बोरलॉग, नॉर्मन (Borlaug, Norman) (२५ मार्च १९१४ ते १२ सप्टेंबर २००९) नॉर्मन बोरलॉग यांचा जन्म हॉवर्ड काउंटीतील क्रेस्को या ठिकाणी अमेरिकेतील आयोवा राज्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हॉवर्ड काउंटीतील लहानशा शाळेत झाले. बालपणी त्यांनी कौटुंबिक शेतातील गुरे सांभाळणे, मका आणि ओट पिकाची लागवड अशी कामे केली. मिनेसोटा विद्यापीठातून त्यांनी वनीकरण विज्ञान शाखेत बी.एस्सी., एम.एस्सी. आणि वनस्पति विकृती व आनुवंशिकताविज्ञान विषयात पीएचडी मिळवली .
त्यांची थोड्याच दिवसात ड्युपॉन्ट नेमौरस फाउंडेशन, विल्मिंग्टन येथे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झाली. दोन वर्षातच ते मेक्सिकन सरकारच्या सहकारी गहू संशोधन व उत्पादन केंद्रात अनुवंशशास्त्रज्ञ म्हणून काम पाहू लागले. या कार्यक्रमाचे ते प्रमुख होते. या कार्यक्रमाचा हेतू अधिक उत्पादन देणार्या रोगप्रतिबंधक सुधारित वाणाची निर्मिती करणे होता. गव्हाच्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढीविण्यासाठी त्यांना दहा वर्षे लागली. त्यांना गव्हाच्या समजात शुद्ध बीजी (प्युअर ब्रीड) रोपामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे आंतरप्रजनन व निवड तंत्राच्या सहाय्याने (inbreeding and selection) त्यांनी तांबेरा रोगास प्रतिकार करणारी जात विकसित केली. त्यासाठी जपानी बुटक्या गव्हाच्या जातीपासून मेक्सिकोमधील उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय हवामानास योग्य अर्ध-बुटक्या, रोग-प्रतिरोधक पण अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणाची निर्मिती केली. १९६० सुमारास निर्माण केलेल्या या वाणाचे नाव पीटिक६२ आणि पेन्जामो६२ होते. याशिवाय लर्मा राजो-६४, सीएट सेरॉस, सोनारा-६४ आणि सुपर एक्स या अधिक उत्पन्न देणारी वाणे प्रसारित केली. संकरीत जातीच्या बुटकेपणामुळे गव्हाच्या रोपाना दाट फुटवे येत. तयार पीक ओंब्यांच्या वजनामुळे जमिनीवर लोळत नसे. मोठ्या किंवा लहान दिवसाच्या लांबीच्या कमी अधिक असण्याचा पिकावर होणारा परिणाम या वाणावर न झाल्याने हे वाण जगाच्या विविध भागात लागवडीस योग्य होते. बोरलॉग यांनी केलेल्या बुटक्या गव्हाचे वाण भारतासहित अनेक देशांतील अनेक ठिकाणच्या (मल्टिलोकेशन) चाचणीसाठी पाठवले गेले. तुलनेने ह्या वाणाच्या पिकाचे उत्पादन बरेच अधिक होते.
एम.एस.स्वामिनाथन् यांच्या सूचनेवरून बोरलॉग व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतातील खात्रीलायक गव्हाचे चार वाणांची १०० किलो बियाणे आणि ६३० वेचक जाती वापरून प्रयोग केले. बोरलॉग व अँडरसनच्या यांच्या नेतृत्वाखाली भारताचे १९६५मधील गव्हाचे उत्पन्न १२.3 दशलक्ष टनांवरून १९७० मध्ये २०.१ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले. यामुळे १९७४ साली भारत गहू उत्पादनांत स्वयंपूर्ण झाला. बोरलॉग यांच्या प्रयत्नाने आफ्रिकन देशातील मक्याचे उत्पादन तिप्पट झाले.
बोरलॉग यांची, नव्याने स्थापन झालेल्या मेक्सिकोतील टेक्सकोको येथील आंतरराष्ट्रीय कृषी संशोधनाच्या आंतरराष्ट्रीय मका आणि गहू सुधार केंद्राचे येथे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. निवृत्तीनंतरही तेथेच ते वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करीत राहिले. त्यांनी गहू, ट्रायटीकेल, बार्ली, मका आणि ज्वारीसह अनेक पिकांवरील संशोधनात मोलाचे योगदान दिले. १९८४ पासून त्यांनी टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीमध्ये अध्यापनाबरोबर संशोधनही करण्यास सुरुवात केली. त्यांना विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय कृषी विभागाचे विशेष प्रोफेसर ही पदवी देण्यात आली. येथे काम करत असतानाच ते इंटरनॅशनल फर्टीलायझर डेव्हलपमेंट सेंटरच्या संचालक मंडळावरदेखील होते. बोरलॉग जीवनाच्या अंतापर्यंत याच विद्यापीठासमवेत राहिले.
जगातील लाखो लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्याच्या योगदानाबद्दल त्यांना १९७० मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. आशिया आणि लॅटिन अमेरिकेत अन्न उत्पादनावर या हरितक्रांतीचा विशेष परिणाम दिसून आला. ह्या हरितक्रांतीसाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना ‘प्रसिडेंशल मेडल ऑफ फ्रीडम’ हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे पब्लिक वेलफेअर मेडल, रोटरी इंटरनॅशनल २००२ आणि नॅशनल मेडल ऑफ सायन्स असे अनेक पुरस्कार मिळाले. नॉर्मन बोरलॉग यांनी १९८६ मध्ये, जागतिक अन्न पुरस्कार या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली.
भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून त्यांना भारतात ओळखले जाते. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण ह्या पुरस्काराने सन्मानित केले. बोरलॉग यांच्या स्मरणार्थ भारतात नवी दिल्ली व अमेरिकेची राजधानी वाशिंग्टन येथे त्यांचा पुतळा उभा करण्यात आला.
त्यांच्या सन्मानार्थ आयोवा आणि मिनेसोटामध्ये १६ ऑक्टोबर हा जागतिक खाद्य दिवस (वर्ल्ड फूड डे), नॉर्मन बोरलॉग जागतिक खाद्य पुरस्कार दिन म्हणून संबोधला जातो. तर संपूर्ण अमेरिकेत हा जागतिक अन्न पुरस्कार दिन म्हणून निर्देशित केला जातो.
अमेरिकेच्या टेक्सासमधील डलास येथे त्यांचे लिम्फोमा आजाराने निधन झाले.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Norman-Borlaug
- “Nobel Lecture— The Nobel Peace Prize 1970 Norman Borlaug”.
- https://www.worldfoodprize.org/en/dr_norman_e_borlaug
- Norman E. Borlaug’s Curriculum Vitae
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.