आपला पारंपरिक वनौषधी देण्याचा व्यवसाय सांभाळत त्यात आवश्यकतेनुसार बदल करीत गावोगाव फिरणाऱ्या जमातीपैकी एक प्रमुख जमात. परंपरेने चालत आलेली वनौषधी अडल्या-नडल्यांना देणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. आजही काही म्हातारे वैदू हाच व्यवसाय सांभाळून आहेत. महाराष्ट्रात परंपरेने चालत आलेल्या लोकवैद्यकाचे ते प्रमुख वाहक आहेत. औषधी देण्याबरोबरच तुंबड्या लावून जखमेतील किंवा गळवातील अशुद्ध रक्त काढून घेणे, जळवा लावणे, लहानमोठ्या शस्त्रक्रिया करणे या कामात वैदू फारच वाकबगार असतात. औषधांबरोबरच वैदू जळवा लावून किंवा तुंबड्या लावून जखमेतील; खरूज, नायटा, इसबगोल या कातडीच्या रोगातील अशुद्ध रक्त बाहेर काढण्याचे काम करतात.जळू हा रक्त शोषून घेणारा एक किडा असतो. जखमेवर किंवा जेथे अशुद्ध रक्त साचले असेले तेथे आपली सोंड खुपसून तो रक्त शोषून घेतो. याप्रकारे शस्त्रक्रिया न करता अशुद्ध रक्त बाहेर काढले जाते. तुंबडी लावणे या प्रकारामध्ये नळीच्या आकाराचे एक लहान यंत्र असते त्याची एक बाजू उघडी असून दुसरीकडे त्यावर हे यंत्र ठेवले जाते. मोकळी बाजू कातडीवर लावून छिद्राची बाजू वर ठेवतात. छिद्रातून तोंडाने वायू काढून घेऊन छिद्र बंद करतात आणि त्यायोगे अशुद्ध रक्त व त्याबरोबरच जिवाणूही खेचले जातात. महाराष्ट्रात तुंबड्या लावण्याचे काम प्रामुख्याने वैदू लोकच करतात. यातून त्यांना भरपूर प्राप्तीही होते. परंतु तोंडाने अशुद्ध रक्त ओढण्याची ही क्रिया अमंगळ आहे, अशी भावना झाल्यामुळे ते आता तुंबड्या लावत नाहीत. त्यामुळे यात कुशल असलेले लोक आता दिवसेंदिवस कमी होत आहेत.

वाताचे औषध, कमरेचे औषध, पाठदुखीला औषध अशा आरोळ्या देत वैदू स्त्रिया गावातील गल्लीबोळातून फिरतात. सफेद मुसळी, सालम मुसळी इत्यादी औषधीही त्यांच्याकडे असतात. वैदू स्त्रियांजवळ गर्भपाताची जालीम औषधी असे. आता या औषधींचा वापर कमी झाला आहे. बावन्न पत्त्त्यांचा एक पत्ता अशी एक औषध वैदूत प्रसिद्ध आहे. बावन्न पत्त्त्यांचा एक पत्ता म्हणजे भोवताली सापडलेला झाडपाला ओरबाडायचा, त्याची पाने समप्रमाणात घ्यायची, ती कुटायची आणि त्याची गोळी करून घ्यावयाची असे हे औषध गुणकारी आहे अशी त्यांची भावना असते. वैदूंचा पारंपारिक व्यवसाय आता काहीसा बदलला आहे. फिरते औषधी वनस्पती विकणारे आता कमी झाले आहेत. लोकवैद्यक आता भावानेच आढळतात.

वैदूंच्या पोटजाती मध्ये प्रमुख पोटभेद आहेत. १) झोळीवाले – झोळी वापरणारे २) दाढीवाले – दाढी ठेवणारे ३) चटईवाले – चट्या विणणारे. झोळीवाले यांनी झाडपाल्याची औषधी विकण्याचा व्यवसाय चालू ठेवला, तर संचीवाल्यांनी हा व्यवसाय कमी करून त्याऐवजी डबे, चाळण्या इत्यादी बनविण्याची कामे करणे हा व्यवसाय चालू केला आहे. पुरुष डबे, पेट्या तयार करतात, तर स्त्रिया सुया, पोती, बिबे, रांगोळी विकणे असा व्यवसाय करतात. वैदूंच्या झोळ्या किंवा संची वैशिष्ट्यपूर्ण असतात. बारीक, कमी अंतरावर दोऱ्याच्या टिपा मारुन शिवलेल्या गोधड्यांची झोळी तयार केलेली असते. संची देखील गोधड्यांची बनविलेली असून त्याला वर अशा रितीने गाठ मारलेली असते, की वर चारही कोपरे मोकळे दिसावे. थोडक्यात संची बांधल्यावर कांद्यासारखी दिसते. अलीकडे वैदू जमातीतील लोक सुधारत असून ते मागतेपणाच्या वृत्तीचा त्याग करीत आहेत असे दिसते.

संदर्भ :

  • मांडे, प्रभाकर, गावगाड्याबाहेर, गोदावरी प्रकाशन, अहमदनगर, २००७.

प्रतिक्रिया व्यक्त करा