नेने, यशवंत लक्ष्मण:  (२४ नोव्हेंबर १९३६ – १५ जानेवारी २०१८) यशवंत लक्ष्मण नेने या भारतीय कृषी शास्त्रज्ञांचा जन्म मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ग्वाल्हेरमध्येच झाले. त्यांनी ग्वाल्हेर कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी.(कृषी) पदवी मिळवली. नंतर त्यांनी आग्रा विद्यापीठाच्या कानपूर शासकीय कृषी महाविद्यालयातून विकृतीशास्त्र शाखेत एम.एस्सी. (कृषि वनस्पती) पदवी मिळवली. पदवी व पदव्युत्तर या दोन्ही पदव्यात त्यांना सुवर्ण पदकाचा सन्मान मिळाला होता. अमेरिकेतील  इलिनॉय विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते तेथून पीएच्.डी. पदवी झाले. त्यांच्या प्रबंधाचा विषय एन्झाईम्सद्वारे विषाणूजन्य तंबाखू-मोजेक संसर्ग प्रतिबंधित करण्याच्या यंत्रणेचा अभ्यास असा होता.

अमेरिकेहून परत आल्यावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून उत्तर प्रदेश कृषी विद्यापीठात ते सहायक प्राध्यापक पदावर रुजू झाले. सध्या हे विद्यापीठ उधमसिंग नगर उत्तराखंड येथे आहे. (जी.बी. पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ – जीबीपीयूएटी). १९६५ मध्ये भातपिकाच्या खैरा रोगाचे हा रोग जस्ताच्या कमतरतेमुळे होतो. पिकाच्या पानावर झिंक सल्फेट (०.५%) व चुना (०.२५%) मिश्रणाच्या दोन फवारण्या दिल्याने हा विकार  नियंत्रित होतो हे त्यांनी सिद्ध केले. अशा तऱ्हेने पिकांच्या अन्न्द्रव्यावरील संशोधनाची सुरुवात त्यांनी केली. एके काळी खैरा रोगामुळे तराई भागातून भात पीक नामशेष होण्याचा धोका होता. त्यांच्या या कार्यासाठी एफ.ए.ओ.ने १९६६ या आंतरराष्ट्रीय भात वर्षासाठी नेने यांना ‘भात संशोधन’ पुरस्काराने सन्मानित केले. उडीद आणि मूग पिकाचा पान मुरड्या, केवडा (येलो मोझॅक व्हायरस), चवळी आणि वाटाण्याचा  केवडा, मक्याचा दहिया, पान करपा इत्यादी रोगांचा अभ्यासही त्यांनी केला. खरीप हंगामातील डाळींवर्गातल्या पिकावरील विषाणूजन्य रोगांबद्दलचे त्यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्थरावर अग्रगण्य मानले जाते. या त्यांच्या योगदानामुळे १९६९-७० मध्ये युनायटेड स्टेट्स, लिंकन, नेब्रास्का इत्यादी विद्यापीठांनी त्यांना अभ्यागत प्राध्यापक म्हणून आमंत्रित केले होते. गव्हावरील तांबेरा रोगांवर त्यांनी केलेल्या विशेष कामाबद्दल डॉ.नॉर्मन बोरलाग व डॉ. ग्लेन अँडरसन या रौप्यपदकांनी सन्मानित केले.

पंतनगर येथे १४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक अशी पदे भूषविली. आपल्या काळात त्यांनी वनस्पती विकृतिशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम व बुरशीनाशकांवर पदव्युत्तर अभ्यासक्रम विकसित केला. या विषयांचे स्वत: अध्यापनही केले. कृषी संशोधन, शिक्षण आणि विकासाच्या कार्यात एकमेव योगदान म्हणून त्यांना जीबीपीयूएटी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्सची मानद पदवी देण्यात आली.

नेने १९७४ साली आंध्रप्रदेशातील इक्रिसॅट (इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी ॲरिड ट्रॉपिक्स) येथे डाळवर्गीय पिकांच्या विकासाच्या कार्यक्रमांचे प्रमुख वनस्पती विकृतिशास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. नंतर त्यांच्याकडे डाळवर्गीय पिकांच्या संशोधनाचे नेतृत्व करण्याचा भार सोपविण्यात आला. पुढे ते या संशोधन कार्यक्रमाचे संचालक बनले आणि शेवटी इक्रिसॅटच्या उपमहासंचालक पदावर त्यांची पदोन्नती झाली. हे पद त्यांनी सात वर्षे भूषविले.

त्यांनी इक्रिसॅट येथे हरबरा (चणा) पिकावरील मर संकुलन (wilt complex of chickpea) समस्येचे निराकरण केले. ह्या रोगाचे निदान करण्यासाठी त्यांनी अनेक संशोधन केंद्रे व शेतकऱ्यांच्या शेतास भेटी देऊन पिकांचे निरीक्षण केले. हरबरा पिकावरील मर संकुलन हा असंख्य मररोगांचे लक्षणे असलेला विकार आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. सामान्य शेतकऱ्यांना हा रोग समजण्यासाठी त्यांनी रोगाचे रंगीत चित्र असलेली ‘डायग्नोसिस ऑफ सम विल्ट-लायिक-डिसऑर्डरस ऑफ चिक पी’ या शीर्षकाची माहिती पुस्तिका तयार केली. ही पुस्तिका या पिकावर काम करणाऱ्या भारतीय व परदेशी  संशोधक व शेतकऱ्यांना उपयोगी ठरली. डाळी आणि शेंगवर्गीय पीक सुधार कार्यक्रमाअंतर्गत इक्रिसॅट येथे त्यांनी कमी कालवधीत तयार होणारे, उच्च उत्पादन देणारे, रोग व कीड प्रतिरोधक तुरीचे  संकरीत खुजे वाण विकसित केले. कमी दिवसात  तयार होणारा, मररोग प्रतिकारक  हरबरा (चणा) आणि उच्च उत्पन्न देणारा, रोग-प्रतिरोधक भुईमुग या पिकांच्या जाती विकसीत केल्या. तसेच त्यांनी हरबऱ्याच्या निर्माण केलेल्या डाळवर्ग पिकांच्या रोगप्रतिकारक जाती, दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियाई देश, पूर्व आफ्रिकन देश, मध्य पूर्व, काही यूरोपियन देशांमध्ये आणि अमेरिकेत, संशोधक नियमितपणे वापरत आहेत. भारतात त्यांनी विकसित केलेल्या पिकांच्या रोगप्रतिकारक जाती आणि रोगनिवारण तंत्रामुळे अनेक राज्यांत भुईमुग,चणा आणि तूर पिकांचे उत्पादन वाढले. नेने यांच्या कारकीर्दीत  तूर, चणा व भुईमुग या पिकांच्या इक्रिसॅटमध्ये विकसित केलेल्या ३४ जाती, भारताबाहेर व्यावसायिक शेतीसाठी प्रसारित केल्या गेल्या.

नेने यांच्या डाळवर्गीय पिकांची आंतरराष्ट्रीय शेती आणि त्या पिकांच्या विकृती विषयावरील त्यांचे प्रभुत्व ओळखून त्यांना पुलमॅन, वॉशिंग्टन, कैरो आणि इजिप्त येथील डाळवर्गीय पीकावरील आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेच्या सल्लागार मंडळाचा आणि  सुकाणू समितीचा सभासद होण्याचे निमंत्रण देण्यात आले.

इक्रिसॅट येथून स्वेच्छा निवृत्तीनंतर त्यांनी सिकंदराबाद येथे ‘एशियन ॲग्रि-हिस्टरी फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली. २०१६ पर्यंत त्यांनी या संस्थेचे काम पाहिले. आग्नेय आशियातील शेतीविषयक जुने वाङ्मय मिळवून त्यांनी ते इंग्लिश, हिंदी व मराठीत भाषांतरित करून वृक्षायुर्वेद, कृषिशासनम्, कृषिपराशर, लोकोपकार अशी बहुपयोगी पुस्तके प्रकाशित केली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने, आशियाई शेतीवरील ११ तांत्रिक नियतकालिकांचे प्रकाशन आणि आशियाई ‘कृषि-इतिहासाचे’ त्रैमासिक पत्रिकेची सुरुवात हे त्यांचे उल्लेखनीय  कार्य आहे. नेने १९९० साली अमेरिकन फायटोपॅथोलॉजिकल सोसायटी (एपीएस) चे फेलो म्हणून निवडले गेले. ते प्लांट प्रोटेक्शन सोसायटी (असोसिएशन), इंडियन फाइटोपाथोलॉजिकल सोसायटी, इंडियन सोसायटी ऑफ मायकोलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी, इ. संस्थांचे अध्यक्ष होते. अनेक देशी-विदेशी कृषी परिषदांच्या संयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच्.डी. च्या २६ विद्यार्थ्याना त्यांच्या पदवीच्या संशोधनात मार्गदर्शन केले. त्यांची संशोधन आणि वैज्ञानिक लेखांसहित ५०० हून अधिक वैज्ञानिक प्रकाशने आहेत. ‘रिव्हायटलायझिंग हायर अ‍ॅग्रिकल्चर एज्युकेशन इन इंडिया : जर्नी टूवर्डस एक्सलन्स’ पुस्तकाचे ते सह-लेखक आहेत. वनस्पती रोग अणि बुरशीनाशके यासंबधी ‘फन्जीसाईडस इन प्लांट डिसीज कंट्रोल’  व  ‘द पिजन पी’ अशा शीर्षकाची पुस्तके आणि टोमॅटो पिकावरील एक उत्कृष्ट चित्रमय बुलेटिन  ‘टोमॅटो  डिसऑर्डर्स: आयडेन्टीफिकेशन हॅन्डबुक’ प्रकाशित करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. नेने यांना संशोधनच्या कामगिरीबद्दल विज्ञान आणि तंत्रज्ञानातील श्री. ओम प्रकाश भसीन पुरस्कार; इंडियन सोसायटी ऑफ पल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट (आयएसपीआरडी) पुरस्कार; आयएसपीआरडी गोल्ड मेडल व इंडियन फाइटोपॅथोलॉजिकल सोसायटीतर्फे प्रा. ए. पी. मिश्रा मेमोरियल लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पुण्याजवळील जुन्नर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

सिकंदराबाद (तेलंगणा)  येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा