कारी, बँक्स मुलिस : (२८ डिसेंबर १९४४ – ७ ऑगस्ट २०१९) कारी बँक्स मुलिस यांचा जन्म नॉर्थ कॅरोलीनाच्या (यूएस) लेनोईर येथील ब्लू रिज माऊंटन भागात झाला. त्यांचे कुटुंब ग्रामीण भागात शेती करत होते. त्यांना आपल्या भागातील सजीवांचे निरीक्षण करण्याची आवड होती. साऊथ कॅरोलीनामधील ड्रेहर हायस्कूल मध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांच्या रसायन विज्ञानातील आवडीमुळे रॉकेटचे घन इंधन हायस्कूलमध्ये असतानाच त्यांनी बनवले होते. जॉर्जिया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून रसायनशास्त्रात त्यांनी बीएस पदवी मिळवली. बर्कले येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, जे. बी. नैलॅन्ड यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी जीवरसायन शाखेतील पीएच्.डी. संपादन केली. त्यापूर्वी त्यांच्या एकट्याच्या नावावर नेचर या विख्यात विज्ञान संशोधन पत्रिकेत खगोलभौतिकी विज्ञानावर शोधनिबंध प्रसिद्ध झालेला होता.
पोस्ट डॉक्टरेट काळात त्यांनी बालहृदयरोग (पेडियाट्रिक कार्डिऑलॉजी) आणि औषध रसायन विज्ञान (फार्माकॉलॉजिकल केमिस्ट्री) या विषयांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या शिक्षण कारकीर्दीने अनेक बदल पाहिले. कान्सास युनिव्हर्सिटीतील फेलोशिपच्या काळात ते चक्क कथा लेखक झाले होते. त्यांच्या एका मित्राने त्यांच्यातील रेण्वीय जीवविज्ञानाचे ज्ञान व कसब ओळखून त्याना डीएनए केमिस्ट म्हणून सीटस कार्पोरेशन या जैवतंत्रज्ञान कंपनीत नोकरी देऊ केली. येथे त्यांनी सात वर्षे संशोधन केले. कंपनीचे संचालक व्हाईट यांच्या बरोबर डीएनए सिन्थेसिस प्रयोगशाळेत संशोधन करताना त्यांनी पॉलिमरेझ चेन रिअॅक्शनचा शोध लावला. नंतर अनेक संस्थांमध्ये व खाजगी संशोधन केंद्रात त्यांनी काम करून पाहिले. एल्व्हिस प्रीसले आणि मर्लिन मोन्रो यांच्या दागिन्यामधून मिळवलेल्या डीएनएच्या प्रती काढून विकण्याचा उद्योगही त्यांनी करून पाहिला.
सीटस कार्पोरेशनमध्ये कारी केमिस्ट म्हणून काम करत असताना एकेदिवशी ते त्यांच्या मैत्रिणीबरोबर घरी परतत होते, त्यावेळी लहान लांबीच्या डीएनए क्रमाच्या अनेक प्रती कशा काढता येतील याचा ते विचार करू लागले. त्यांचे सहकारी थॉमस व्हाईट यांनी मुलिस यांना नेहमीच्या प्रकल्पावरून फक्त पीसीआर म्हणजे पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. शेवटी त्यांना पीसीआर पद्धतीने डीएनएच्या प्रती काढता आल्या, मात्र पुन्हा प्रयोग करताना सहकाऱ्यांनी केलेल्या चुकांमुळे अपेक्षित परिणाम मिळाला नाही.
पीसीआर तंत्रातील गोंधळ म्हणजे प्रत्येक डीएनएच्या प्रतीकरणाच्या वेळी तापमान वाढल्यामुळे डीएनए पॉलिमरेझ विकर अकार्यक्षम होत असे. विकर हे प्रथिन असल्याने अधिक तापमानास अकार्यक्षम होणे हे त्याचा स्थायीभाव आहे. मुलिस याचे सहकारी साइकी (Saiki) यांनी थर्मोफिलस ॲक्वाटिकस मधील डीएनए पॉलिमरेझ (लघुरूप Taq) विकराचा वापर डीएनएच्या प्रती काढण्यासाठी यशस्वीपणे केला. अधिक तापमानाससुद्धा हे विकर सुरळीतपणे डीएनएच्या प्रती काढत राहते. या लहानशा सुधारणेमुळे मुलिस यांच्या तंत्राने जैवरसायन विज्ञान, रेण्वीय जीवविज्ञान, आनुवंशविज्ञान, औषधनिर्मिती, आणि गुन्हे शोधन क्षेत्रामध्ये क्रांती झाली. केवळ या एका तंत्रामुळे रेण्वीय जीवविज्ञानाचा इतर शाखेमध्ये प्रभाव वाढला. अगदी दूरवरच्या शाखा पर्यावरण विज्ञान आणि उत्क्रांतीमधील आजवर न सुटलेले प्रश्न सोडवण्यात पीसीआरचा वाटा आहे.
अॅन्थ्रॅक्सवर पीसीआरच्या सहाय्याने लस तयार केल्याबद्दल अमेरिकन शासनाने मुलिस याना पाच लाख डॉलर मानधन दिले.
पीसीआर सारखे आणखी काही प्रयोग मुलिस यांच्यापूर्वी झालेले होते. त्यामध्ये हरगोबिंद खोराना आणि जेल क्लेप या नॉर्वेजियन वैज्ञानिकाचा समावेश होता.
अनेक अडथळ्यानंतर मुलिस यांना १९९३ साली रसायनविज्ञानातील पीसीआर (polymerase chain reaction) च्या शोधाबद्दल मायकेल स्मिथ यांच्याबरोबर नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला. त्यांच्या या शोधामुळे रेण्वीय जीव विज्ञानात पीसीआरपूर्वी व पीसीआर नंतर अशी दोन युगे ओळखली जातील असे न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकीयामध्ये लिहिले गेले.
समुद्राच्या लाटावर सर्फिंग करणे आणि गिटारवादन हे त्यांचे आवडते छंद होते.
न्यूपोर्ट बीच या ठिकाणी त्यांचे न्यूमोनिया मुळे निधन झाले.
संदर्भ :
· https://www.britannica.com/biography/Kary-Mulli
समीक्षक : किशोर कुलकर्णी