वनस्पतींच्या स्वत:च्या वाढीसाठी तसेच त्यांची उत्पादनक्षमता वाढण्यासाठी मातीमधील पोषकद्रव्यांची उपलब्धता हा मोठा प्रभावी घटक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहणार्या खारफुटी वनस्पतीदेखील याला अपवाद नाहीत. परंतु सामान्यत: खारफुटी वनस्पतींच्या मातीमध्ये पोषकद्रव्यांचे प्रमाण कमी आढळते. तसेच विविध जातीच्या खारफुटींच्या मातीतील पोषकद्रव्यांचे प्रमाणही वेगवेगळे असते. खारफुटींसाठी पोषकद्रव्यांची उपलब्धता ही विविध जैविक आणि अजैविक घटकांमार्फत नियंत्रित केली जाते. भरतीचा पूर, लाटेचा उत्थान, मातीचा प्रकार, रेडॉक्सची परिस्थिती इ. काही अजैविक घटक आहेत, तर सूक्ष्मजीवांचा मातीमधील क्रियाकलाप, वनस्पतींच्या प्रजाती, वनस्पतींचा तयार होणारा पालापाचोळा व कुजण्याची प्रक्रिया हे काही जैविक घटक आहेत.
खारफुटी जमीन ही खारी, आम्ल, ऑक्सिजनचा अभाव असणारी आणि पाणथळ अशी असते. लुगो आणि स्नेडॅकर (Lugo & Snedaker) यांनी केलेल्या अभ्यासानुसार (१९७४) जमिनीमध्ये भरतीच्या वेळी तसेच कधीकधी चक्रीवादळांमुळे अचानक तयार झालेल्या पुरामार्फत या पाणथळ जमिनीमध्ये पोषकद्रव्ये पुरविली जातात. कोमियामा (Komiyama; २००८) आणि नेडवेल (Nedwell; १९७५) यांनी केलेल्या अभ्यासामध्ये विषद केल्यानुसार मोठ्या प्रमाणावर कार्बन धरून ठेवण्याची खारफुटीच्या मुळांची क्षमता आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे पालापाचोळा कुजण्याची सावकाश होणारी प्रक्रिया यांमुळे खारफुटी परिसंस्था ही जमिनीतील जैविक पदार्थांच्या बाबतीत सधन आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे कुजण्याची प्रक्रिया जरी संथ असली, तरीही खारफुटी परिसंस्थेमध्ये पोषकद्रव्यांचे संयोजन होण्यामध्ये ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची ठरते. मुख्य म्हणजे या प्रक्रियेमध्ये तयार झालेली पोषकद्रव्ये लाटांमार्फत फक्त खारफुटींमध्येच नाही, तर किनारपट्टीच्या अन्य भागातील वनस्पतींसाठीदेखील पोहोचविली जातात.
भरती-ओहोटीची वारंवारता, त्याचा खारेपणावर होणारा परिणाम, ऑक्सिकरणाची परिस्थिती आणि पर्यायाने पोषकद्रव्यांची उपलब्धता ही त्या भागातील उंची या घटकामुळे ठरते. अर्थातच पाण्याच्या विविध उंचीच्या भागामध्ये वाढणार्या खारफुटी वनस्पतींमध्ये पोषकद्रव्यांच्या मागणी आणि पुरवठ्याची अतिशय गुंतागुंतीची प्रणाली आढळून येते आणि याच कारणामुळे समुद्रकिनारी विविध पट्ट्यामधे वाढणार्या खारफुटी वनस्पतींच्या रचनेमध्ये फरक असतो.
मकी (McKee; १९९३) यांनी केलेल्या अभ्यासानुसार, खारफुटींच्या भागात होणार्या रेडॉक्स प्रक्रियांचा जमिनीतील पोषकद्रव्यांच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम होतो. ऑक्सिजनचा अभाव असणार्या या जमिनीमध्ये कांदळ या खारफुटी वनस्पतींच्या मुळांमधून बाहेर टाकल्या जाणार्या ऑक्सिजनमुळे मुळांच्या भोवतालच्या जमिनीमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण अल्पसे वाढते.
खारफुटीच्या जमिनीमध्ये विनायट्रिकरण करणारे बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसेच जलद गतीने होणार्या विनायट्रिकरणामुळे नायट्रेटचे नायट्राइटमध्ये रूपांतर होऊन अमोनिया तयार होतो. जमिनीवर वाढणार्या वनस्पतींच्या तुलनेत खारफुटी वनस्पतींकडून अमोनियाचे शोषण अल्प प्रमाणात होते व उरलेला अमोनिया मातीमध्ये वापरासाठी उपलब्ध राहतो. शिवाय ऑक्सिजनचा अभाव असणारी माती आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असणारे सेंद्रीय पदार्थ ही नायट्रोजन स्थिरीकरणासाठी अनुकूल परिस्थिती तयार होते, ज्यायोगे येथल्या दलदलीमध्ये नायट्रोजन हे अतिशय महत्त्वाचे पोषकद्रव्य राखले जाते.
खारफुटीच्या दलदलीमध्ये फॉस्फेट हे स्थिर असल्याने वनस्पतींसाठी थेट उपलब्ध होऊ शकत नाही. परंतु फॉस्फेटचे विद्रव्य करणारे जीव यासाठी महत्त्वाची कामगिरी पार पाडतात. ट्रेसेडर (Treseder) आणि क्रॉस (Cross; २००६) यांनी अर्बस्क्युलर मायकोरायझा (Arbuscular mycorrhiza) हे फॉस्फेट विद्रवाचे काम करणारे कवक फक्त नीचतम क्षारतेमध्ये येणार्या खारफुटींच्या मातीमधे आढळते असे निरीक्षण नोंदविले आहे.
नायट्रोजन आणि फॉस्फेट व्यतिरिक्त सर्व वनस्पतींना पोटॅशियमची जरुरी असते. पेशीअंतर्गत विद्युत तटस्थता राखण्यासाठी, अभिसार नियमनासाठी, संप्रेरकांच्या कृतीशीलतेसाठी, प्रथिनांच्या संश्लेषणासाठी आणि प्रकाशसंश्लेषणासाठी पोटॅशियम महत्त्वाचे असते. उकपोंग (Ukpong; १९९७) यांनी त्यांच्या शोधनिबंधामध्ये याचा आढावा घेतला आहे. उच्चतम क्षारतेच्या जमिनीमध्ये सोडियमचे आयन पोटॅशियम आयनांना पुनर्स्थित करतात. त्यामुळे पोटॅशियमच्या उपलब्धतेला मर्यादा येते.
अभ्यासकांच्या मते, प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढणार्या खारफुटींसाठी जमिनीतील पोषकद्रव्यांची अल्प उपलब्धता हा त्यांच्या वाढीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. असे असतानाही आहे त्या परिस्थितीमध्ये तग धरून राहण्यासाठी ही अल्प पोषकद्रव्ये या वनस्पती अतिशय कुशलतेने वापरतात.
संदर्भ :
- Komiyama A, Ong JE, Poungparn S Allometry, Biomass, and Productivity of Mangrove Forests : a review. Aquat Bot 89:128–137, 2008.
- Lugo, AE; Snedaker, SC The ecology of mangroves. Ann Rev Ecol Syst 5:39–64,1974.
- McKee, K.L., Soil physicochemical patterns and mangrove species distribution — reciprocal effects? J. Ecol. 81:477–487, 1993.
- Nedwell, D.B., Inorganic nitrogen metabolism in an eutrophicated tropical estuary Water Res. 9:221–231, 1975.
- Treseder KK, Cross A Global distributions mycorrhizal of arbuscular fungi. Ecosystems 9:305–3016, 2006.
- Ukpong IE Vegetation and its relation to soil nutrient and salinity in the Calabar mangrove swamp, Nigeria. Mangroves and Salt Marshes volume 1, pages211–218,1997.
समीक्षक : शरद चाफेकर