पश्चिम आशियातील एक महत्त्वाचा देश व पूर्वीच्या सोव्हिएत संघराज्यातील एक घटक राज्य असलेला आर्मेनियाचा इतिहास प्राचीन आहे. इ. स. चौथ्या शतकात आर्मेनियात ख्रिस्ती धर्म प्रस्थापित झाला. प्राचीन काळी कधी रोमन, तर कधी इराणी साम्राज्याखाली येणारा हा प्रदेश, पुढे अरबी खिलाफत काळात अंशत: स्वतंत्र बनला. मंगोल आक्रमणांच्या काळात सायलेशियन आर्मेनियाच्या शासकांनी आपले राज्य वाचवले; परंतु इ. स. चौदाव्या शतकात मात्र मामलूकांनी व तैमूरलंगाने केलेल्या आक्रमणांत हे राज्य नष्ट झाले आणि आर्मेनियनांच्या स्थलांतराला सुरुवात झाली. तेथून ते यूरोपसह अन्य देशांत पसरले. पोर्तुगीजांपूर्वी भारतात अनेक ठिकाणी आर्मेनियन लोक येत होते.
आर्मेनियन लोक जसजसे पूर्वेकडे सरकू लागले, तसतसा त्यांनी इराणमधील होर्मुझ बंदराकडे आपला मोर्चा वळवला व तेथून भारत आणि आग्नेय आशियाशी चालणाऱ्या व्यापारात सहभाग घेणे सुरू केले. भारतात मोठ्या संख्येने येण्यामागे त्यांचे इराणमधील वास्तव्यही कारणीभूत होते. या वास्तव्यामागे त्यांच्या व्यापारी प्रेरणेसोबतच इराणी सफावी राजा शाह अब्बास पहिला याचाही मोठा वाटा आहे. ऑटोमन तुर्की साम्राज्याशी शाह अब्बासने मोठा संघर्ष केला. त्यातील एका लढाईत १६०३-०४ मध्ये त्याने आर्मेनियाची राजधानी येरेवानला वेढा घालून ते शहर काबीज केले व हजारो आर्मेनियन लोकांना तेथून व अन्य शहरांमधून इराणला आणले. इस्फाहान या त्याच्या नव्या राजधानीत त्याने आर्मेनियन लोकांसाठी न्यू जुल्फा नामक एक वेगळा भाग मुक्रर केला व त्यांची वस्ती उभारली. या न्यू जुल्फामधील आर्मेनियन समाज हा भारतातील बहुतांश आर्मेनियन समाजाचा पूर्वज होय. १६०० नंतर भारतात आलेल्या बहुतांश आर्मेनियन लोकांचे तेथील समाजाशी कौटुंबिक संबंध असत.
भारतात आल्यावर आर्मेनियन लोकांनी व्यापारावर लक्ष केंद्रित केले आणि त्यासोबतच अनेक राजघराण्यांशीही संबंध प्रस्थापित केले. दोमिंगो पिरेस नामक एक आर्मेनियन माणूस अकबराच्या दरबारी पोर्तुगीज दुभाष्याचे काम करीत असे. ख्रिस्ती धर्माची खोलवर माहिती असलेले धर्मवेत्ते पाठवावेत, या मागणीकरिता १५८० साली अकबराने त्याला आपल्या वकिलासोबत गोव्याला पाठवले होते. अकबरानंतर जहांगीरच्या काळातही काही उच्चपदस्थ आर्मेनियन सापडतात. उदा., मिर्झा झुल्कारनैन. याचा बाप सिकंदर मिर्झा हा आलेप्पोहून आलेला व्यापारी अकबराच्या दरबारी असून, आई ज्युलिआना ही मोगल जनानखान्याची महिला वैद्यक (डॉक्टर) होती. ज्युलिआनाचा बाप अब्दुल हाई हा मोगल साम्राज्यात काझी म्हणून कार्यरत होता. स्वत: मिर्झा झुल्कारनैन हा वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मोगल राजपुत्र शाहजहानसोबतच वाढला. पुढे राजस्थानातील सांभर सरोवरापासून मिळणाऱ्या मिठाच्या व्यापाराच्या व्यवस्थापकपदी त्याला नेमण्यात आले. १६५४ साली निवृत्त झाल्यावर त्याचे निवृत्तीवेतन दर दिवसाला तत्कालीन तब्बल १०० रुपये इतके होते. जहांगीरनेच त्याच्याकडे आलेल्या इंग्लिश शिष्टमंडळातील एकाचे लग्न आपल्या पदरच्या मरियम नामक एका आर्मेनियनवंशीय स्त्रीशी लावून दिले, पुढे ती इंग्लंडलाही जाऊन आली.
इ. स. १६०० नंतर भारतातील बहुतांश आर्मेनियन हे इराणमधून आलेले असल्याने त्यांना साहजिकच फार्सी भाषेचे उत्तम ज्ञान होते. तत्कालीन राज्यकारभाराची भाषा फार्सी असल्याने सरकारदरबारी आर्मेनियन्सना याचा फायदा झाला. फार्सीचे ज्ञान, भारत आणि इराण, अरबस्थान, आग्नेय आशिया, इ. भागांशी व्यापाराचा मोठा अनुभव यांमुळे भारतातील राजसत्तांशी करारमदार करताना यूरोपियनांना आर्मेनियनांची मोठी मदत झाली. अनेकदा ते आर्मेनियन लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून पाठवत असत. आर्मेनियनांना इंग्लिश व डच वसाहतींत आपापले धर्माचार पाळायची मुभा देण्यात आली होती. डच व इंग्लिश ईस्ट इंडिया कंपन्यांमधील अनेकांनी त्यांच्या भांडवलाचा व व्यापारी संबंधांचा लाभ आपल्याला मिळावा, या कारणांसाठी आर्मेनियन स्त्रियांबरोबर लग्नेही केली. कंपनीच्या अधिकृत व्यापारासोबतच अनेकजण खाजगी व्यापारही करत. खोजा वाजिदसारखे धनाढ्य व्यापारी आणि ख्वाजा जेकब पेट्रुससारखे शूर सेनानी हे आर्मेनियन होते.
मोगल साम्राज्याचे विघटन, मराठेशाहीचा प्रसार आणि अखेरीस इंग्रजी अंमल यांसारख्या मोठ्या राजकीय स्थित्यंतरांचा भारतातील आर्मेनियन समाजावर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. भारतभर त्यांची वसती होती, त्यातही उत्तर भारतात जास्त होती. दक्षिणेत मद्रासमध्ये (चेन्नई) तसेच पश्चिमेत मुंबईलाही कित्येक आर्मेनियन्स होते. इ. स. सतराव्या शतकापासून मुंबई बेटावर त्यांची वसती असल्याचे उल्लेख आहेत. फोर्ट भागात दोनशे वर्षे जुने एक आर्मेनियन चर्चही आहे. मद्रासला १७९४ साली फादर हारुत्युन शामोवान्यान यांनी अझारदार नावाचे जगातील पहिले आर्मेनियन भाषिक वृत्तपत्रही काढले होते. हे सु. दीड वर्ष चालले. सांप्रत भारतातील आर्मेनियन्सची संख्या नगण्य असून त्यांच्या इतिहासावर विशेष काम झालेले नाही.
संदर्भ :
- Seth, Mesrovb Jacob, Armenians in India from the earliest times to the present day, Calcutta, India, 1937.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर