एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मानवशास्त्रज्ञांनी धर्मसंस्थेच्या उगमासंबंधीच्या मानवी विचारांच्या कक्षांचा आढावा घेऊन काही सिद्धांत मांडले. त्यांच्या मते, आदिम मानव जेव्हा आसपासच्या वातावरणाशी संबंध प्रस्थापित करत होता, तेव्हा निसर्गाचे दैवतीकरण झाले आणि धर्मसंस्था उदयाला आली. निसर्गाच्या रौद्र रूपापुढे मानवाचा निभाव लागत नाही, हे ध्यानात आल्यामुळे निसर्गतत्त्वांना त्याने देवत्व बहाल केले. त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी त्याने अनेक मार्ग शोधले असावेत. मूर्तिपूजा हा त्यातलाच एक मार्ग. भारतीय वैदिक धर्मामध्ये मूर्तिपूजा नव्हती. पण वैदिक धर्मामधून उत्क्रांत झालेल्या हिंदू धर्माचा मूर्तिपूजा हा एक अविभाज्य भाग आहे. उपनिषद काळामधल्या तत्त्वज्ञानामुळे आणि जैन-बौद्ध दर्शनाच्या अहिंसा तत्त्वज्ञानामुळे यज्ञाची लोकप्रियता कमी झाली. यातूनच सर्वसामान्यांच्या पचनी पडणाऱ्या मूर्तिपूजेचा उगम होऊन मध्ययुगापर्यंत तिचा अधिक विस्तार झाला, असे धर्मकोशकार पां. वा. काणे यांचे मत आहे. मूर्तिशास्त्राचे अभ्यासक नी. पु. जोशी यांना मात्र मूर्तिपूजा स्वाभाविक आणि स्वतंत्रपणे निर्माण झालेली वाटते. उपासनेला भक्तीची जोड मिळून मूर्तिपूजा विकसित झाली असावी, असे त्यांचे मत आहे.
भारताचा विचार करता अभ्यासकांनी नोंदलेले मुख्य पूजाप्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
१) प्राचीन भारतीय समाजात वृक्षपूजेची पद्धत प्रचलित होती.
२) ओबडधोबड दगडांना शेंदूर फासून देवत्व बहाल करण्याची पद्धत काही जमातींमध्ये होती. आजच्या भारतातही अशी अनेक दैवते जागोजागी दिसतात. अनेकदा ही देवस्थाने ‘स्वयंभू’ म्हणून ओळखली जातात. सामान्यतः स्वयंभू देवतांची अवाढव्य मंदिरे नसतात.
३) हे संपूर्ण विश्व जगन्माता आणि जगत्पित्यापासून निर्माण झाले आहे. लौकिक जगात निर्मितीचे कारण असलेल्या स्त्री आणि पुरुष यांच्या जननेंद्रियांना देवरूप मानून लिंगपूजा आणि योनिपूजा अस्तित्वात आली. सिंधुसंस्कृतीमध्ये यासदृश अनेक मूर्ती सापडल्या आहेत. ही पद्धती द्राविडांची असावी, असा अनेक विद्वानांचा तर्क आहे. लिंगपूजेमधून शिवपूजा आणि योनिपूजेमधून देवीपूजा विकसित झाली. वैदिक विचारसरणी पितृसत्ताक असल्यामुळे वैदिक देवतांमध्ये स्त्रीदेवता तुरळक होत्या. लोकसंस्कृतींमधून उत्क्रांत झालेल्या मातृदेवतांना पौराणिक धर्मामध्ये स्थान मिळाले, पण त्या कुणाची तरी पत्नी बनून आल्या.
४) वैदिकांची स्तोत्राधारित यज्ञपद्धती : आर्यांच्या वैदिक धर्मामध्ये यज्ञसंस्थेला महत्त्व होते. ‘देवतोद्देशेन द्रव्यत्यागः यागः’ (देवतेसाठी हविर्द्रव्य अर्पण करणे म्हणजे याग किंवा यज्ञ) अशी यज्ञाची व्याख्या केली जाते. ऋग्वेदकालापासून अनेकविध देवतांसाठी सूक्तपठण करून अग्नीमध्ये हविर्द्रव्य अर्पण करण्याची पद्धत होती. यजुर्वेदकालात तिला विशिष्ट चौकट लाभली. या पूजापद्धतीमध्ये शब्दांना पर्यायाने मंत्रपठणाला महत्त्व होते. काही अपवादात्मक स्थळे वगळता मंत्राशिवाय कोणताही विधी होत नसे. परंतु वैदिक यज्ञसंस्थेमध्ये मूर्तिपूजा मात्र नव्हती. पूजाकालामध्ये देवांचे दोन ठिकाणी वास्तव्य मानले जात असे. १) स्वर्गात राहणाऱ्या देवांना अग्नीमार्फत आहुती पोचवून आपल्या मनोकामना पूर्ण करून घेणे, २) देवतांना यज्ञस्थली सूक्ते म्हणून आवाहन करणे आणि त्यांना उद्देशून अग्नीमध्ये आहुती अर्पण करणे. तथापि वैदिकांचे देव निराकार नव्हते. त्यांच्या रूपाचे, गुणांचे वर्णन ऋग्वेदात येते. परंतु त्यांची मूर्ती करून फुले वाहण्याची मात्र पद्धत नव्हती. यजुर्वेद आणि ब्राह्मणग्रंथांमध्ये मूर्तिपूजेचे पुसटसे उल्लेख आढळतात. ब्राह्मणग्रंथांमधल्या अग्निचयन विधीमध्ये सोन्याची तबकडी सूर्याची प्रतिमा म्हणून वापरली जात असे. वैदिक धर्मातला मूर्तिपूजेचा उगम याच विधीमध्ये असावा, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सिद्ध केले आहे. पशूंची आहुती देताना पशूंची पिठाची मूर्ती करून त्याची अग्नीत आहुती देण्याचीही प्रथा होती. कालांतराने सर्वसामान्यांच्या बुद्धीला आकलन होईल अशी सगुणोपासना आणि आसपासच्या इतर विचारसरणींच्या प्रभावामुळे पौराणिक धर्म परिणत झाला आणि हळूहळू हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मांमध्ये मूर्तिपूजा रूढ झाली असावी.
पूजा-अर्चा असा जोडशब्द मराठी भाषेत वापरतात. त्यातला पूजा हा शब्दही आर्यभाषांमध्ये द्राविडी भाषामधून उसना घेतला आहे.’पू सै’ या द्राविडी धातूचा अर्थ ‘फुलांनी करायचा विधी’ तर ‘अर्चा’ हा शब्द मात्र वैदिक आहे. अर्च् या क्रियापदाचा अर्थ मुख्यतः स्तुती करणे असा आहे. फुले इ. द्रव्ये मूर्तीवर अर्पण करणे याला आर्येतर विधीमध्ये महत्त्व होते, तर शब्दांनी स्तुती करण्याला वैदिक धर्मामध्ये महत्त्व होते. नंतरच्या पौराणिक धर्मामध्ये या दोन्ही पद्धती एकजीव झाल्या. मंत्र म्हणून मूर्तीची षोडशोपचार पूजा सुरू झाली. गणपती, मारुती इ. काही देवांच्या मूर्ती ‘सिंदुरचर्चित’ म्हणजे शेंदराने माखलेल्या असतात. अनेक मंदिरांमध्ये देवींच्या तांदळ्याची, मुखवट्याची पूजा होते. हे तांदळे ही ओबडधोबड शेंदराने माखलेले असतात. देवघरात धातूंच्या मूर्तींची पूजा, वैश्वदेव म्हणजे सर्वदेवांसाठी स्वयंपाक घरातल्या अग्नीमध्ये आहुती देणे, प्राणिमात्रांसाठी घराबाहेर ‘बली’ म्हणजे ‘घास ठेवणे’ या दैनंदिन पूजेमध्येही वैदिक आणि अवैदिक पूजापद्धती एकवटलेल्या दिसतात. एकंदरीत, अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या पूजापद्धतींच्या अनेकविध रूपांमधून मूर्तिपूजा विकसित झालेली दिसते.
