लाल, रतन :  ( ५ सप्टेंबर १९४४ ) रतन लाल यांचा जन्म पश्चिमी पंजाब, (पूर्वीचा ब्रिटिश भारत, सध्याचे पाकिस्तान) येथील  करयाल  गावी झाला. रतन लाल यांचे कुटुंबीय फाळणीनंतर भारतात आले. त्यांचे शालेय शिक्षण शासकीय माध्यमिक विद्यालय, राजौंद, जिल्हा कैथल, हरियाणा येथे झाले. त्यांनी बी.एस्सी. (कृषी) पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना, पंजाब येथून, तर एम.एस्सी. (मृदा),भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली आणि पीएच्.डी. (मृदा), ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी, कोलंबस, ओहायो, यूएसए येथून संपादन केली.

रतन लाल यांनी वरिष्ठ संशोधन फेलो म्हणून  सन १९६८ ते १९६९ सिडनी विद्यापीठ, सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे तर  सन १९७० ते १९८७ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ  ट्रॉपीकल अॅग्रीकल्चर (आयआयटीए), इबादान, नायजेरिया येथे मृदा भौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम केले. तदनंतर ओहियो राज्य विद्यापीठातील अन्न, कृषी आणि पर्यावरणशास्त्र महाविद्यालयामध्ये ते मृदा विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ‍‍‌रुजू झाले आणि आजपर्यंत तेथेच कार्यरत आहेत.

त्यांनी आपल्या संशोधनाची सुरुवात नायजेरिया येथे केली. मातीचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आशिया, दक्षिण-पूर्व आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, दक्षिण अमेरिका, कोलंबिया, ब्राझील, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी देशात त्यांनी मातीवर विविध प्रकारचे संशोधन करताना अनेक प्रकल्पही विकसित केले. त्यांनी अनेक प्रयोगांती, मातीचा कस वाढविणारी आच्छादन पिके घेऊन, शेत जमिनीवर आच्छादनासाठी पालापाचोळ्याचा व तणाचा वापर करून, उष्णकटिबंधीय क्षेत्रातील मातीची धूप नियंत्रणात ठेवणारी जैविक पद्धती विकसित केली. उष्ण कटिबंधातील जमिनींच्या शाश्वत व्यवस्थापनाचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी संदर्भ मार्गदर्शिकादेखील बनवली. मृदा कार्बन व्यवस्थापनाद्वारे धूप झालेल्या जमिनीच्या सुपीकतेचे पुनर्संचयन करणे आणि मृदा आरोग्य सुदृढ करण्याचे तंत्र त्यांनी प्रस्थापित केले. अन्नधान्य पिकविणारी माती ही सजीव असून, पिकांसाठी तिचे आरोग्य अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी मांडले. त्यांनी आपल्या मृदाशोध कार्यातून हवामान बदलाचे परिणाम, हरितगृह परिणाम सौम्य करण्यासाठी मृदा सेंद्रिय कार्बन जमिनीतच जखडून अ‍ॅग्रो-इकोसिस्टम्सची सधनसंपदा टिकावू स्वरुपात वाढविण्याचे आणि व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान प्रस्थापित केले. पूर, दुष्काळ आणि जलवायू परिवर्तन, हरितगृह वायू उत्सर्जन, इत्यादी गोष्टींचा पिकावर अनिष्ट परिणाम होऊ न देणाऱ्या त्यांच्या प्रयोगांनी क्रांती घडवली. रतन लाल हे ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ (आयपीसीसी) चे घटक होते तेंव्हा या संस्थेस लाल यांच्या याच संशोधन कार्याबद्दल शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.

त्यांनी विकसित केलेल्या अनेक तंत्रज्ञानांमुळे अन्न आणि पोषण सुरक्षितता मिळण्यास मदत झाली. मृदा संवर्धनासाठी राबवलेल्या या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा फायदा ५० कोटीपेक्षा अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांना झाला आहे. त्यांच्या अन्न आणि पोषण सुरक्षिततेच्या संदर्भातील प्रमुख योगदानामुळे दोन अब्ज लोकांच्या अन्नसुरक्षेमध्ये सुधारणा होऊ शकली. उष्णकटीबंधीय प्रदेशांतील लाखो हेक्टरमधील पर्यावरण वाचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यामुळे लक्षावधी हेक्टर क्षेत्रातील नैसर्गिक परिस्थिति जतन करणे शक्य झाले. त्यांनी संस्थात्मक सोयी संशोधनातून नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन रचनात्मकरित्या करून, मृदा उत्पादकता आणि पर्यावरणीय गुणवत्ता वाढविता येते असे दाखवून दिले. त्यांच्या मते सर्व प्रकारच्या जैवविविधतेत माती हा सजीव घटक आहे. त्यांनी आपल्या संशोधनांतून दाखवून दिले की माती जर निरोगी असेल तर, कमीत कमी क्षेत्रावर, कमी मशागत करून, रसायनांचा वापर कमी करून किमान पाण्यात आणि कमी ऊर्जेतही अन्नधान्याचे अधिकाधिक उत्पादन घेता येऊ शकते. मातीचे आरोग्य चांगले ठेवले, तर ती पावसाचे पाणी उत्तम टिकवून ठेवते, प्रदूषक गाळते आणि सर्व प्रकारच्या सजीवांसाठी निवासस्थानही पुरवते.

