महाराष्ट्रातील धार्मिक भिक्षेकरी जमात. धार्मिक वृत्तीने भिक्षा मागणे हा या जमातीचा आजीविकेचा मुख्य मार्ग आहे. एका ब्राह्मण ज्योतिष्यास कुणबी स्त्रीपासून सहदेव नावाचा पुत्र झाला आणि या सहदेवापासून ही जमात उत्पन्न झाली, अशी एक आख्यायिका आहे. भगवान श्रीकृष्णाच्या काळात यादवकुळातील लोकांना कृष्णाने विविध कामे सांगितली. आजच्या वासुदेवसमाजाच्या पूर्वजांना लोकांच्या कुळीचा उद्धार करण्याचे काम सांगितले. तेव्हापासून वासुदेवाकडे कुळी वाचून दाखविण्याचे काम आले. वाचून दाखविणे, वाचून देणे या शब्दांत बदल होऊन कालांतराने वाचूदेव असा शब्द रूढ झाला. त्याच शब्दाचे अपभ्रंश रूप वासुदेव झाले. वासुदेव गोकुळातले, व्यवसायाच्या निमित्ताने भटकंती करत महाराष्ट्रात येऊन दाखल झाले,अशीही एक आख्यायिका प्रचलित आहे. महानुभाव साहित्यात भ्रीडी ह्या नावाने वासुदेवाचा उल्लेख आला आहे. सर्व वासुदेव कृष्णाचे भक्त असून,कृष्णाने काम सांगितले, त्याची आठवण म्हणून त्यांनी त्याचा वेश व नावही त्याचेच घेतले.सर्व वासुदेव मराठी भाषा बोलतात. वासुदेव जातीने मराठा श्रेणीतले आहेत. मराठा वासुदेव, जोशी वासुदेव, भ्रीडी वासुदेव, गोंधळी वासुदेव असे जातप्रकार त्यांच्यात आढळतात.

वासुदेवाच्या डोक्यावर शंकूच्या आकाराची मोरपिसांची टोपी परिधान केलेली असते. ते धोतराऐवजी सुरवार नेसतात. त्यांच्या अंगात घोळदार अंगरख़ा असतो. मानेवरून दोन्हीकडे समोर रंगीत शेला सोडलेला असतो तर दुसरा एक शेला कमरेभोवती बांधलेला असतो, त्यात बासरी खोचलेली असते. हातात टाळ व चिपळ्या, पायात घुंगरं आणि काखेत झोळी असा एकंदर वासुदेवाचा पोशाख असतो. वासुदेवाना भिक्षा वाढणे हा धर्माचरणाचा भाग मानला जातो; त्यामुळे त्यांना भिक्षेकरी मानले जात नाही. ते भिक्षा दान म्हणून स्वीकारतात. दान पावलं अशी भावना व्यक्त करून हे दान देवदेवतांना आणि संतांना पोचल्याचा संदेश वासुदेव देत असतो. त्यांची प्रत्येकाची हक्काची गावं ठरलेली असतात. ते हक्काच्या गावी मागायला जातात. हक्काने भिक्षा मागतात.बिनहक्काच्या गावी मागताना डोक्यावर मोरपिसांची टोपी घालीत नाहीत. वासुदेव गावात भिक्षा मागताना प्रत्येक घरी, दारात जाऊन गाणी म्हणतात. वासुदेवाची गाणी  कृष्णचरित्र, भक्तीमहिमा प्रपंचनीती, कौटुंबिक भावबंध, सुबोध भाषेत वेदान्त स्पष्ट करणारी अशा विविध विषयावर असतात. पंढरपूर,  येरमाळा, सोनारी, शिंगणापूर, माहूरगड येथील यात्रेत ही गाणी ते म्हणतात. पंढरपूरची, येरमळ्याची यात्रा केलीच पाहिजे, न केल्यास प्रपंचात बरकत येणार नाही,अशी त्यांची समजूत आहे. जातीच्या रिवाजाप्रमाणे हक्काची गावं मागितलीच पाहिजेत. टाळाटाळ केल्यास जातीत कमी समजतात. भटकंतीच्या काळात त्यांचा रात्री गाण्याचा कार्यक्रम रंगतो.त्याद्वारे लोकांचे मनोरंजनही होते आणि त्यांना दानही मिळते.

वासुदेव पूर्वाश्रमीचे यादवकुळातील मराठा असल्यामुळे त्यांची विवाहपद्धती मराठा समाजाप्रमाणेच आहे. लग्न जुळून येण्यासाठी आडनाव व देवक वेगळं असावं लागतं. कूळ, गोत्र, नातं, देवक इत्यादी गोष्टींची सत्यता पटली म्हणजे लग्न जमवण्याचा क्रियेला सुरुवात होते. लग्नविधी चार दिवस चालतो. पहिल्या दिवशी देवकार्य, दुसर्‍या दिवशी हळदी समारंभ, तिसर्‍या दिवशी लग्न अशा लग्नविधी असतो. वासुदेव हिंदू समाजाप्रमाणे सर्व सण साजरे करतात. भगवान श्रीकृष्ण वासुदेवांचे कुलदैवत असून विठ्ठल, मारुती, श्रीराम हे त्यांचे देव आहेत. जनमानसात प्रचलित असणाऱ्या अनेक अंधश्रद्धा त्यांच्यातही प्रचलित आहेत.

वासुदेव समाजात जातपंचायतीच्या प्रमुखाला कारभारी किंवा पाटील म्हणतात. त्याला सहकार्य करण्यासाठी चार ते पाच उपपंच असतात. पंचाचा निर्णय जातीत अंतिम मानतात. भांडणं मिटवण्यासाठी कोर्टात जात नाहीत. जातपंचायतीलाच कोर्टाचा दर्जा दिलेला असतो. जातपंचायतीचे येणारे तंटे, हक्काची गावं सोडून दुसर्‍याच्या गावात भिक्षा मागणे, भावकीतले मतभेद, सगेसोयरे त्यांच्यातील अडचणी, अनैतिक प्रकरणे, परस्परातील व्यवहार, भाऊबंदकीतून उदभवलेले प्रश्न अशा स्वरुपाचे विवाद वासुदेवाच्या जातपंचायतीत येतात. वासुदेवाच्या महाराष्ट्राच्या विभागानुसार त्या त्या विभागात जातपंचायत अस्तित्वात आहे. वासुदेव समाजात मयत झाल्यास, त्यांच्या मूळ प्रवृत्तीप्रमाणे म्हणजे मराठा पद्धतीने अंत्यविधी पार पाडतात.

संदर्भ :

  • पाटील, पंढरीनाथ, भटके भाईबंद, सुरेश एजन्सी, पुणे, १९९०.

This Post Has One Comment

  1. Dilip Jagtap

    चांगली माहिती हा लेख वाचून मिळाली

प्रतिक्रिया व्यक्त करा