संयंत्र, यंत्रसामुग्री इत्यादी स्थिर भांडवली साधनसंपत्ती (फिक्स्ड कॅपिटल असेट) उत्पादन व सेवा देण्यासाठी उपयोगात आणल्यामुळे त्या भांडवली साधनसंपत्तीच्या मूल्यात जी घट होते, त्यास घसारा असे म्हणतात. घसारा ही लेखाकर्मविषयक (अकाउंटिंग) महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. लेखाकर्माद्वारे घसाऱ्याचे मापन केले जाते. घसाऱ्याचे अर्थशास्त्रासह वाणिज्य, स्थापत्यशास्त्र आणि बीजगणित या विषयांतही अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधनसंपत्तीच्या मूल्यात होणारी घट लक्षात घेऊन ठरावीक रक्कम दरवर्षी ताळेबंदामध्ये स्थिर मालमत्तेमधून वजा केली जाते आणि नफा-तोटा पत्रकास खर्ची टाकली जाते. इमारत, यंत्रसामग्री, वाहतुकीची जड वाहने, अज्ञांकण (सॉफ्टवेअर) इत्यादी झीज होणाऱ्या भांडवली संसाधनाचे क्षयमूल्य म्हणजे घसारा होय. ऋण परिशोधनक्षम मालमत्तेचाही (ॲमोरटाइज्ड असेट) घसारा मापनसंदर्भात विचार केला जातो. ज्या भांडवली मालमत्तेचा लेखाकर्मविषयक कालावधी एक वर्षापेक्षा जास्त आहे, जिचे आयुष्यमान वर्षामध्ये निश्चित आहे आणि जी मालमत्ता उद्योग व्यवसाय उपक्रमाद्वारे उत्पादनासाठी धारण केली जाते अशा मालमत्तेला घसारायोग्य भांडवली मालमत्ता असे म्हणतात. निर्धारित कालावधीत भांडवली वस्तूंच्या क्षयमूल्याचा विचार केला जातो.

अर्थशास्त्रात घसाऱ्याचे मापन करताना कालमानानुसार आर्थिक घटकांच्या प्रभावामुळे वस्तूंच्या बाजार मूल्यात होणारी घट म्हणजेच भांडवली वस्तूंचे क्षयमूल्य विचारात घेतले जाते. अर्थशास्त्रज्ञांद्वारे सूटयुक्त रोकड प्रवाह (डिस्काउंट कॅश फ्लो) तंत्राचा भांडवली मालमत्ता मूल्य निश्चितीसंदर्भात अवलंब केला जातो. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांनी जनरल थिअरी या ग्रंथात घसारा मापनविषयक सूत्रबद्ध मांडणी केली असून उपयोगकर्ता खर्च (युजर कॉस्ट) म्हणून घसाऱ्याचा उल्लेख केला आहे. अर्थशास्त्रीय घसाऱ्याचा वस्तूंच्या बाजारातील विक्रीमूल्यावर परिणाम होतो. स्थावर मालमत्तेच्या वित्तीय विश्लेषणासाठी अर्थशास्त्रीय घसाऱ्याचा विचार केला जातो. अर्थशास्त्रीय घसारा खुल्या बाजारात मालमत्तेची विक्री करताना महत्त्वपूर्ण ठरतो. अर्थशास्त्रात विशिष्ट वर्षातील निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचे बाजारकिमतीनुसार मापन करताना स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा (एनएनपी = जीएनपी – डिप्रेसिएशन) केला जातो. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात तरते विनिमयदर (फ्लोटिंग एक्सचेंज रेट) पद्धतीच्या संदर्भात ‘चलन घसारा’ ही पद्धत महत्त्वाची मानली जाते. परकीय चलन विनिमय बाजारात विदेशी चलनाची मागणी वाढल्याने देशी चलनाचे मूल्य घटले असता त्यास चलन घसारा असे म्हणतात. चलनाचे अवमूल्यन व चलन घसारा यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशी चलनाचे मूल्य घटत असले, तरी अवमूल्यन हा धोरणात्मक परिणाम आणि चलन घसारा हा बाजारशक्तीचा परिणाम असतो. अर्थव्यवस्थेवर अवमूल्यनाचा परिणाम हा अल्पकालीन, तर चलन घसाऱ्याचा दीर्घकालीन परिणाम होतो. चलनाचे अवमूल्यन ही प्रासंगिक प्रक्रिया, तर चलन घसारा ही दैनंदिन व्यावहारिक प्रक्रिया आहे. अर्थव्यवस्थेतील विदेशी गुंतवणूक, आयात-निर्यात, भाववाढ आणि एकूण मागणी अशा घटकांवर चलन घसाऱ्याचा परिणाम होतो.