रतन लाल भारतीय मृदेचे अवलोकन करताना म्हणतात की पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यासारख्या अनेक राज्यात, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष जाळण्याच्या पारंपारिक प्रक्रियेमुळे पिकांपासून उपलब्ध होणारे सेंद्रिय पदार्थ नष्ट पावतात. त्यामुळे अशा अनेक राज्यांच्या मातीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण ०.२ ते ०.५ इतके कमी झाले आहे. या सेंद्रिय घटकांचे मातीतले प्रमाण किमान २ टक्के तरी असले पाहिजे. पिकांचे उरलेले अवशेष जाळून न टाकता ते मातीत मिसळले तर मातीचे सत्त्व टिकून राहील. त्यांच्या मते शेतामध्ये अधिक पिके घेतली तर जमिनीत जास्त सेंद्रिय पदार्थ (सेंद्रियकर्ब) शिल्लक राहतील आणि मातीचे आरोग्य बाधित राहील. माती अधिक सकस आणि उपजाऊ बनेल. यासाठी भारताने माती सुरक्षिततेसाठी योग्य धोरण आखणे जरुरीचे आहे. त्यापुढे जाऊन ते असे सुचवतात की दर पाच वर्षातून एकदा मातीच्या आरोग्याचा अहवाल तयार करून त्यानुसार मातीची सुपीकता व पोषण मूल्ये कायम राखण्यासाठी उपाययोजना राबविण्यात यावी.

लाल यांच्या अलौकिक संशोधनाच्या आणि विकासाच्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान  मिळाले आहेत. यूरोप, अमेरिका आणि आशियामधील एकूण सात विद्यापीठातून होनोरिस कॉसा (डॉक्टर ऑफ सायन्सची) ही मानद पदवी त्यांना मिळाली. त्यांना प्राप्त झालेल्या अनेक पुरस्कारा पैकी; प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पारितोषक, स्पेनचा मेडल ऑफ ऑनर पुरस्कार, एफएओ, रोमतर्फे ग्लिंका वर्ल्ड सौईल प्राईज तर जीसीएचईआरए चीनतर्फे जागतिक कृषी पुरस्कार, आणि यू.एस. अवस्थी इफ्को पारितोषक इ. पुरस्कार नमूद करण्यासारखे आहेत. त्याच वर्षी त्यांना जपानचा जैविक उत्पादन, पर्यावरणशास्त्र पुरस्कार त्यांच्या, वैश्विक अन्न सुरक्षा आणि हवामान बदलांचे परिणाम शमनसाठी शाश्वत मृदा व्यवस्थापन या कार्याबद्दल देण्यात आला. मृदेची गुणवत्ता वाढवून छोट्या शेतकऱ्यांना मदत करणे आणि अन्नधान्याचा जागतिक पुरवठा वाढवणे या कामी दिलेल्या योगदानासाठी रतन लाल यांना कृषी क्षेत्रातील नोबेल गणले जाणारे वर्ल्ड फूड प्राइजदेखील प्रदान केले गेले.

रतन लाल यांनी एकूण ११२ पदव्युत्तर आणि डॉक्टरेट विद्यार्थ्याना त्यांच्या पदवीसाठी मार्गदर्शन केले. तसेच ५४ पोस्ट डॉक्टरल विद्यार्थ्याना, आणि जगभरातून भेट देणाऱ्या १८० वैज्ञानिक अभ्यासकांना त्यांच्या संशोधनात मार्गदर्शन केले. त्यांनी संदर्भ नियतकालिकात ९५५ शोधनिबंध, संदर्भ ग्रंथासाठी ५४३ प्रकरणे, ९८ वैज्ञानिक पुस्तकाचे लिखाण व संपादन, अशी साहित्यिक संपदा निर्माण केली आहे.

त्यांनी जागतिक मृदा आणि जलसंधारण असोसिएशन, सॉईल सायन्स सोसायटी ऑफ अमेरिका, इंटरनॅशनल  सॉईल अँड टीलेज रिसर्च ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्स, इत्यादी संस्थाचे अध्यक्ष  म्हणून काम पाहिले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा