काली किंवा महाकाली नदी. भारतातील उत्तराखंड राज्य आणि नेपाळ यांच्या सरहद्दीवरून, तसेच उत्तर प्रदेश राज्यातून वाहणारी एक प्रमुख नदी. लांबी ४८० किमी. एकूण जलवाहन क्षेत्र १८,१४० चौ. किमी. आहे. उगमापासून ते ऊर्ध्व शारदा बंधाऱ्यापर्यंतचे जलवाहन क्षेत्र १४,८७१ चौ. किमी. असून त्यापैकी ३४ टक्के क्षेत्र नेपाळमध्ये आहे. शारदा नदीचा उगम बृहत् हिमालयातील नंदादेवी गिरिपिंडाच्या पूर्व उतारावरून वाहणाऱ्या कालापानी आणि कुथी यांक्ती या दोन शीर्षप्रवाहांपासून होतो. या शीर्षप्रवाहांची उगमस्थाने उत्तराखंड राज्यातील पीठोरागढ जिल्ह्यात, स. स. पासून सुमारे ३,६०० मी. उंचीवर आहेत. त्यांपैकी कालापाणी नदीचा उगम लिपूलेख खिंडीच्या पायथ्याजवळ, तर कुथी यांक्ती नदीचा लिंपीयाधुरा (लिंपीया) खिंडीच्या पायथ्याजवळ होतो. या दोन्ही खिंडी भारताच्या (उत्तराखंडच्या) तिबेट सरहद्दीवर आहेत. लिपूलेख खिंडीत काली मातेचे मंदिर आहे, त्यावरून या नदीला काली असे म्हणतात.

शारदा नदी उगमानंतर प्रथम ती आग्नेय दिशेत वाहत जाते. त्यानंतर दक्षिणनैर्ऋत्य दिशेत वाहत जाताना भारत (उत्तराखंड) -नेपाळ यांची आंतरराष्ट्रीय सरहद्द निर्माण करते. पर्वत उतारावरून खाली उतरल्यानंतर ब्रम्हदेव मंडी (नेपाळ) येथे ती गंगेच्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते. तेथील शारदा बंधाऱ्याजवळ तिचे पात्र बरेच रुंद झालेले आहे. या ठिकाणापासून तिला शारदा या नावाने ओळखले जाते. त्यानंतर ती उत्तर प्रदेश राज्याच्या उत्तर भागातून आग्नेय दिशेत वाहत जाऊन गंगा नदीची उपनदी असलेल्या घागरा (शरयू) या नदीला मिळते. शारदा नदी उत्तराखंड राज्याच्या कुमाऊँ विभागातील पीठोरागढ, चंपावत व उधमसिंघ नगर या जिल्ह्यांचे आणि उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी जिल्ह्याचे जलवाहन करते. नेपाळमध्ये काली नदीचे खोरे सुदूर पश्चिम प्रदेशात आणि महाकाली विभागात पसरले असून त्यात बैतडी, दादेलधुरा, दारचुला, कांचनपूर हे चार प्रशासकीय जिल्हे येतात. या नदीच्या उजव्या काठाकडून वाहत येणाऱ्या धौलीगंगा, दर्मा, गोरी गंगा, सर्जू, लधिया व डाव्या काठावर मिळणाऱ्या चमलिया, रामगन या प्रमुख उपनद्या आहेत.

शारदा नदीची संभाव्य जलविद्युतनिर्मिती क्षमता फार मोठी आहे. हिमालयातील भारतीय नद्याजोड प्रकल्पातील आरंभीच्या नद्यांपैकी ही एक प्रमुख नदी आहे. नेपाळमध्येही तेथील प्रमुख पाच नदीखोऱ्यांपैकी महाकाली (भारतातील शारदा) खोरे एक आहे. या नदीवर ऊर्ध्व (अपर) शारदा बॅरेज (बंधारा) आणि निम्न (लोअर) शारदा बॅरेज हे दोन प्रमुख जलसिंचन प्रकल्प आहेत. त्यांपैकी ऊर्ध्व शारदा बंधारा इ. स. १९२० च्या दशकात बांधण्यात आला आहे. ऊर्ध्व शारदा बंधाऱ्यापासून खाली १६३.५ किमी. वर आणि लखीमपूर शहरापासून २८ किमी. अंतरावर शारदा नदीवर निम्न शारदा बंधारा बांधण्यात आला आहे (२०००). या धरणापासून काढण्यात आलेल्या कालवा प्रणालीद्वारे पूर्व उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागांत जलसिंचन आणि जलविद्युतनिर्मिती केली जाते. ऊर्ध्व शारदा आणि निम्न शारदा या दोन बंधाऱ्यांदरम्यान शारदा नदीला कोणतीही मोठी उपनदी येऊन मिळत नाही. उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यातील टनकपूरजवळ ‘टनकपूर  हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट’ हा प्रकल्प आहे. या धरणाच्या जलाशयाच्या वरच्या भागात टनकपूर शहर आहे. येथून पुढे शिवालिक टेकड्यांचा प्रदेश ओलांडून ही नदी तराईच्या मैदानी प्रदेशात उतरते व पुढे उजव्या काठावरील बनबसा व डाव्या काठावरावरील महेंद्रनगर (भीमदत्त) या शहरांजवळून ती वाहत जाते. बनबसा येथील शारदा बंधाऱ्यापासून शारदा कालवा काढण्यात आला आहे. या कालव्याच्या निर्मितीस इ. स. १९२० मध्ये सुरुवात होऊन इ. स. १९२८ मध्ये तो पूर्ण झाला. सर्व फाट्यांसह या कालव्याची लांबी ९३८ किमी. असून उत्तर भारतातील सर्वाधिक लांबीच्या कालव्यांपैकी हा एक कालवा आहे. बनबसानंतर पुढे शारदा नदी उत्तर प्रदेश राज्यातून सुमारे १०० किमी. आग्नेयीस वाहत जाऊन बाहरेच शहराच्या उत्तरवायव्येस ३० किमी. वर घागरा नदीला उजवीकडून मिळते. शारदा नदीच्या एकत्रित विकासासंदर्भात भारत आणि नेपाळ यांच्यात १९९६ मध्ये एक करार झाला आहे. भारत-नेपाळ या दोन देशांच्या संयुक्त विद्यमाने,या दोन देशांच्या सीमेवर पंचेश्वर धरण हा बहुद्देशीय प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे (१९९५); परंतु धरणाचे पाणी आणि वीज वापराबाबत हे दोन्ही देश अंतिम निर्णयापर्यंत येऊ शकलेले नाहीत. नेपाळमध्ये चमलिया या उपनदीवर चमलिया हा जलविद्युतनिर्मिती प्रकल्प आहे.

शारदा नदीच्या खोऱ्यात शुक्लफांटा (नेपाळ) व आणि दुधवा (उत्तर प्रदेश) ही दोन राष्ट्रीय उद्याने आहेत. १९८७ मध्ये दुधवा व्याघ्र संरक्षित प्रदेश घोषित करण्यात आला असून त्यात दुधवा राष्ट्रीय उद्यान, किशनपूर वन्यप्राणी अभयारण्य आणि कॅटर्नियाघाट वन्यप्राणी अभयारण्य यांचा समावेश होतो. हा संपूर्ण प्रदेश विविध वन्यप्राणी, पक्षी आणि दाट अरण्यांनी समृद्ध आहे. जौलजीबी ते टनकपूर यांदरम्यानचा ११७ किमी. लांबीचा नदीप्रवाह राफ्टिंगसाठी व त्याच्या स्पर्धांसाठी वापरला जातो. या नदीच्या तीरावर कालापानी, टनकपूर, बनबसा, महेंद्रनगर, चंपावत ही प्रमुख नगरे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी