भूमध्य समुद्राचा एक फाटा. इटलीच्या वायव्य किनाऱ्यावर हा समुद्र पसरलेला आहे. उत्तरेस फ्रान्स व प्रामुख्याने इटालियन रिव्हिएरा (लिग्यूरिया) या इटलीच्या किनाऱ्यावरील अरुंद किनारपट्टी, इटलीच्या पश्चिम-मध्य भागातील तस्कनी प्रदेशाचा किनारा आणि दक्षिणेस फ्रेंचांचे कॉर्सिका बेट यांदरम्यान या समुद्राचा विस्तार झालेला आहे. अ‍ॅपेनाइन्स पर्वतात उगम पावणाऱ्या अनेक नद्या या समुद्राला येऊन मिळतात. त्यांपैकी आर्नो ही प्रमुख नदी पूर्वेकडून या समुद्राला मिळते. कॉर्सिका बेटाच्या वायव्येस या समुद्राची सर्वाधिक खोली २,८५० मी. पेक्षाही अधिक आढळते. अगदी उत्तर भागात असलेल्या जेनोआ आखाताचा समावेश या समुद्रातच होतो. तस्कन द्वीपसमूहामार्गे लिग्यूरियन समुद्र आग्नेयीकडील टिरीनियन समुद्राला जोडला आहे.

प्राचीन लिग्यूरियन लोकांवरून या समुद्राला लिग्यूरियन हे नाव दिले असावे. पूर्वेस टिरीनियन समुद्राने, तर पश्चिमेस खुद्द भूमध्य समुद्राने लिग्यूरियन समुद्र सीमित केला आहे. समुद्राचा वायव्य किनारा सृष्टीसौंदर्य आणि उत्साहवर्धक हवामानासाठी प्रसिद्ध आहे. समुद्राच्या खडकाळ किनाऱ्यावर जेनोआ, ला स्पेत्सीआ आणि लिव्हॉर्नो ही प्रमुख बंदरे आहेत. अगदी उत्तर किनाऱ्यावरील जेनोआ हे प्रसिद्ध शहर आहे. १९७७ पासून जेनोआ आणि इम्पिरीआ येथील समुद्रपातळीत सातत्याने चढउतार होत आहेत. १९८३ च्या अभ्यासात प्रायोगिक तत्त्वावर त्याचे विश्लेषण करण्याचे प्रयत्न केले गेले; परंतु या ठिकाणी आढळणाऱ्या ‘सेश’ प्रकारातील तरंगाविषयीच्या कारणांचे विश्लेषण दीर्घकाळपर्यंत करता आले नाही.

आंतरराष्ट्रीय जलालेखन संघटनेने या समुद्राच्या विस्ताराच्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार नैऋत्येकडील सीमा कॉर्सिका बेटाच्या अगदी उत्तर टोकावरील केप कॉर्स किंवा केप ग्रोसो हे भूशिर ते फ्रान्स व इटली यांदरम्यानची सरहद्द यांना जोडणाऱ्या रेषेने निश्चित केली आहे. आग्नेयीकडील सीमा केप कॉर्स आणि टिनेटो बेट यांना जोडणारी रेषा, तेथून पुढे टिनो आणि पाल्मॅरिया ही बेटे इटलीच्या किनाऱ्यावरील सॅन पीएत्रो पॉइंटशी जोडणाऱ्या रेषेने निश्चित केली आहे.

समीक्षक : नामदेव स. गाडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.