द्रव धातू (Molten Cast Iron) साच्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला मार्ग म्हणजे द्वारण पद्धती. या पद्धतीची रचना पुढील उद्दिष्ट्ये समोर ठेवून केली जाते; त्यामध्ये साचा व्यवस्थित रीत्या भरला जाणे, रसामध्ये खळखळ (Turbulence) किंवा पातळ मैला (Dross) तयार न होणे, घर्षणामुळे निघालेली साच्याची वाळू तसेच घन व पातळ मैला यांना साच्यात प्रवेश करण्यास प्रतिबंध होणे, साचा गरम झाल्याने तयार झालेले वायू तसेच हवा हे रसामध्ये ओढले न जाणे, रसामुळे साचा तसेच गाभा यांचे घर्षण न होणे, साच्यामध्ये उष्णतेचे विभाजन योग्य प्रकारे होणे, द्वारण पद्धतीचे वजन कमीत कमी असणे व ती ओतकामा (Casting) पासून सहज रीत्या अलग करता येणे. साच्यामध्ये रसाचा प्रवेश सहज होणे, रस इकडेतिकडे सांडता कामा नये. ही उद्दिष्ट्ये साध्य करण्याकरिता प्रथम प्रवेशद्वाराच्या रचनेचे घटक : रसाचा पेला (Sprue Cup)/बेसिन, रसाची नळी (Down Sprue), रसवाहिनी (Runner Bar), प्रवेशद्वार (Ingate), फ्लो ऑफ फीडर यांचे आकार आणि माप ठरविले जाणे आवश्यक असते. रसाची नळी, रसवाहिनी, प्रवेशद्वारे या सर्व घटकांचा छेद घेतला असता, ज्या भागाचे क्षेत्रफळ (Cross Section) कमीत कमी असेल तो भाग ओतकाम भरण्याचा वेळ नियंत्रित करतो; त्याला संकोचक (Choke) असे म्हणतात. रचनेमध्ये संकोचक कुठे आहे यावरून रचनेचे खालील दोन प्रमुख प्रकार पडतात.
दाबाखालील द्वारण पद्धत (Pressurised Gating System) : या पद्धतीत संकोचक हा प्रवेशद्वारांमध्ये असतो व सर्व प्रवेशद्वारांचे मिळून क्षेत्रफळ रसवाहिनीच्या क्षेत्रफळापेक्षा कमी असते. त्यामुळे आत जाणाऱ्या रसाची गती हळूहळू वाढत जाते. अनुभवांती ही पद्धत बिडाच्या ओतकामासाठी योग्य ठरली आहे. या पद्धतीत रसाची नळी : रसवाहिनी : प्रवेशद्वारे हे गुणोत्तर साधारणपणे १ : ०.९० : ०.८० असे असते.
दाबविरहित द्वारण पद्धत (Non Pressurized Gating System) : या पद्धतीत संकोचक रसाच्या नळीत असतो. रसवाहिनी नळीपेक्षा मोठा असतो व सर्व प्रवेशद्वारांचे मिळून क्षेत्रफळ रसवाहिनीच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त असते. ही पद्धत ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व त्यांचे मिश्रधातू याकरिता वापरण्यात येते. या पद्धतीत रसाची नळी : रसवाहिनी : प्रवेशद्वारे हे गुणोत्तर १: २ : ४ किंवा १ : ३ : ६ यासारखे असते.
ऊर्ध्व (Top) द्वारण पद्धतीत रस साच्याच्या वरच्या भागातून प्रवेश करतो. त्यामुळे तळातील तापमान कमी व ते वरच्या दिशेने क्रमाक्रमाने वाढत जाते. जडचक्र (Flywheel), दंतचक्र (Gear), दंडगोल (Cylinder) इत्यादी मध्यम व मोठ्या ओतकामासाठी ही पद्धत वापरली जाते. तल (Bottom) द्वारण पद्धतीत रस साच्याच्या खालच्या भागातून प्रवेश करतो. या पद्धतीचा फायदा असा की, रस शांत रीतीने साच्यात प्रवेश करतो. शिडीचे रस्ते पद्धतीत रस ओतण्याची उभी नळी एकच असून तिला विविध पातळीवर प्रवेशद्वारे शिडीच्या पायऱ्याप्रमाणे जोडलेली असतात. अशीच पद्धत राशि साचेकामा (Stack Moulding) साठी पण वापरली जाते. या पद्धतीत अनेक साचे एकमेकावर रचून त्यांचा समूह तयार केला जातो. रस जर साच्याची विभाजन रेषा वरून प्रवेश करत असेल तर त्याला विभाजन रेषेवरील (Parting line) द्वारण असे म्हणतात.
संदर्भ : American Foundry Society (AFS) Ductile Iron Handbook, USA, 1 January, 1992.
समीक्षक : प्रवीण देशपांडे