक). भारतीय-रशियन व्यापारी. मूळचा मारवाडी. तो अनेक वर्षे रशियातील ॲस्ट्राखान शहरात राहात होता. त्याचे मूळ नाव ज्ञात नाही. तत्कालीन रशियन कागदपत्रांत त्याचे नाव ‘मारवारी बारायेव्हʼ (Marawari Barayev) असे येते. काही संशोधकांच्या मते, ‘बडा मारवाडीʼ या नावाचे ते रशियन रूप आहे. सतराव्या शतकापासून व त्या पूर्वीही मध्य आशिया, इराण इत्यादी प्रांतांमधील बुखारा, ताब्रिझ, इस्फाहान आदी शहरांत भारतीय व्यापाऱ्यांचे वास्तव्य होते. पुढे त्यांनी कॅस्पियन समुद्रतटानजीकच्या ॲस्ट्राखान शहराकडे मोर्चा वळवला. ॲस्ट्राखान, निझनी नोवगोरोद आणि मॉस्को या प्रमुख शहरांमध्ये शेकडो भारतीय व्यापारी राहात असत. यांमध्ये पंजाबी (मुलतानी), सिंधी किंवा मारवाडी समाजातील व हिंदू होते. साधारणपणे तरुण व्यापारी काही वर्षे राहून पुरेसा पैसा कमवून भारतात परत जात. ते प्रामुख्याने भारतीय व इराणी वस्तू, उदा., मसाल्याचे पदार्थ, सुती व रेशमी कापडे इत्यादी वस्तूंचा व्यापार करीत.
बारायेव्ह भारतातून रशियात कधी आला याची माहिती नाही. त्याने १७२१ च्या आसपास ॲलेक्सी पुच्कोव्ह नावाच्या रशियन माणसाला दिलेले १२ रुबल इतक्या रकमेचे कर्ज परत करण्यास कर्जदार असमर्थ ठरला. त्यामुळे त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी बारायेव्हने स्थानिक शासनाकडे केली होती. यासंबंधीच्या नोंदींत बारायेव्हबद्दलचा सर्वांत जुना उल्लेख येतो. यानंतर त्याने हळूहळू अधिकाधिक रकमांची कर्जे दिल्याचे उल्लेख सापडतात. उदा., १७२४ मध्ये त्याने कुणा इग्नातियेव्ह लुकोयानोव्ह नामक माळ्याला तब्बल २१५ रुबल, तर १७२५ साली ॲस्ट्राखानमधीलच एका आर्मेनियन व्यापाऱ्याला १५५० रुबल इतक्या रकमेचे कर्ज दिल्याची नोंद सापडते. त्या करिता आर्मेनियन व्यापाऱ्याकडील कापडाचा सगळा साठा तारण म्हणून ठेवल्याची नोंदही सापडते.
बारायेव्ह हा सावकारीखेरीज इतरही उद्योगधंदे करत असावा. कारण १७२५ साली त्याच्यामार्फत अझिममेत इश्येयेव्ह नावाचा तार्तारवंशीय माणूस दोन वर्षांसाठी नोकर म्हणून सांझाता नावाच्या काल्मिकवंशीयाने ठेवल्याची नोंद सापडते. बारायेव्हच्या यशाची कमान आता चढती होती. कारण १७२६ मध्ये त्याने अन्य भारतीयांनी दिलेली ३०४७ रुबल रकमेची बावन्न कर्जे विकत घेतली होती. याच सुमारास बारायेव्हने दिलेली इतर काही कर्जे त्याच्या आणि इतरांच्याही व्यवसायाची एक वेगळी बाजू दर्शवतात. १७२६ मध्ये त्याने ॲस्ट्राखानमध्येच राहणाऱ्या बामामेत झांचेल्द्येव नावाच्या तार्तारवंशीय व्यापाऱ्याला ४४० रुबल इतक्या रकमेचे कर्ज दिले. त्या बदल्यात झांचेल्द्येव ॲस्ट्राखानहून इराणमधील गिलान शहरी जाऊन काही वस्तू आणणार व बारायेव्ह त्या चालू बाजारभावाने विकत घेणार अशी तरतूद होती. अशा प्रकारची कर्जे त्याने इतरही अनेकांना दिली. यातून त्याला साठेबाजीद्वारे किंवा घाऊक भावाने खरेदी करून फुटकळ भावाने विकण्याद्वारे फायदा झाला असावा. सावकारीसोबतच अशी आयातीकरिता कर्जे देणे हा बारायेव्हच्या वाढत्या व्यापाराचा एक महत्त्वाचा भाग झाला होता. अनेकदा कर्जदार तारण म्हणून घरे गहाण ठेवत. परिणामी कर्जफेडीत अपयश आल्यावर बारायेव्ह स्थानिक शासनाच्या मदतीने त्यांची मालमत्ता ताब्यात घेत असे. अशाप्रकारे त्याने अनेकांची मालमत्ता ताब्यात घेतली होती. त्याचे एक उदाहरण १७२७ साली सापडते. त्या वेळी त्याने ॲस्ट्राखानच्या सुभेदाराकडे अर्ज केला की, ५७ रुबल इतक्या रकमेचे कर्ज फेडण्यात अपयश आल्यामुळे कर्जदाराची मालमत्ता आपल्या हवाली करण्यात यावी. त्यावर सुभेदाराने त्याचे म्हणणे मान्य करणारे फर्मान काढले. एका कर्जदाराने स्वत:ची बायको व मुलगी यांना तारण ठेवल्याचीही नोंद आहे. याखेरीज बारायेव्ह हा रशियनांसोबतच भारतीयांनाही कर्ज देत असे. गुलाबरा ओतोमचंद नामक भारतीय व्यापाऱ्याने १७३१ मध्ये बारायेव्हकडून २५० रुबलचे कर्ज घेतले होते व तारण म्हणून स्वत:ची पूर्ण स्थावर मालमत्ता ठेवली होती.
