सूझन, ली लिङ्क्वीस्ट : (५ जून १९४९ – २७ ऑक्टोबर २०१६) सूझन ली लिङ्क्वीस्ट या एक जागतिक कीर्तीच्या अमेरिकन जीवशास्त्रज्ञ होत्या. त्यांचा जन्म अमेरिकेच्या शिकागो राज्यातील इलिनॉय येथे झाला. ‘जीवसृष्टी कसे कार्य करते?’ हा विज्ञानाची गोडी असलेल्या लिङ्क्वीस्ट यांचा आवडता प्रश्न होता. शालेय शिक्षणानंतर त्या इलिनॉय विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्रात पदवीधर झाल्या. हार्वर्ड विद्यापीठातन त्यांनी रेण्वीय पेशीविज्ञानात पीएच्.डी. पदवी मिळवली.

पीएच्.डी. नंतर त्या शिकागो विद्यापीठात पदव्युत्तर संशोधनासाठी काही काळ राहिल्या आणि त्यांनी तिथेच सहाय्यक प्राध्यापक-संशोधकाची नोकरी स्वीकारली. १९८८ ते २००१ हा काळ शिकागो विद्यापीठात प्राध्यापक-संशोधक म्हणून काम केल्यानंतर २००१ मध्ये त्या केंब्रिजमधील व्हाइटहेड इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल रिसर्च येथे संशोधन करू लागल्या. सोबतच हॉवर्ड ह्यूज मेडिकल इन्स्टिट्यूट-एमआयटी इथेही त्या वैज्ञानिक अन्वेषक म्हणून काम करत होत्या.

हार्वर्डमधील वास्तव्यात त्यांनी उष्माघातजन्य प्रथिनांवर (Heat shock proteins- HSPs) काम केले. एखादी पेशी जेव्हा तिच्या नेहमीच्या वाढीच्या तापमानातून (जे मानवी पेशींसाठी ३७ अंश सेल्सियस असते) अधिक तापमानात नेली जाते (उदाहरणार्थ, ४२ अंश सेल्सियस), तेव्हा त्या उष्माघाताला प्रतिसाद म्हणून जी प्रथिने तयार होतात, त्यांना ‘उष्माघातजन्य प्रथिने’ असे नाव दिले गेले. ही प्रथिने पेशीतील इतर बऱ्याच प्रथिनांना योग्य त्रिमितीय रचनेत ‘घडवतात’ (‘फोल्ड’ करतात). तसेच, उष्माघातादरम्यान जी प्रथिने ‘बिघडतात’ (त्यांची त्रिमितीय रचना बिघडते), त्यांना गुठळ्या (aggregates) बनवण्यापासून रोखतात. तरीही ज्या प्रथिनांच्या गुठळ्या बनतात, त्या विरघळायला मदत करतात. ही आणि इतर अनेक महत्त्वाची कार्ये पार पाडणाऱ्या या उष्माघातजन्य प्रथिनांना रेण्वीय मदतनीस प्रथिने’ (molecular chaperone proteins) असेही म्हणतात.

लिङ्क्वीस्ट यांनी एचएसपी-९० या अनोख्या रेण्वीय मदतनीस प्रथिनावर संशोधन केले. या प्रथिनाचे ‘प्रथिन घडवणुकी’संबंधीचे (protein folding) कार्य आणि इतर अनेक पैलू मुख्यतः लिङ्क्वीस्ट यांनी जगासमोर आणले. त्यांच्या संशोधनातून असेही दिसून आले की एचएसपी-९० उत्क्रांतीसाठी बहुपयोगी ठरते. एचएसपी-९० प्राधान्याने पेशीच्या अंतर्गत संदेशवहन नियंत्रित करणाऱ्या प्रथिनांना घडवते. परिणामी, पेशी नव्या आणि कठीण परिस्थितींतही चटकन जुळवून घेऊ शकतात, असे लिङ्क्वीस्ट यांना दिसून आले. तसेच एचएसपी-९० जनुकांमधील अनिष्ट बदलांमुळे (mutations) होणाऱ्या प्रथिन घडवणुकीतल्या ‘चुका’ पाठीशी घालते. नंतर कधीतरी या ‘चुका’ पेशीला कठीण परिस्थितीत जगण्यासाठी चक्क मदत करू शकतात, हेही त्यांना दिसले.

आपल्या हयातीत त्यांनी प्रथिन घडवणुकीसंबंधी इतर बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर संशोधन केले. १९९० च्या दशकापासून त्यांनी ‘प्रिऑन’ या तुलनेने नव्या संकल्पनेवर काम सुरू केले. प्रिऑनमुळे होणाऱ्या रोगांखेरीज कर्करोग, मज्जासंस्थेचे इतर आजार जसे की अल्झायमर्स रोग, हंटिंगटन्स रोग यांच्यावरही त्यांचे काम उल्लेखनीय आहे. हे सगळे संशोधन त्यांनी मुख्यतः ‘सॅकरोमायसीज सेरेव्हिसाय’ (Saccharomyces cerevisiae, बेकर्स यीस्ट) मध्ये केले. किंबहुना, मानवी रोगांचे संशोधन साध्या एकपेशीय यीस्टच्या माध्यमातून यशस्वीपणे करून दाखवणाऱ्या त्या प्रथमच संशोधक होत्या.

लिङ्क्वीस्ट यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली. आपले मानवी रोगांवरील संशोधन समाजाला उपयोगी पडावे म्हणून त्यांनी अनेक जैव-वैद्यकीय कंपन्या स्थापन केल्या. यांमध्ये ‘फोल्ड आर एक्स फार्मास्यूटिकल्स’ (Fold Rx Pharmaceuticals) आणि ‘यूमॅनिटी थेरप्यूटिक्स’ (Yumanity Therapeutics) या अग्रणी होत. आपल्या संशोधनाबद्दल त्यांनी जगभरात शेकडो व्याख्याने दिली, ज्यांतील बरीचशी जनसामान्यांसाठी होती. शिवाय शालेय विद्यार्थ्यांमध्ये, विशेषकरून मुलींमध्ये विज्ञानप्रसारासाठी त्यांचे देशभर दौरे चालू असत. अधिकाधिक महिलांनी विज्ञान क्षेत्रात यावे म्हणून त्यांनी नेहमी प्रयत्न केले. म्हणून आज त्यांच्या स्मरणार्थ व्हाइटहेड इन्स्टिट्यूटने महिलांचा विज्ञान क्षेत्रातील सहभाग वाढवण्यासाठी एक खास निधी सुरू केला आहे.

आपल्या असामान्य कारकिर्दीत त्यांनी शेकडो शोधनिबंध, संशोधन-परीक्षणे लिहिली. प्रथिन घडवणूक या क्षेत्रातील एक अधिकारी व्यक्ती म्हणून पेशीविज्ञान जगतात त्यांची ख्याती आहे. त्यांना अनेक मान-सन्मानही मिळाले, जसे की ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस् अँड सायन्सेस’चे सभासदत्व, व्हाइटहेड इन्स्टिट्यूटच्या संचालकपदी निवड, अमेरिकेत अतिशय प्रतिष्ठित असलेले ‘राष्ट्रीय विज्ञान पदक’, ब्रिटनच्या प्रतिष्ठित ‘रॉयल सोसायटी’चे परराष्ट्रीय सभासदत्व वगैरे.

केंब्रिज येथे कर्करोगामुळे लिङ्क्वीस्ट यांचे निधन झाले. एक समर्थ महिला संशोधक म्हणून त्यांनी जगभरातील स्त्रियांना आपल्या आवडीचे कार्यक्षेत्र निवडण्याची प्रेरणा दिली.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा