प्रवचन : देवतेची पूजा वा भजन करीत असता पुरोहित, आचार्य वा गुरू पूजेतील किंवा भजनातील मंत्र वा स्तोत्र यांचा अर्थ पूजासमारंभात किंवा भजनसमारंभात भागीदार असलेले जे जन असतात, त्यांना सांगतात, त्यास प्रवचन म्हणतात. हे प्रवचन करीत असता पूजनीय देवतेचे वर्णन करून कथा सांगतात, तसेच धार्मिक तत्वज्ञानाचेही विवरण करून सांगतात. प्रवचन हे मुख्यतः पूजा करणारा यजमान आणि यजमानपत्नी यांनी ऐकायचे असते. प्रवचनाचे श्रवण केल्याशिवाय पूजेची वा भजनाची पूर्ण समाप्ती झाली, असे म्हणता येत नाही. प्रवचन हा शब्द प्रथम तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीत आला आहे. यज्ञकर्मामध्ये आचार्याने प्रवचन करावयाचे असते. मुख्यतः धार्मिक व्यक्तीच्या घरी असलेल्या देव्हाऱ्यापुढे, देवळामध्ये, समाधिस्थानात, साधूंच्या मठात धर्मशास्त्रज्ञाने किंवा तत्त्ववेत्त्याने प्रवचन करण्याची प्रथा पुरातन काळापासून चालत आली आहे. ही प्रथा जैन मंदिरात, चैत्य मंदिरात किंवा बौद्ध मठातही अव्याहत परंपरेने चालू आहे. प्रवचनकर्ता न मिळाल्यास प्रवचनावाचूनच यज्ञपूजा, प्रार्थना व भजन केल्यानेही पूर्ण पुण्य मिळते, अशी धार्मिकांची श्रद्धा आहे. प्रवचनाच्या योगाने त्या पुण्यात भर पडते. सर्व धर्मसंस्थांचा प्रचार आणि दृढीकरण प्रवचनाच्या योगाने होते. प्रवचन हे धर्मप्रचाराचे एक प्रमुख साधन आहे.
- Post published:30/09/2021
- Post author:लक्ष्मणशास्त्री जोशी
- Post category:लोकसाहित्य - लोकसंस्कृती
Tags: लोकधर्म