ऋग्वेदातल्या बहुतेक सर्व देवता निसर्गातल्या तत्त्वांच्या दैवतीकरणामधून उत्क्रांत झालेल्या दिसतात. या नैसर्गिक तत्त्वांचे मानवी स्वरूपातले वर्णनही ऋग्वेदामध्ये येते. उदा., अग्नीच्या ज्वाला म्हणजे त्याच्या दाढी मिशा इ. या वर्णनांमधली बीजे पुढे मूर्तिपूजेमध्ये परिणत झालेली दिसतात. पौराणिक काळामध्ये देवता बदलल्या. इंद्र, वरुण इ. ची महती कमी होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांना महत्त्व आले. तत्त्वज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. इ. स. चौथ्या-पाचव्या शतकापासून मंदिरनिर्मिती होऊ लागली. मंदिर स्थापत्याच्या विकासाबरोबरच मूर्तिशास्त्राचाही विकास झाला. मूर्तिकारांच्या कलेने देवतांचे लोकमानसांतले आणि पुराणादी ग्रंथांमध्ये साकारलेले स्वरूप मंदिरांमध्ये दृग्गोचर केले. मंदिरामध्ये देवदेवतांच्या मूर्ती आणि त्यांची वाहने विशिष्ट स्वरूपामध्ये कोरली गेली.
साधारणपणे देव-देवतांच्या मूर्ती मानवाकृती असतात. देव हा साधारणतः मानवासारखाच असावा, पण मानवाहून अधिक काहीतरी सामर्थ्य असणारा आहे. त्यामुळे तो मानवासारखा असू शकेल. पण त्याहून अधिक सामर्थ्य दाखवण्यासाठी मानवापेक्षा जास्त हात, जास्त मुखे जोडली गेली असावीत. मानवी मूर्तीसाठी दोन आदरणीय प्रारूपे त्यांच्यासमोर असावीत, एक राजा आणि दुसरा प्रत्यक्ष पाहिलेला पितरांमध्ये सामावलेला पिता, आजोबा इत्यादी. पण या दोघांमध्येही राजा हा गटातल्या इतर मानवांहून श्रेष्ठ. म्हणून देवाच्या मूर्तीसाठी प्रारूप म्हणून राजा निवडला असावा. राजाला सकाळी उठवणे, त्याला स्नान घालणे, दुष्ट शक्तींनी त्यांच्यावर ताबा मिळवू नये म्हणून रात्री त्याला ओवाळणे इ. विधी अथर्ववेद काळापासून विकसित होत होते. त्याच विधींमध्ये थोडाफार बदल होऊन षोडशोपचार पूजाविधी विकसित झाला. अशा रीतीने हे षोडशोपचार राजोपचारांच्या बरोबरीनेच वैदिक आणि अवैदिक पूजा पद्धतीच्या समन्वयामधून विकसित झाले असावेत.
परमेश्वराला पूजा स्वीकारण्यासाठी आवाहन करणे, बोलावणे हा सोळा उपचारांपैकी पहिला उपचार. वेदकालात मूर्तिपूजा नसली तरी देवतांना आवाहन करतच असत. राजालाही स्थानापन्न होताना अमुक ठिकाणी आसनस्थ व्हावे इ. विनंती केली जात असे. शिवाय, वैदिक अतिथिसत्काराच्या मधुपर्क नावाच्या विधीमध्येही आसन (बसायला आसन देणे), पाद्य (पाय धुवायला पाणी देणे), अर्घ्य (आदरणीय व्यक्तीला अर्पण करण्यात आलेल्या वस्तू, पाणी, दूध इ.), आचमन (पिण्यासाठी पाणी देणे) या विधीचा अंतर्भाव असे. राजा, जावई, श्रोत्रिय (विद्वान), नुकताच गुरुकुलातून विद्या संपादन करून आलेला ब्रह्मचारी इ. समाजात मानाचे स्थान असलेल्या व्यक्ती घरी आल्या की, त्यांना मध घातलेले पेय विधिपूर्वक देत असत. हाच तो मधुपर्क विधी. स्नान (स्नान घालणे), वस्त्र (वस्त्र नेसवणे), यज्ञोपवीत (जानवे), गंध, पुष्प इ. मानवी साजशृंगार देवाच्या मूर्तीवर करण्याची प्रथा पडली. राजाला दुष्ट शक्तींनी त्रास देऊ नये म्हणून त्यांच्या शयनगृहात सुगंधी द्रव्य जाळण्याची, धूप लावण्याची प्रथा होती. सुगंधामुळे दुष्ट शक्ती दूर पळून जातात, असा आदिम समज होता. यजमान आणि यजमानपत्नीही यज्ञ करण्यापूर्वी अंगाला सुगंधी द्रव्याचा लेप लावत असत. तसेच राजाला रात्री शांत झोप लागावी म्हणून पिठाचा दिवा करून तो त्याच्यावरून ओवाळून तिठ्यावर नेऊन ठेवत असत. या विधीला अथर्ववेदामध्ये आरात्रिक विधी असे म्हणत. हा विधी करताना म्हणायच्या सूक्ताचे पहिले दोन शब्द (प्रतीक) ‘आ रात्रि ‘ असे आहेत. या सूक्तात रात्रीला उद्देशून केलेली प्रार्थना आहे. या प्रतीकावरूनच या विधीला ‘आरात्रिक’ असे नाव पडले. दीप या उपचारामध्ये अंतर्भूत असलेला आरती विधी आणि आरती हे शीर्षक आरात्रिक विधी मधूनच विकसित झाले आहेत. यज्ञयागामध्ये देवांना दिला जाणारा हवी पुढे नैवेद्य या संकल्पनेत बदलला. या शब्दाचे साम्य मात्र गुरुकुलातल्या ब्रह्मचाऱ्याने पाळायच्या एका रीतीशी आहे. भिक्षा मागून आणल्यानंतर ती गुरूला निवेदन करावी लागे, सांगावी लागे (गुरवे निवेद्य). या नंतरचा विधी म्हणजे मंत्रपुष्पांजली (देवतेच्या मूर्तीवर मंत्र म्हणून फुलांची ओंजळ वहाणे). वैदिक आणि अवैदिक पूजापद्धतींचा सुरेख समन्वय या विधीत दिसतो. यामध्ये ऋग्वेद, ऐतरेय ब्राह्मण आणि तैत्तिरीय आरण्यक या वैदिक ग्रंथांमधून एकूण चार मंत्र समाविष्ट केले आहेत. यज्ञाच्या साहाय्याने देवांनी स्वर्ग मिळवला, हा ऋग्वेदातल्या या श्लोकाचा आशय आहे. दुसरा मंत्र तैत्तिरीय आरण्यकातल्या वैश्रवण यज्ञातला आहे. वैश्रवण म्हणे कुबेर. कुबेर हा वस्तुतः अवैदिक. अवैदिक देवांना प्राचीन वैदिक परंपरेमध्ये हवि देत नसत, तर बलि (घास काढून ठेवणे) देत असत. तैत्तिरीय आरण्यकामध्ये मात्र कुबेराचे स्थान उंचावलेले दिसते. त्याला ‘राजांचा राजा’ म्हटले आहे. त्याला आहुती द्यावी किंवा बली द्यावा असा विकल्पही सांगितलेला दिसतो. तिसरा आणि चौथा मंत्र ऐतरेय ब्राह्मणातील असून ‘ऐन्द्रमहाभिषेक’ या विधीच्या संदर्भात वापरले आहेत. ज्या विधीने देवांनी इंद्राला राज्याभिषेक केला त्याला ऐन्द्रमहाभिषेक म्हणतात. एखादा राजा सार्वभौम व्हावा असे वाटत असेल तर हा विधी करतात. राजोपचार पूजोपचारांमध्ये संक्रमित झाल्याचे या विधीमध्येही दिसते. शिवाय, विविध ग्रंथांमधल्या मंत्रपठणाने पूजाविधीला यज्ञाच्या बरोबरीचे स्थान मिळाले. कुबेरासारख्या अवैदिक देवता वैदिक देवतांमध्ये समरसून गेल्या. राजाला प्राप्त होणारे वैभव यजमानाला मिळावे, अशी आशा व्यक्त केली गेली. प्रदक्षिणा म्हणजे विशेषतः मंदिराभोवती, काही वेळा मूर्तीभोवती डावीकडून उजवीकडे चालणे. घरगुती पूजेमध्ये ‘घालीन लोटांगण’ म्हणत स्वतःभोवती फिरणे ही देखील प्रदक्षिणाच आहे. पूजेचा शेवटचा उपचार म्हणजे नमस्कार. वैदिक यज्ञामध्ये ‘अग्नीच्या जवळ जाऊन प्रार्थना करीत असत. त्या विधीला ‘उपस्थान’ असे नाव होते.
एकंदरीत, पूजाविधी हा वैदिक यज्ञ आणि लोकपरंपरांच्या समन्वयातून उत्क्रांत झालेला दिसतो. यातले बरेचसे विधी राजोपचारामधून विकसित झाले आहेत.
देवतांच्या मूर्ती विसर्जित करण्याजोग्या आणि शाश्वत अशा दोन्ही प्रकारच्या असतात. विसर्जनाच्या मूर्ती मातीच्या (पार्थिव) किंवा सुपारी, नारळ इ. प्रतीके देवता म्हणून वापरली जातात. पार्थिव मूर्तीमध्ये सर्वांची परिचित मूर्ती म्हणजे गणपती. पाचव्या शतकापासून गणपतीची मुख्य देवतांमध्ये गणना होऊ लागली. विघ्नहर्ता देव हे त्यांचे स्वरूप जनमानसाने स्वीकारले. मंदिराच्या प्रवेशद्वारावरची त्याची यक्षस्वरूपी मूर्ती कालांतराने गाभाऱ्यात पोहोचली. घराघरांमध्ये भाद्रपद चतुर्थीला पार्थिव गणपतीचे पूजन होऊ लागले. जेव्हा कधी गणपतीची पार्थिव मूर्ती करण्याचा प्रघात पडला असेल, तेव्हा वैदिक लोकांसमोर यज्ञवेदीचे प्रारूप असले पाहिजे. यज्ञवेदी करताना मातीच्या जोडीला उंदराने उकरलेली माती, रानडुकराने उकरलेली माती घेण्याचा प्रघात होता. गणपतीची पार्थिव मूर्ती तयार करताना कदाचित शेतात सहज उपलब्ध असलेली उंदराने उकरलेली माती (आखुकरिष) वापरली जात असेल. गणपतीला स्वरूप प्रदान करणारा म्हणून उंदराला गणपतीचे वाहन म्हणत असावेत, असा तर्क करता येतो.
मंदिरांमधल्या मूर्तीसाठी प्रादेशिक दगडाचा वापर करत असत. क्वचित प्रसंगी लाकूडही वापरले जाई. पुरीच्या जगन्नाथाची मूर्ती लाकडी आहे. घरगुती पूजेमध्ये देवालयाचे प्रतीक म्हणून लहानसे देवघर आणि त्यात इष्ट देवतांच्या वापरायला आणि घडवायला सोप्या अशा धातूंच्या मूर्तींची स्थापना होऊ लागली.
संदर्भ :
- Chatterji, S. K., ‘Race-Movements and Prehistoric Cultureʼ, The History and Culture of Indian People, Vol., I, The Vedic Age, Ed. Majumdar R. C., Bharatiya Vidya Bhavan, Mumbai, 1951; 2017.
- Kane, P. V., History of Dharmasastra, Vol., II, Bhandarkar Oriental Research Institute, Pune, 1941.
- Kulkarni, Nirmala, ‘Arati-A Developed Form of Aratrikaʼ, Journal of the Asiatic Society of Bombay, Ed. Kulkarni, V. M. & Desai, Devangana, Vols., 67-68, The Asiatic Society, Mumbai, 1994.
- खरे, ग. ह., मूर्तिविज्ञान, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३९.
- जोशी, नी. पु., प्राचीन भारतीय मूर्तिविज्ञान, बिहार राष्ट्रभाषा परिषद, पाटणा, २०००.
- जोशी, महादेवशास्त्री, पूजाविधान, ज्ञानराज प्रकाशन, पुणे, १९६८.
- जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, प्राज्ञ पाठशाळा, वाई, १९५१; १९९६.
समीक्षक : मंजिरी भालेराव