महाराष्ट्र राज्याच्या अगदी ईशान्य भागातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,३२,८१३ (२०११). गोंदिया शहर नागपूरच्या ईशान्येस सुमारे १४० किमी. वर आहे. गोंदिया जिल्हा उत्तरेकडील मध्य प्रदेश आणि पूर्वेकडील छत्तीसगढ या राज्यांच्या सीमेजवळ आहे. या जिल्ह्यातील याच नावाचा तालुका जिल्ह्याच्या उत्तर भागात, मध्य प्रदेश राज्याच्या सीमेलगत आहे. त्यामुळे गोंदिया शहरही मध्य प्रदेश राज्याच्या सीमेपासून अवघ्या सुमारे २० किमी. वर आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या हिंदी भाषिक राज्यांशी असलेल्या जवळकीमुळे गोंदिया जिल्ह्याबरोबरच गोंदिया शहरातही हिंदी भाषिक लोकांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील हिंदी भाषिक शहर म्हणून पूर्वीपासून असलेली गोंदियाची ओळख आजही कायम आहे. येथील बोली भाषेला ‘झाडीबोली’ या नावाने ओळखले जाते.
गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पूर्वी गोंदिया परिसर गोंड राजांच्या अधिपत्याखाली होता. तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते. गोंड हा आदिवासी समाज येथील जुने रहिवाशी आहेत. या लोकांवरूनच याला गोंदिया हे नाव देण्यात आले आहे. गोंड लोक जंगलातून गोंद, डिंक, लाख इत्यादी पदार्थ गोळा करून त्यांची विक्री तेथील गावांत करीत आणि आजही करतात. आसमंतातील तांदूळ, तंबाखू, लाकूड इत्यादी उत्पादनांचे हे एक व्यापारी केंद्र आहे. येथे लाख शुद्ध करणे, काचनिर्मिती, लाकूड चिरकाम, विड्या तयार करणे इत्यादींचे कारखाने आहेत. शहरात भातसडीच्या अनेक गिरण्या असल्यामुळे त्याला ‘भाताचे शहर’ (राइस सिटी) असे संबोधले जाते. येथील तंबाखू प्रक्रिया उद्योगही महत्त्वाचा आहे.
ब्रिटिशांनी इ. स. १८८७ मध्ये सुरू केलेल्या बंगाल-नागपूर या लोहमार्गावर इ. स. १८८८ मध्ये गोंदिया स्थानकाची निर्मिती करण्यात आली. हावडा-नागपूर-मुंबई किंवा मुंबई-कोलकाता लोहमार्गावर आणि मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावर हे शहर असल्याने दळणवळणाच्या उत्तम सुविधा लाभल्या आहेत. त्यामुळे या शहराचे व्यापारी महत्त्व वाढले आहे. हे शहर रस्त्यांनी जबलपूर, रायपूर आणि हैदराबाद या शहरांशी जोडले आहे. मध्य व पूर्व भारतातून महाराष्ट्रात येण्याचे गोंदिया हे प्रवेशद्वार असल्याचे मानले जाते. गोंदियापासून १२ किमी. वर असलेल्या बिरसी येथे विमानतळ आहे. गोंदिया नगर परिषदेची स्थापना इ. स. १९२० मध्ये करण्यात आलेली आहे.
गोंदियाचा परिसर वन आणि निसर्गसंपदेने समृद्ध आहे. परिसरातील नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, हाजरा धबधबा ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. तसेच येथे तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा आहेत.
समीक्षक : वसंत चौधरी