बारायेव्हशी १७३५ मध्ये रशियन राजघराण्याने एका महत्त्वाच्या गोष्टीकरता संपर्क साधला. भारत व रशियाचा बहुतेक व्यापार हा पूर्वापारपासून इराणमार्गे होत असे; परंतु त्या सुमारास इराणमध्ये नादिरशहाच्या युद्धांमुळे अर्थव्यवहार बऱ्याच प्रमाणात विस्कळीत झाले होते. इराणमधील भारतीय व्यापारी रशियात जाऊ लागले. त्यावर तोडगा म्हणून ओरेनबुर्ग शहराद्वारे भारत व मध्य आशियाशी व्यापार करण्याचे ठरले. या कामी राजघराण्याने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी या पर्यायी मार्गाच्या एकूणच गुणावगुणांची चर्चा करण्यासाठी बारायेव्हचा सल्ला विचारला. उत्तरादाखल बारायेव्हने एक अहवाल तयार केला. त्यात त्याने नादिरशहाच्या उदयामुळे इराण व ॲस्ट्राखानमधील व्यापार घटल्याचे मान्य केले व दिल्ली ते ॲस्ट्राखान एकूण चार मार्ग असल्याचे सांगून बुखारामार्गे सर्वांत जलद जाता येऊ शकते, हे दाखवून दिले. पूर्वी ॲस्ट्राखानला दरवर्षी सु. २०० भारतीय व्यापारी येत, तर नादिरशहामुळे त्यांची संख्या ८० वर येऊन ठेपली होती; परंतु बुखारा-ओरेनबुर्ग या मार्गावर पुरेशी सुरक्षितता दिली, तर एका वर्षभरात तब्बल ६०० भारतीय व्यापारी येतील, अशी हमीही बारायेव्हने दिली. तसेच त्याने काही रशियन व भारतीय वस्तूंची यादीही दिली. राजघराण्याकडून होकार आल्यावर बारायेव्हने सुरुवातीला ओरेनबुर्गहून स्वत: व्यापार करणे आणि काबूल-बुखारा-ओरेनबुर्ग या मार्गावर स्वत:चे गुमास्ते पाठवणे अपेक्षित होते. रशियातील सर्वांत प्रबळ भारतीय व्यापाऱ्याचे अनुकरण अन्य व्यापारीही करू लागतील ही अटकळ त्या मागे होती. या व्यापारासाठी त्याला १७३६ मध्ये तत्कालीन राणी ॲना इव्हानोव्हनाच्या आदेशावरून १००० रुबल इतकी रक्कम आगाऊ म्हणून देण्यात आली. त्याच्या आर्थिक क्षमतेसोबतच रशियन भाषेचे त्याला असलेले ज्ञान हेही त्याच्या निवडीमागील एक महत्त्वाचे कारण होते. त्याने पाठवलेले लोक परत येईपर्यंत ॲस्ट्राखानमधील त्याची मालमत्ता राजघराण्याकडे सुपुर्द करण्यात आली.
बारायेव्ह ओरेनबुर्गहून वाटाघाटी संपवून ॲस्ट्राखानला परत येताच ॲस्ट्राखानमधील सुभेदाराने क्षुल्लक कारणावरून त्याला तुरुंगात टाकले. रशियाच्या पौर्वात्य व्यापाराचे केंद्र ॲस्ट्राखानहून ओरेनबुर्गला हलले, तर ॲस्ट्राखानचे महत्त्व जाईल आणि सुभेदाराला मिळणाऱ्या उत्पन्नातही घट होईल हे उघड असल्याने ही अटक झाली होती. काही काळाने त्याची सुटका करण्यात येऊनही त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. ॲस्ट्राखानमधील शासनाने तब्बल ५०,००० रुबल किमतीची बारायेव्हची मालमत्ता जप्त केली व ती त्याला परत देण्यात आली नाही. व्यापाराला उत्तेजन देण्याच्या नादात त्याला जबर फटका बसला होता. बारायेव्हने नंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारून पेत्र फेदोरोव असे नाव धारण केल्याचाही उल्लेख सापडतो. १७३९ नंतर मात्र त्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही.
संदर्भ :
- Das Kundu, Nivedita, ‘Indo-Russian Trade Relations : an Overviewʼ, India Quarterly, 57 (3): 119-138, https://www.jstor.org/stable/45073249, 2001.
- Gopal, Surendra, Born to trade: Indian Business Communities in Medieval and Early Modern Eurasia, Manohar Publishers, New Delhi, 2017.
- Wanner, M., ‘Indian Trading Community in Astrakhan in Context of Russian-Indian Relationship (1636–1725)ʼ, West Bohemian Historical Review, 1: 115-131, 2012.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर