चॉसर, जेफ्री : ( १३४२-४३ – २५ ऑक्टोबर १४००). जेफ्री चॉसरला इंग्रजी साहित्याचा व इंग्रजी कवितेचा पितामह तसेच इंग्रजीतील पहिला कवी आणि इंग्लिश होमर म्हणून संबोधले जाते. चॉसरच्या निदान चार पिढ्या या मध्यमवर्गीय लंडन निवासी इंग्लिश लोकांच्या होत्या. त्याचे वडील जॉन चॉसर हे तिसऱ्या एडवर्डच्या राजदरबाराशी निगडीत होते आणि त्यांचा मद्याचा व्यापार होता. त्याच्या आईचे नाव ॲग्नेस होते. जेफ्री चॉसरचे आजोबा रॉर्बट चॉसर यांनी अपर टेम्स स्ट्रीटवर बांधलेल्या घरात जेफ्रीने बालपणीची काही वर्षे व्यतीत केली. चॉसरचे आजोबा रॉर्बटने मद्यावरील कर गोळा करण्याचे काम केले होते. १३६६ मधे जेफ्री चॉसरने फिल्लप्पा पॅन हिच्याशी विवाह केला. तीसुद्धा राजदरबारात तिसरा एडवर्ड याच्या राणीच्या सेवेत होती. आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत संपन्न आयुष्य चॉसरने व्यतीत केले आहे. चॉसरला आणि त्याच्या पत्नीला राजदरबारातून उत्तम निवृत्तिवेतन सुद्धा प्राप्त झाले होते. त्याला दोन मुलं आणि दोन मुली होत्या.

चॉसर हा शब्द फ्रेंच शब्दावरून आलेला आहे. याचा अर्थ पादत्राणे बनवणारा असा होतो. मद्य आणि चामडे उद्योगातून चॉसर कुटूंब सधन झाले होते. चॉसरच्या औपचारिक शिक्षणाबद्दल कुठलेही संदर्भ उपलब्ध नाहीत. पण त्याला फ्रेंच, लॅटिन व इटालियन अशा तीन भाषा अवगत होत्या आणि त्यांने मध्ययुगीन इंग्रजीमधून लिहिलेल्या साहित्यकृती आणि त्याच्या समकालीन तसेच मध्ययुगीन पूर्वकाळात इतर भाषांमध्ये लिहिल्या जात असणाऱ्या महत्त्वाच्या ग्रंथांच्या आशय आणि अभिव्यक्तीमध्ये कमालीचे साधर्म्य होते. प्रशासकीय कामकाज, व्यापार-उदीम, परराष्ट्र व्यवहार आणि राजदरबाराशी निगडित अनेक जबाबदाऱ्या यामुळे चॉसरने रात्री उशिरा जागून आपले लेखन आणि वाचन केले आहे. या जबाबदाऱ्यांमुळे त्याच्या अनेक साहित्यकृती अपूर्ण राहिलेल्या आहेत. द कँटरबरी टेल्स ही त्याची जगविख्यात काव्यरचना आहे. त्याचे फ्रेंच, इटालीयन व लॅटीन भाषेवर प्रभुत्व होते. या भाषांमधील साहित्यकृती त्याने मध्ययुगीन इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या आहेत. चॉसरने सर्वप्रथम इंग्रजी भाषेत प्रचलित केलेल्या असंख्य शब्दांची नोंद ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने घेतलेली आहे. फ्रेंच भाषेऐवजी लंडन शहरातील सर्वसामान्य लोक बोलत असणाऱ्या मध्ययुगीन इंग्रजी भाषेमधून सर्वप्रथम काव्यरचना करण्याचे श्रेय चॉसरला जाते.

चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्याने लोकप्रशासन आणि राजदरबारात एक मुत्सद्दी भूमिका बजावलेली होती. तिसरा एडवर्ड, दूसरा रिचर्ड आणि चौथा हेन्री या रांजांचा त्याने विश्वास संपादन करून परराष्ट्र संबंधांचे व्यवस्थापन करणारा राजनीतितज्ञ म्हणून महत्वाच्या भूमिका बजावल्या. यासाठी त्याने स्पेन, इटली व फ्रान्सला भेटी दिल्या. तरुणपणी फ्रान्सशी झालेल्या युद्धात सैनिक म्हणून तो सहभागी झाला होता. तो व्यवसायाने लेखक नव्हता. राजदरबारात सनदी अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळातील त्याच्या कविता राजदरबारातील लोकांना आनंददायी वाटतील अशी प्रेमकाव्यं आहेत. कविता रचनेमध्ये आघात वृत्ताचा उपयोग इंग्रजी भाषेत प्रथम चॉसरने केला. मध्ययुगीन फ्रेंच कवी गीयोम द माशोने केलेल्या आघात वृत्ताचे अनुकरण करून चॉसरने ७, ८ व ९ ओळींची कडवी आणि त्याला धृवपद जोडलेले अशी काव्यरचना केली. त्याने नवीन आघात वृत्तांचा उपयोग त्याच्या काव्यरचनेत केलेला आहे. ८ ओळींचे कडवे आणि त्यामध्ये पहिली आणि तिसरी ओळ यांची यमकं जुळलेली आहेत. याच रचनेची तीन वेळा पुनरावृत्ती करून आणि त्यास ध्रुवपद जोडून त्याने काही काव्यरचना केलेल्या आहेत. आघात वृत्त त्याने पहिल्यांदाच इंग्रजी भाषेत वापरले. सात ओळींचे कडवे आणि त्याला दोन ओळींचे ध्रुवपद आणि अत्यंत सुटसुटीत वृत्तांचा वापर तसेच कथनात्मक संवादी शैली हे त्याचे इंग्रजी कवितेतील योगदान आहे.

द कँटरबरी टेल्स  इंग्रजीमधील अजरामर काव्य रचना मानली जाते. मध्ययुगीन इंग्लंडमधील समाजजीवनाचे अत्यंत सूक्ष्म चित्रण या कथात्मक काव्यामध्ये प्रतिबिंबित झालेले आहे. १३८७ ते १४०० च्या दरम्यान चॉसरने याची रचना केली आहे. सेंट टॉमस बेकेट यांच्या पवित्र दफन स्थळी तीस यात्रेकरू लंडनमधून टेम्स नदी ओलांडून जायला निघालेले आहेत. यात सहभागी असणाऱ्या यात्रेकरूंनी एकमेकांना ज्या कथा सांगितल्या, त्या म्हणजे कँटरबरी टेल्स. त्याने रंगवलेल्या व्यक्तिरेखा आणि कथन केलेल्या गोष्टी यातून तत्कालीन इंग्लंडमधील समाज जीवन तसेच चर्च या संदर्भातील नेमकी आणि औपरोधिक शैलीतील मल्लिनाथी येते.

चॉसरच्या साहित्यकृतींची तीन कालखंडात विभागणी करता येईल. पहिला कालखंड हा चॉसर इटलीला जायच्या अगोदरचा म्हणजे १३५९-७२ असा काळ आहे. या कालखंडात चॉसरने फ्रेंचमधील ‘रोमां द् ला रोझ‘ या दीर्घ प्रेमकवितांचा अनुवाद इंग्रजीमध्ये केला आहे. त्याने मूळ कवितेतील स्त्रिया व ख्रिस्ती पाद्री यांच्या संदर्भातील उपरोध नेमकेपणाने इंग्रजी कवितेत उतरवला आहे. ही दीर्घ कविता तीन तुकड्यांमध्ये लिहिली गेली होती त्यातील दोन तुकडे १४३०-४० च्या सुमारास उपलब्ध झाले होते. १३६९ मधे जॉन ऑफ गाँटची प्रथम पत्नी मृत्यू पावली तेव्हां तिला आदरांजली म्हणून चॉसरने  ‘द डेथ ऑफ ब्लांच द डचेस’ (द बुक ऑफ द डचेस) ही पहिली स्वतंत्र कविता लिहिली. त्याच्या कवितांचा दुसरा कालखंड १३७२ ते १३८६ हा आहे. या कालखंडातील कवितांवर इटालियन कवितेचा गडद परिणाम जाणवतो विशेषतः दान्तेचे डीव्हाइन कॉमेडी आणि बोकाचीओच्या टीसीई व फिलीस्ट्रॅटो या साहित्यकृतींचा प्रभाव होता.

