होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई (एचबीएनआय) : होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई आणि तिच्या संलग्न संस्था सेंट्रल एज्युकेशन इंस्टिट्यूशन कायदा २००६ नुसार या संस्थेला १० मे, २०२० पर्यंत ३.५३ गुणांचा दर्जा मिळाला आहे (सर्वोत्तम संस्थेचा दर्जा ४.० आहे). होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट (एचबीएनआय) ही अणुऊर्जा विभागातर्फे स्थापन केलेली व अभिमत विद्यापीठाचा दर्जा असलेली राष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेशी इतर अकरा संस्था संलग्न आहेत. भारतातील अभिमत विद्यापीठे तीन गटात विभागलेली आहेत. मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्सेस डिपार्टमेंट (MHRD) – भारतीय शिक्षा विभागाने एचबीएनआय या संस्थेस अभिमत विद्यापीठातील सर्वोच्च अ गटामध्ये स्थान दिले आहे.
केंद्र शासनाच्या अणुऊर्जा विभागाची सुरवात १९५४साली झाली. विभागाच्या स्थापनेमागे ऊर्जानिर्मिती, कृषि,औद्योगिक,आरोग्य व उच्च गणिती कौशल्ये यासाठी संशोधन करणे अपेक्षित होते. या उद्देशाने अणूऊर्जा विभागाने अनुदाने देऊन अनेक संशोधन केंद्रे निर्माण केली व अनुदानपात्र संस्थांचे जाळे तयार केले. अणूविभागांतर्गत एकाच विभागामध्ये अनेकविध संशोधन संस्था हा नवा प्रयोग होता. २००३ साली यातून एका विद्यापीठ समकक्ष संस्थेची स्थापना झाली. राष्ट्रीय पातळीवरील या नॅशनल इन्स्टिट्यूटला तत्कालीन भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यानी ४ जून २००५ या दिवशी मान्यता दिली. भौतिक शास्त्रज्ञ दिवंगत होमी जहांगीर भाभा यांचे नाव संस्थेस दिले गेले आणि संस्थेचे नामकरण होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट असे झाले. या संस्थेस आणखी दहा समकक्ष संस्था जोडण्यात आल्या.
त्या संलग्न संशोधन संस्था पुढीलप्रमाणे आहेत : बीएआरसी (भाभा अणु संशोधन केंद्र , मुंबई); इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्च, कल्पाकम (चेन्नईजवळ); राजा रामण्णा सेंटर फॉर अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, इंदोर; व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर, कोलकाता; साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स, कोलकाता; इन्स्टिट्यूट फ़ॉर प्लाझमा रिसर्च, गांधीनगर; हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिट्यूट, अलाहाबाद टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई; इन्स्टिट्यूट ऑफ मॅथॅमिटिकल सायन्सेस, चेन्नई; इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स, भुवनेश्वर; नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅन्ड रिसर्च, भुवनेश्वर.
वरील सर्व संस्थांतर्गत शैक्षणिक अभ्यासक्रम एचबीएनआय तयार करते.
एचबीएनआय या संस्थेने रसायनविज्ञान, अभियांत्रिकी, आरोग्य विज्ञान, जीवविज्ञान, भौतिकी, गणित आणि सैद्धांतिक संगणकशास्त्र यांचा स्वतंत्र अभ्यासक्रम चालू केला. यासाठी १९५७ पासून अणुऊर्जा व अणुयांत्रिकी विभागामध्ये कुशल व्यक्ती तयार व्हाव्यात या उद्देशाने नुकतीच पदवी घेतलेल्यांसाठी एक वर्षाचे प्रशिक्षण द्यायला प्रारंभ केला. या विभागाला ग्रॅज्युएट स्कूल म्हणतात. भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई; इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्च, कल्पाकम; राजा रामण्णा सेंटर फॉर अॅडव्हान्सड टेक्नॉलॉजी, इंदोर; आणि इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझमा रिसर्च, गांधीनगर या चारही ठिकाणी अशी ग्रॅज्युएट स्कूल्स चालू आहेत.
याशिवाय एचबीएनआय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी मद्रास येथील विद्यार्थी येथे प्रगत ज्ञान मिळवण्यासाठी येत असतात.
न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीमध्ये डॉक्टरेट करणारे विद्यार्थी व अणुऊर्जा विभागामधील कर्मचारी डॉक्टरेटसाठी येथे संशोधन करतात. एमएससी इंजिनियरिंगसाठी सुद्धा नोंदणी करण्याची येथे सोय आहे. नव्याने पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यासाठी एम. फिल., एम.टेक. व एक वर्षाचे प्रकल्प करावे लागतात. ज्यांना उपयोजित क्षेत्रात प्रयक्ष काम करायचे आहे उदा., लेझर, अक्सीलरेटर, रेडिओलॉजीकल सेफ्टी इंजिनियरिंग, मटेरियल सायन्स आणि स्फोटक भूशास्त्र अशा व्यक्तींसाठी एक वर्षाच्या पदव्युत्तर पदविकासाठी सुद्धा येथे प्रवेश मिळतो.
वैद्यकीय पदवीधरांसाठी विशिष्ट वैद्यकीय विभागातील पदव्युत्तर शिक्षण टाटा मेमोरिअल ट्रस्ट आणि बीएआरसी – रामण्णा मेमोरिअल सेंटरमध्ये दिले जाते. उदा., अद्ययावत एमआरआय, रेडिओ इमेजिंग, कोबाल्ट युनिट चालवण्याचे प्रशिक्षण, रेडिओ थेरपी, केमोथेरपी, न्यूक्लियर मेडिसीन यामधील तंत्रज्ञान व प्रशिक्षित डॉक्टरांची उणीव भरून काढण्यासाठी संस्थेने सुपर स्पेशॅलिटी पातळीवर गुंतवणूक केली आहे.
राष्ट्रीय पातळीवरील संस्थांच्या क्रमवारीत एचबीएनआय तिसाव्या स्थानावर आहे तर विद्यापीठ क्रमवारीत संस्थेने २०१९ साली १४ वे स्थान मिळवलेले आहे. एचबीएनआयमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या काळात विद्यावेतन दिले जाते व अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थेमध्ये सामावून घेतले जाते. प्रवेश परीक्षा राष्ट्रीय पातळीवर व एचबीएनआयच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या कार्यक्रमानुसार घेण्यात येतात.
संदर्भ :
समीक्षक : किशोर कुलकर्णी