उत्पादन प्रक्रियेतील वस्तूच्या वापरामुळे होणारी झीज, नैसर्गिक झीज, तंत्रज्ञानात्मक बदल, वस्तूंची नश्वरता, वस्तूंचे संपुष्टात येणारे आयुष्यमान, कालमानातील तफावत आणि मागणीतील घट ही घसाऱ्याची प्रमुख कारणे आहेत. उद्योग व्यवसाय उपक्रमांच्या प्रचालनाचा वास्तव परिणाम जाणून घेणे, स्थिर भांडवली साधनसंपत्तीच्या मूल्याचे योग्य निदान करणे आणि भांडवली मालमत्तेसाठी सुयोग्य पर्याय निर्माण करण्यासाठी भांडवल संचय करणे ही घसाराविषयक तरतुदीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. विशिष्ट अंकेक्षण कालावधीसाठी घसारा रकमेचे मापन करताना वस्तूचा ऐतिहासिक खर्च, वस्तूचे उपयोगितापूर्ण आयुष्यमान आणि वस्तूचे उर्वरित मूल्य हे घटक निर्धारक ठरतात. घसाराक्षम भांडवली वस्तूचे उपयोगितापूर्ण आयुष्यमान हे भौतिक आयुष्यमानापेक्षा कमी असते. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाइड पब्लिक अकाउंटन्ट्स (एआयसीपीटी) या संस्थेने घसारा लेखा प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. घसारा तरतुदीचे लेखा कालावधीनुसार निर्धारण, योग्य मापनपद्धती, उपयोगितापूर्ण आयुष्यमान ऐतिहासिक खर्च, पुनर्मूल्य निश्चिती, वित्तीय लेखा व त्यातील तरतुदी ही घसारा मापनविषयक प्रमुख तत्त्वे आहेत.

हॉटलिंग व राईट यांनी घसाराविषयक सर्वसाधारण बीजगणितीय प्रतिमान मांडले असून भांडवली मालमत्ता मूल्यवृद्धीची अपेक्षा, मालमत्तेचा पूर्ण क्षमतेने वापर आणि प्रचलित धोकाखर्च ही त्याची गृहितके आहेत. त्यांच्या प्रतिमानाचे सूत्रात प्रचालन खर्च, वार्षिक उत्पादन एकक, उत्पादन एककाचा विक्रीखर्च आणि वार्षिक भाडेकरार मूल्य अशा घटकांचा अंतर्भाव आहे. स्थापत्यशास्त्रात कालमानाचे भौतिक फलन म्हणून घसारा ही संकल्पना विचारात घेतली जाते. सरळ रेखा, मूल्यक्षय, तासाधारित यंत्रकार्यभार आणि उत्पादन एकक या घसारा मापनविषयक प्रमुख पद्धती आहेत. लेखाकर्मात घसाराखर्च काढण्यासाठी भिन्न पद्धतीनुसार विशिष्ट सूत्राचा अवलंब केला जातो.

                                                                                                  मालमत्ता खर्च – हानी संरक्षक मूल्य

१) सरळ रेखा पद्धतीनुसार                                   घसाराखर्च = —————————————

                                                                                                  भांडवली वस्तूचे उपयोगिता मूल्य

                                                                                                मालमत्ता खर्च – वार्षिक घसारादर

२) मूल्यक्षय पद्धतीनुसार                                      घसाराखर्च = ————————————–

                                                                                                                       १००

                                                                                                        मालमत्ता खर्च – वार्षिक घसारादार

३) उत्पादन एकक पद्धतीनुसार                              घसाराखर्च = ————————————-

                                                                                                        उत्पादनानुसार उपयोगिता मूल्य

वार्षिक घसारा काढण्यासाठीचे सर्वसाधारण सूत्र

वार्षिक घसारा = भविष्यकालीन मूल्य = वर्तमान मूल्य (१ + र/१००)न

र = वार्षिक घसारादार      न = एकूण वर्षसंख्या

अंशलक्ष्यी व समग्रलक्ष्यी अर्थशास्त्रातील आर्थिक विश्लेषणासाठी घसारा ही महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. कंपनीक्षेत्राच्या नफा व तोटा टाळेबंदाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून घसाऱ्याचा उल्लेख केला जातो. घसारा मापनासाठी वेगवेगळ्या व्यावसायिक उपक्रमांद्वारे लेखाकर्मविषयक भिन्न धोरणांचा अवलंब केला जातो. लेखाकर्मात घसाऱ्याच्या भौतिक व आर्थिक बाजूंना महत्त्व दिले जाते. लेखाकर्मात स्थिर मालमत्तेचा कालमान खर्च तिच्या आर्थिक आयुष्यमानाधारे काढणे हा मुख्य हेतू असतो. कंपनीक्षेत्राला ताळेबंद निर्धारणासाठी घसाराविषयक नोंद महत्त्वाची ठरते. उद्योग व्यवसाय उपक्रमांच्या वित्तीय स्थिती निर्धारणात घसारा ही महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. कंपनीक्षेत्राद्वारे उपयोगात आणलेल्या भांडवली मालमत्तेचा भागधारक व संबंधितांसमोर तपशील मांडताना घसारा आधारभूत ठरतो. कंपनीने कितीही दराने घसारा आकारला, तरी आयकर कायद्याला तो मंजूर नसतो.

संदर्भ :

  • Accountants Encyclopedia, Vol. I, Mumbai, 1989.
  • Bauer, Jaun, Encyclopedia of the Social Sciences, Vol. 5, U. S. A., 1937.
  • Keynes, John Maynard, The General Theory of Employment, Interest, and Money, London, 1964.
  • Porwal, L. S., Accounting Theory : An Introduction, New Delhi, 1996.

समीक्षक : गोविलकर, विनायक