हिमनदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे मैदान. हिमनदी आपल्या तळावरील खडकांचे पृष्ठभाग खरवडून, फोडून निर्माण झालेली डबर (दगड-गोटे, वाळू, रेती इत्यादी अवसाद) आपल्याबरोबर पुढेपुढे सरकवत नेते. जेथे हिमनदीतील बर्फ वितळून जलप्रवाह निर्माण होतो, तेथून पुढे त्या पाण्याबरोबर ती डबर वाहू लागते. हिमनदीचे जे सीमांत स्थान असते, त्याच्या पुढे जलप्रवाहाबरोबर वाहून आणलेल्या अवसादाचे (गाळाचे) संचयन होऊन मैदानाची निर्मिती होते. या मैदानालाच उत्क्षालित मैदान किंवा सांडूर म्हणून ओळखले जाते. पाण्याबरोबर वाहत असतानाही या डबरीतील पदार्थांचे घर्षणामुळे सूक्ष्म कणांत रूपांतर होते. मोठ्या दगड-गोट्यांचे संचयन हिमोढांच्या सीमांत भागाजवळ होते, तर सूक्ष्म कण अधिक दूरवर वाहत गेल्यानंतर त्यांचे संचयन होते. उदा., अमेरिकेतील विस्कॉन्सिन हिमनदीबरोबर वाहत आलेल्या गाळाचे कण मिसिसिपी नदीच्या मुखापर्यंत म्हणजे विस्कॉन्सिन हिमनदीच्या सीमांत स्थानापासून सुमारे १,१२० किमी.पर्यंत आढळले आहेत. अशा प्रकारचे उत्क्षालित मैदान कॅनडाच्या अ‍ॅक्षेल हँबर्ग बेटाच्या जवळील थॉम्पसन हिमनदीपासून बनले आहे.

आइसलँडमधील हिमक्षेत्रात भूऔष्णिक प्रक्रियेमुळे, तसेच ज्वालामुखी उद्रेकांमुळे हिमनदीतील बर्फ वितळून त्या वितळलेल्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या गाळाचे संचयन होऊन तेथे मोठ्या संख्येने उत्क्षालित मैदाने निर्माण झालेली आढळतात. १९९६ मध्ये आइसलँडच्या हिमाच्छादित क्षेत्राखालील भूगर्भात ग्रीम्स्व्हॉटन ज्वालामुखीचा स्फोट झाला. त्यामुळे वितळलेल्या हिमनदीपासून आलेल्या पुराबरोबर प्रचंड प्रमाणात वाहून नेलेल्या गाळाच्या संचयनापासून उत्क्षालित मैदानाची निर्मिती झाली. अशीच उत्क्षालित मैदाने आर्क्टिक महासागरातील स्वालबार बेटे, दक्षिण हिंदी महासागरातील कर्गलेन बेटे इत्यादी ठिकाणी आढळतात. अनेकदा डबरात रुतलेले बर्फाचे मोठे ठोकळे वितळून तेथे खळगे तयार होतात आणि त्यांत ‘केटल सरोवरे’ निर्माण होतात.

उत्क्षालित मैदानात सातत्याने गाळाचे थरावर थर साचत जातात. त्यामुळे त्यांचे स्वरूप स्तरित प्रकारचे असते. काही ठिकाणी हिमनदीच्या सीमांत प्रदेशात अशा मैदानातील गाळाच्या थरांची जाडी १०० मी.पर्यंत आढळते. काही ठिकाणी जाडी कमी असली, तरी त्यांचा विस्तार बराच दूरपर्यंत झालेला असतो. अशा मैदानी प्रदेशात बर्फ वितळून निर्माण झालेले पाण्याचे लहानलहान ब्रेडेड प्रवाह मोठ्या संख्येने भूपृष्ठावरून वाहताना आढळतात. ते बरोबर मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात. गाळाच्या संचयनामुळे निर्माण झालेल्या तात्पुरत्या अडथळ्यांमुळे त्यांचे प्रवाहमार्ग सतत बदलत असतात. अशा मैदानातील मृदेच्या गुणधर्मानुसार वेगवेगळी पिके घेतली जातात. या मैदानांतून मोठ्या प्रमाणात वाळू व रेतीचे उत्पादन मिळते.

समीक्षक : वसंत चौधरी