एखाद्या उत्पादन संस्थेने आपल्या उत्पादनांचा विस्तार कसा करावा, हे सांगणारा मार्ग म्हणजे विस्तार पथ. कोणत्याही उत्पादन संस्थेचे उद्दिष्ट कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळविणे हे असते. समजा, एखाद्या उद्योजकाकडे १ लाख रु. इतकी रक्कम असेल, तर ती रक्कम विविध उत्पादन घटकांवर खर्च करून उत्पादनाची सर्वांत वरची पातळी गाठण्याचा तो प्रयत्न करेल. म्हणजेच इतर परिस्थिती स्थिर असताना (उदा., उत्पादनाचे तंत्रज्ञान, उत्पादन घटकांच्या किंमती, उत्पादन घटकांचा दर्जा इत्यादी) उद्योजकाने क्ष वस्तूचे उत्पादन करण्याची एखादी पातळी ठरविली असेल (जसे, दर आठवड्याला क्ष वस्तूचे ५,००० नग), तर ती गाठण्यासाठी तो कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न करेल.

आकृती क्र. १

आकृती १ मध्ये दर्शविल्याप्रमाणे अब या सरळ रेषेस समखर्च रेषा म्हणतात. क्ष अक्षावर आणि अक्षावर दोन निरनिराळे उत्पादन घटक दर्शविले आहे. जसे क्ष अक्षावर मजुरांची संख्या, तर अक्षावर भांडवलाचे नग. उत्पादकाकडे १ लाख रु. स्थिर रक्कम आहे असे मानले असता, ती सर्व खर्च करून तो किती मजूर आणि भांडवल यांचे एकत्रित नग उत्पादनासाठी खरेदी करू शकतो ते अब या रेषेवरील बिंदूंवरून समजते. जर त्याच्याकडील रक्कम १ लाख रु. ही स्थिर असेल, तर तो मजूर जास्त लावल्यास भांडवल कमी वापरेल. याउलट, त्याने भांडवल जास्त वापरले, तर मजूर कमी वापरावे लागतील. आकृतीत स१ आणि स२ या वक्रांना समउत्पादन वक्र म्हणतात. स१ वरील सर्व बिंदू उत्पादनाची एकच स्थिर पातळी दर्शवितात. उदा., त्या वक्रावरील कोणताही बिंदू घेतला, तरी मजूर आणि भांडवल यांच्या वेगवेगळ्या नगसंख्यांचा वापर करून तिच स्थिर उत्पादन पातळी गाठता येते, जसे दर आठवड्यास ५,००० नग. याच पद्धतीने स२ हा वक्र निरनिराळ्या घटक गटांपासून ७,००० नग दर आठवड्यास अशी वाढीव पातळी दर्शविते. स१ ऐवजी स२ किंवा त्याहीपेक्षा वरची उत्पादन पातळी गाठण्याची उत्पादकाची सदैव धडपड असते; परंतु त्याच्या इच्छेला त्याच्या जवळ असणाऱ्या भांडवलाची मर्यादा पडते. त्यामुळे हाताशी असलेली रक्कम आणि अधिकाधिक उत्पादन पातळी गाठण्याचे त्याचे प्रयत्न यांचा संयोग या बिंदूत होतो. म्हणून उत्पादक आपल्या जवळील १ लाख रु. खर्च करून क्ष घटकाचे वड नग आणि घटकाचे वक नग वापरतो आणि ५,००० नगांचे उत्पादन करतो.

उत्पादकाजवळ १ लाख रु. ऐवजी २ किंवा ३ लाख रु. असेल, तर इतर परिस्थिती स्थिर राहिल्यास तो मजूर आणि भांडवल या घटकांचा वाढता वापर करून उत्पादनाची वरची पातळी गाठू शकतो.

आकृती क्र. २

आकृती २ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्या त्या खर्च पातळीला वाढती उत्पादन पातळी दाखविणारे ई१, ई२, ई३ ही बिंदू जोडून जी र१ रेषा तयार होते, तीला विस्तार पथ असे म्हणतात. ती दर वेळेस थेटपणे वाढ सूचित करणारी रेषा असेल असे नाही. उत्पादनावर अधिक पैसा खर्च करताना उत्पादक मजुरांची संख्या हळूहळू वाढवून भांडवालाची मात्रा वेगाने वाढविण्याचा निर्णय घेऊ शकतो. याला भांडवलप्रधान तंत्र म्हटले जाते. याउलट, उत्पादक मजुरांवर अधिक पैसा खर्च करून भांडवलावर तुलनेने कमी खर्च करेल. याला श्रमप्रधान तंत्र म्हटले जाते. आकृतीतील र२ हा विस्तार पथ भांडवलप्रधान तंत्र, तर र३ हा विस्तार पथ श्रमप्रधान तंत्र होय.

उत्पादनाचे नियोजन करण्यासाठी उत्पादकाला विस्तार पथ या संकल्पनेचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो.

समीक्षक : श्रीराम जोशी