तिसऱ्या कालखंडातील त्याच्या कविता या स्वतंत्र स्वरूपात चॉसरने लिहील्या होत्या.’लेजंड ऑल गूड विमेन’ या कवितेमधे चॉसरने प्रथम हीरोइक कपलेटचा (द्विरुक्त यमकरचना)  वापर केला. कालानुक्रमे पुढीलप्रमाणे चॉसरच्या महत्त्वाच्या कविता आहेत. ‘ओरीजीन्स अपॉन द मदलेना’, ‘बुक ऑफ लीओन ‘आणि ‘सीअस ॲण्ड ॲलोसायन’ (यातील काही भाग ‘द बूक ऑफ डचेस’मधे उपलब्ध आहे). ‘रोमान्स ऑफ द रोझ‘ (१३७२ पूर्व) चॉसरची ही दीर्घ कविता उपलब्ध आहे. अक्षर क्रमानुसार त्याने पुढीलप्रमाणे काही ‘मायनर पोएम्स’ची रचना केलेली आहे. ‘द बूक ऑफ द डचेस’, ‘लाइफ ऑफ सेंट सीसील’, ‘सेकंड बन्स टेल’, ‘मंकस् टेल’, ‘क्लार्कड् टेल’ ,’प्लॅकन अँण्ड आरसाईट’, ‘कंम्लेट टू हीज लेडी’, ‘ॲन ॲमरस कंम्लेंट मेड ॲट विंन्च’, ‘वूमनली नोबलेस’, ‘कंम्लेंट अन टू पीटी’, ‘ॲनालिडा ॲण्ड ॲनालिडा’, ‘द टेल ऑल मेलेबियूस’, ‘द पिरसॉनस् टेल’, ‘मॅन ऑफ लॉज टेल’, ‘ट्रान्स्लेशन ऑफ बवीथीअस’, ‘कम्लेंट ऑफ मास’, ‘ट्रोॲलस ॲण्ड क्रॅसेडा’, ‘वर्डस् ऑफ ॲडम’, ‘द फॉर्मर एज’, ‘फॉर्च्यून’ , ‘पार्लमेंट ऑफ फाउल्स’, ‘हाउस ऑफ फेम’ ,’लेजंड ऑफ गूड विमेन’, ‘कंम्लेट ऑफ व्हीनस’,’एनव्हॉय ऑफ स्कोगॅन’, ‘एनव्हॉय ऑफ बकटन’, ‘एनव्हॉय टू कंम्लेट टू हीज पस’ इत्यादी. १३८० – १३९६ या दरम्यानच्या त्याच्या काही कथात्मक कविता : ‘मर्सीलेस ब्यूटी’, ‘ब्लेड ऑफ रोझामेड’, ‘अगेन्स्ट विमेन अनकॉन्सटंट’, ‘कंम्लेट टू हीज पस’, ‘लॅक ऑफ स्टेडफास्टनेस’,’जनंटायल्स’, ‘ट्रुथ’, ‘प्रोव्हर्बस ऑफ चॉसर’ इत्यादी.

इटालियन साहित्यातून तसेच लॅटिन आणि फ्रेंच कवितेतून प्रेरणा घेऊन अनेक कथा काव्य रुपाने मध्ययुगीन इंग्रजीतून चॉसरने रचल्या आहेत. १४ व्या शतकातील या कविच्या रचना कालातीत आहेत. त्यांने उच्चस्तरापासून खालच्या स्तरापर्यंत अशा सर्व सामाजिक श्रेणीतील अनुभव तसेच राजापासून रंकापर्यंत सर्व व्यक्तिरेखा, त्यांचे परस्परातील ताणेबाणे, संघर्ष एका नर्मविनोदी उपरोधिक शैलीतून रंगवले आहेत. देशोदेशीच्या तसेच इंग्लंडमधील राजदरबारापासून सामान्य स्तरातील त्याने घेतलेल्या अनुभवांमधून त्याने अनेक व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत. इंग्रजी कवितेमध्ये कथात्मकता तसेच संवाद आणण्याचे श्रेय चॉसरला जाते. त्याने स्वतः अनुभवातून प्राप्त केलेले आणि त्याच्या कथात्मक कवितेतून अभिव्यक्त होणारे ज्ञान सर्व काळात सुसंगत ठरणारे आहे.

वयाच्या साठाव्या वर्षी चॉसरने वेस्टमिनिस्टर येथे त्यानेच बांधलेल्या नूतन वास्तूत अखेरचा श्वास घेतला. वेस्टमिनिस्टर ॲबे, पोएटस् कॉर्नर या साहित्यिकांच्या दफनभूमीत दफन केला गेलेला पहिला साहित्यिक जेफ्री चॉसर होता .

संदर्भ :