सोहोनी, कमला माधव : (१४ सप्टेंबर १९१२ – २८ जून१९९८) कमला सोहोनी यांचा जन्म मध्य प्रदेश येथील इंदोर शहरात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावदेवी शाळा आणि सेंट कोलंबियात झाले. त्यानंतर त्यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण नाशिक, नगर, आणि बेळगावजवळ झाले. त्यांचे वडील आणि काका असे दोघेही रसायनशास्त्र विषयातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूरू या संस्थेचे माजी विद्यार्थी होते.

सुविद्य कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेल्या कमला यांनी बी.एस्सी.ला सेंट झेवियर महाविद्यालयातून, रसायनशास्त्र आणि भौतिकी विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवली. जमशेदजी टाटा यांनी प्रस्थापित केलेल्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूरू मध्ये संशोधनाने एम.एस्सी. पदवीसाठी रसायनशास्त्र विषयासाठी प्रवेश घेण्याची त्यांची इच्छा होती. प्रवेशाच्या सर्व निकषांवर कमलाबाई पूर्णपणे पात्र होत्या. त्यामुळे संस्थेचे प्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते, सर सी.व्ही. रामन यांनी ‘मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही’ असे कमलाबाईंना कळविले तेव्हा त्याना धक्काच बसला.  ‘केवळ मुलगी असल्याने प्रवेश नाकारत असाल’ तर मी सत्याग्रह करेन पण तुमच्या संस्थेमध्येच मी एम.एस्सी. रसायनशास्त्रासाठी प्रवेश घेऊन संशोधन करेन’ असे आवेशाने  सांगितले. त्यांचा आवेश पाहून रामन यांनी त्यांना एका वर्षासाठी काही अटींसह, प्रवेश दिला.

कमला सोहोनी यांचे वरिष्ठ प्रा. श्रीनिवासय्या यांनी दिलेले अहवाल व चिकाटीने काम करण्याची कमलाबाईंची वृत्ती पाहून रामन यांनी या पुढील वर्षात दोन मुलींना संस्थेत प्रवेश देणार असल्याचे जाहीर केले. कमलाबाईंचा पदव्युत्तर परीक्षेचा संशोधन प्रबंध पूर्ण झाला आणि मुंबई विद्यापीठाकडून त्यांना विशेष प्राविण्यासह एम.एस्सी.ची पदवी मिळाली.

त्यांनी ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सीकडे अर्ज करून पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवली. मुंबई विद्यापीठाच्या ‘स्प्रिंगर रिसर्च’ आणि ‘सर मंगळदास नथूभाई फॉरिन एज्युकेशन स्कॉलरशिप’ इन्टरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी विमेन, (अमेरिका संयुक्त संस्थाने) ची ट्रॅव्हलिंग स्कॉलरशिप या शिष्यवृत्त्या त्यांनी मिळविल्या होत्या.

इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेऊन त्यानी डेरेक रिश्टर या ख्यातनाम चेतारसायनशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे काम सुरू केले. डेरेक रिश्टर त्यांचे पद सोडून दुसऱ्या संस्थेत गेल्यावर रॉबिन हिल यांच्या मार्गदर्शनाखाली बटाट्यातील ‘सायटोक्रोम – सी’ या विकरावर कमलाबाईनी संशोधन केंद्रित केले. हिल हे त्यांच्या ‘प्रकाश संश्लेषणातील ‘हिल प्रक्रिये’साठी जगप्रसिद्ध आहेत. सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी फ्रेड्रिक हॉपकिन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. तो संमत झाल्यावर विल्यम डन लॅबॉरेटरीचे संचालक, नोबेल पारितोषिक विजेते फ्रेड्रिक गॉलन्ड हॉपकिन्स, यांच्या संशोधक चमूत काम सुरू केले. ते करताना कमलाबाईंच्या लक्षात आले की ‘सायटोक्रोम – सी’ हे फक्त बटाट्यातच सापडते असे नाही, तर हे विकर (enzyme) सर्व वनस्पतींच्या सर्व ऊतींमध्ये आढळते. तसेच ते पेशींतील ऑक्सीडीकरणासाठी आवश्यक असते. हे संशोधन त्यांनी फक्त चौदा महिन्यांत पूर्ण केले. त्यांचे संशोधन अत्यंत महत्वाचे होते. त्यांच्या केवळ चाळीस टंकलिखित पानी शोध निबंधामुळे त्यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी. देण्यात आली.  ‘सायटोक्रोम – सी’ केवळ सर्व सजीवात असल्याने कालांतराने सिद्ध झाले.

हॉपकिन्स यांच्या सूचनेनुसार कमलाबाईंकरिता दिल्लीतील ‘लेडी हार्डिंग्ज कॉलेज’मध्ये जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक पद, राखून ठेवण्यात आले होते.

नंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (ICMR) तामिळनाडू राज्यातील कुन्नूर, आहारविज्ञान संशोधन संस्थेत त्यांची सहाय्यक संचालकपदी नेमणूक केली. तेथे त्यांनी पोषणाबद्दल संशोधन केले. एके काळी वडलांबरोबर कोल्हापूरला गेल्या असताना त्यांनी कुस्तीगीर भिजवलेले हरभरे गुळाबरोबर खाताना पाहिले होते. या निरीक्षणातून गिनीपिग्जवरील प्रयोगांनी या आहाराचा रक्तवाहिन्या मजबूत करण्यास फायदा होतो, हे त्यांनी सिद्ध केले.

कमलाबाईंनी मुंबईच्या ‘(रॉयल) इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेतही अध्यापन कार्य केले. कार्याकालाच्या शेवटी त्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या संचालक पदावरून  निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्यांनी  स्वयंपाकघरातील खाद्यपदार्थांवर संशोधन करून अनेक लेख लिहिले. त्या लेखावरून ‘आहार-गाथा’ या नावाने एक पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले.

कमलाबाईंनी दूध, डाळी आणि शेंगा यातील प्रथिनांसंबंधी संशोधन केले. राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांच्या उत्तेजनामुळे त्यांनी नीरेचा जास्त अभ्यास केला. अल्प उत्पन्न गटातील स्त्रिया व कुपोषित बालके आणि स्त्रिया यांच्यामध्ये नीरा व नीरेपासून काकवी व गुळाचे उत्पादन करण्यास उत्तेजन दिले. त्यांच्या कामगिरीची नोंद घेतली जाऊन त्यांना राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट संशोधन पुरस्कार मिळाला.

दुसऱ्या महायुद्ध काळात सैनिकांना ‘ब’-जीवनसत्त्व पुरेसे मिळावे म्हणून त्यांनी तोरूला (Torula) यीस्टच्या गोळ्या आहाराबरोबर पुरवणी म्हणून पाठवल्या. शेंगदाण्यातून तेल काढल्यावर शिल्लक राहिलेल्या पेंडीपासून शालेय मुलांसाठी ‘ब’-जीवनसत्व युक्त चिक्कीसारखा पुरवणी आहार बनवला.

आपल्या कारकीर्दीत एम.एस्सी व पीएच्.डीच्या पंचवीस विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शन घेतले व त्यांनी एकशे पंचावन्न शोधनिबंध लिहिले.

हाफकिन इन्स्टिट्यूटच्या पुनर्रचना समिती, बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठातील नवीन जीवरसायन विज्ञान विभागाच्या अशा कामात त्या सदैव कार्यरत होत्या. अन्नातली भेसळ कशी ओळखायची हे सामान्य व्यक्तीस सहज समजावे यासाठी त्यानी शिबिरे घेतली. भेसळ परीक्षण प्रात्यक्षिकांसाठी शहरी व ग्रामीण सामान्य ग्राहकाला वापरता येईल अशी शोधपेटी तयार केली. त्या ग्राहक चळवळींशी मार्गदर्शक, अध्यक्ष, विश्वस्त अशा नात्यांनी जोडलेल्या होत्या.

सन १९९७ मध्ये कमला सोहोनी यांना विज्ञान क्षेत्रामधील उत्कृष्ट योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. भारतीय वैद्यकीय संशोधन खात्याने तो कार्यक्रम दिल्ली इथे आयोजित केला होता. पुरस्कार समारंभ स्थळी त्या व्यासपीठावरच कोसळल्या. आणि थोड्याच दिवसांत निवर्तल्या.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा