वायुजैवविविधतेचा अभ्यास अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे. हवेमधील रोगकारक व अधिहर्षताकारक जिवंत वा मृत – घटक उदा., कवकांचे बीज, परागकण, कीटक, कीटकांच्या शरीराचे सूक्ष्म भाग, मानवाच्या आरोग्याला अपायकारक असू शकतात. हवेमध्ये नक्की कोणते जिवंत वा मृत जैविक घटक आहेत याचा अभ्यास केल्यास सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याकरिता अशा घटकांचे हवेमधील प्रमाण शोधण्यासाठी विविध प्रकारे नमुने गोळा केले जातात. त्यातील काही पद्धती खालीलप्रमाणे –

छायाचित्र १: आघात नमुना संकलन यंत्र आणि त्याद्वारे गोळा केलेल्या विविध सूक्ष्मजीवांचे नमुने

१. गाळणी पद्धत (Infiltration Method) : या पद्धतीत विशिष्ट प्रकारचे कापड वापरून हवेतील घटक त्यामध्ये गोळा केले जातात. पॉलीकार्बोनेट (Polycarbonate), पॉलीटेट्रा – फ्लुरो – एथिलीन (Polytetrafluoroethylene), पॉलीविनील क्लोराइड (Polyvinyl Chloride), नायलॉन, जिलेटीन इत्यादी घटक वापरून विशिष्ट प्रकारचे जाळीसारखे कापड हवेतील घटकांचे नमुने गोळा करण्यासाठी तयार केले जाते. अशा कापडाचे तुकडे हवेत टांगून ठेवतात. काही काळानंतर हे तुकडे थेट विद्युतपरमाणू सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यासतात किंवा नमुन्यातील जैविक घटक पोषक माध्यमावर (Nutrient Media) वाढवून त्यांचा अभ्यास केला जातो.

आ. १ : द्रवीभूत नमुना संकलनपद्धती

२. आघात नमुना संकलनपद्धती (Impaction Based Sampler) : आघात नमुनापद्धती ही अतिशय सामान्यपणे व सर्वांत जास्त वापरली जाणारी पद्धती आहे. या पद्धतीमध्ये संकलन यंत्राच्या वरच्या भागात एक जाळीदार झाकण असते. झाकणाच्या खालच्या भागात ठेवलेल्या बशांमध्ये (Petri dishes) पोषक माध्यम पसरलेला असतो. निर्वात पंप सुरू केल्यावर जाळीतून हवा यंत्रात शिरते व हवेतील जिवंत जीवकण पोषक माध्यमावर चिकटून त्यांची वाढ सुरू होते. पुरेशी वाढ झाल्यावर त्या जीवांचा अभ्यास करणे सुलभ होते. यंत्रातून पाठवलेली हवा आणि बशांवर वाढ झालेले जीवप्रकार आणि त्यांची संख्या यांचे गुणोत्तर मांडल्यावर हवेतील जैवविविधता व त्यांचे आकारमान यांचा विश्वासार्ह अंदाज बांधता येतो. (छायाचित्र १)

छायाचित्र २ : टिळक संकलन यंत्र

अंडरसन आघात नमुना संकलन यंत्रामध्ये अनेक बशा ठेवून एकाच वेळी अनेक प्रकारच्या सूक्ष्मजीवांचे संकलन करून अभ्यास करता येतो.

३. द्रवीभूत नमुना संकलन (Liquid Impingement Method) : या नमुना गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये हवेमधील सूक्ष्मकण द्रव पदार्थामध्ये शोषून घेतले जातात. या द्रवाचे थेंब विविध प्रकारच्या पोषक पदार्थांवर ठेवून त्यातील सूक्ष्मजीव वाढविले जातात. यानंतर त्यांचा अभ्यास करता येऊ शकतो. (आ. १)

४. टिळक नमुना संकलन यंत्र (Tilak Sampler) : टिळक व कुलकर्णी या संशोधक द्वयीने १९७० मध्ये हवेमधील परागकण आणि कवकबीजाचा अभ्यास करण्यासाठी स्वतः नमुने संकलन यंत्र आरेखित केले आणि त्याचा वापर करून महाराष्ट्रामध्ये वायुजीव शास्त्रामध्ये काम केले. या नमुना संकलन यंत्रास टिळक नमुना संकलन यंत्र असे संबोधले जाते. या यंत्रामध्ये वरील बाजूस बॅटरीच्या (Battery) सहाय्याने फिरणारी चिकटपट्टी (Rotating Cellotape) असून, तीवर हवेमधील सूक्ष्मकण चिकटतात. विशिष्ट वेगाने फिरणारी चिकटपट्टी, त्या पट्टीचे क्षेत्रफळ यावरून हवेमधील जैविक कण (परागकण, कवकबीजे इत्यादी) यांच्या प्रतिलिटर संख्येचा अंदाज बांधता येतो.

समीक्षक : शरद चाफेकर