प्रूसनर, स्टॅन्ले बेंजामिन : (२८ मे, १९४२) स्टॅन्ले बेंजामिन प्रूसनर हे अमेरिकन चेतातज्ज्ञ आणि जैवरसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेतील आयोवा राज्याच्या ड मॉईन (Des Moines) या प्रांतात झाला. ओहायो येथील वॉलनट हिल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर उच्चशिक्षणासाठी ते पेनसल्वेनिया विद्यापीठात दाखल झाले आणि रसायनशास्त्रातले पदवीधर झाले. नंतर पेनसल्वेनिया विद्यापीठाच्याच वैद्यक महाविद्यालयातून त्यांनी एम. डी. ही पदवी घेतली. पुढे सॅन फ्रॅन्सिस्को येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात एक वर्ष संशोधन-सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर ते अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेत (एन.आय.एच.) संशोधन करू लागले. एन.आय.एच.मधील वास्तव्याचा एक वैज्ञानिक म्हणून त्यांना पुढच्या आयुष्यात खूप फायदा झाला. त्यांची विज्ञान-संशोधनाविषयीची समज, एखाद्या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी करावे लागणारे विविध पद्धतीचे प्रयोग, नेमक्या शब्दांत शोधनिबंध लिहिण्याची हातोटी इत्यादी कौशल्ये त्यांनी तिथेच आत्मसात केली.
एन.आय.एच.मधील त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर १९७२ मध्ये ते यू.सी.एस.एफ. येथील चेतासंस्था विभागात निवासी संशोधक-वैद्य म्हणून रुजू झाले. काही महिन्यांतच त्यांनी एका रुग्ण महिलेला तपासले. ती ‘क्रूत्झफेल्ट-याकब डिसीज’ (सी.जे.डी.) नावाच्या विलक्षण आजारामुळे मृत्यूपंथाला लागली होती. हा आजार एका तथाकथित ‘संथ विषाणू’मुळे (slow virus) होत असल्याची धारणा त्यावेळेस होती. त्यावर शास्त्रज्ञांमध्ये एकमत नव्हते. या रहस्यमय संथ विषाणूची रेण्वीय पातळीवरील रचना शोधून काढावी, असे ठरवून प्रूसनर यांनी या रोगाविषयीचे मिळतील ते शोधनिबंध वाचायला सुरुवात केली. सुदैवाने १९७४ मध्ये त्यांना यू.सी.एस.एफ.च्या चेतासंस्था विभागातच सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी मिळाली. दरम्यानच्या काळात त्यांनी सी.जे.डी. सारख्या मेंढ्यांमधील ‘स्क्रेपी’ (Scrapie) आणि माणसांमधील ‘कुरू’ (Kuru) या रोगांविषयी पुष्कळ माहिती जमवली. सी.जे.डी., कुरू आणि स्क्रेपी अशा आजारांवर संशोधन करण्यासाठी त्यांनी प्रयोगशाळेची उभारणी सुरू केली.
स्क्रेपीसारख्या रोगांवर संशोधन करणे सोपे नव्हते. प्रयोगांसाठी प्रातिनिधिक सजीव म्हणून वापरल्या जाणाऱ्या उंदीर आणि हॅमस्टर या प्राण्यांमध्ये स्क्रेपीग्रस्त मेंदूची परीक्षा करणे अतिशय क्लिष्ट, वेळखाऊ आणि आर्थिकदृष्ट्या महाग होते. पण सहकारी शास्त्रज्ञांच्या अमूल्य मदतीमुळे आणि प्रसंगी खासगी संस्थांच्या अनुदानामुळे प्रूसनर आपले संशोधन चालू ठेवू शकले.
जसजसे संशोधन पुढे सरकत होते, तसतसा एक निष्कर्ष बळकट होत गेला. सी.जे.डी. सदृश रोगांसाठी जबाबदार घटक आजवर माहिती असलेल्या कुठल्याही रोगकारकापेक्षा पूर्ण वेगळा आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोगग्रस्त मेंदूंतून वेगळ्या केलेल्या अर्कात कुठल्याही प्रकारचे न्यूक्लिइक आम्ल मिळाले नाही. सर्व पारंपारिक रोगकारकांमध्ये (जिवाणू, विषाणू, परजीवी, बुरशी वगैरे) डीएनए किंवा आरएनए असे कुठले ना कुठले न्यूक्लिइक आम्ल असते. किंबहुना, एखादी वस्तू ‘सजीव’ असण्यासाठी तीत न्यूक्लिइक आम्ल असणे अनिवार्य आहे. ज्या अर्थी न्यूक्लिइक आम्ल मिळाले नाही, त्या अर्थी हे रोग संथ विषाणूमुळे झाले असावेत, हे गृहीतक चुकीचे ठरले. उलट, रोगग्रस्त मेंदूच्या अर्कात मोठ्या प्रमाणात प्रथिने सापडली. मुख्य म्हणजे हा प्रथिनमय पदार्थ रोगाच्या संक्रमणासाठी पुरेसा होता. शेवटी सगळेच पुरावे जेव्हा न्यूक्लिइक आम्लाच्या विरोधात आणि प्रथिनमय पदार्थांच्या बाजूने होते, तेव्हा हा प्रथिनमय पदार्थच नवा रोगकारक घटक असल्याचे प्रूसनर यांना मान्य करावे लागले. १९८२ मध्ये त्यांनी या अद्वितीय पदार्थासाठी ‘प्रोटीन’ (protein) आणि ‘इन्फेक्शन’ (infection) या दोन शब्दांपासून ‘प्रिऑन’ (prion) ही नवी संज्ञा तयार केली.
प्रूसनर यांच्या धक्कादायक निष्कर्षांमुळे त्यांना बऱ्याच टीकेला तोंड द्यावे लागले. मुख्य धारेतील काही नियतकालिकांनी त्यांच्यावर प्रसिद्धीलोलुपतेचाही आरोप केला. त्या टीकेकडे फारसे लक्ष न देता प्रूसनर यांनी आपले संशोधन चालू ठेवले. नव्वदच्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत त्यांनी ‘प्रिऑन’बद्दल बरेच नवे शोध लावले. प्रिऑन ज्या प्रथिनापासून तयार होतात ते PrP प्रथिन, त्याच्यासाठीचे जनुक, प्रिऑन का आणि कसे तयार होत असावेत, तसेच सी.जे.डी., कुरू आणि स्क्रेपी या रोगांच्या पाठीमागे PrP-जन्य प्रिऑनचाच हात आहे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आणल्या.
‘प्रिऑन’ या संकल्पनेच्या बाजूने इतक्या मोठ्या प्रमाणात पुरावा उपलब्ध झाल्यावर बहुतेक शास्त्रज्ञांनी प्रिऑनचे अस्तित्व मान्य केले. सी.जे.डी. सारख्या चेतासंस्थेच्या असाध्य रोगांवरील विस्तृत संशोधनाबद्दल आणि रोगप्रसाराच्या एका अभूतपूर्व तऱ्हेचा शोध लावल्याबद्दल प्रूसनर यांना १९९७ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
वैज्ञानिक जगताकडून दुर्लक्षिलेल्या चेतासंस्थेशी निगडीत आजारांवर अधिकाधिक संशोधन केले जावे म्हणून १९९९ मध्ये प्रूसनर यांनी ‘इंस्टिट्यूट ऑफ न्यूरोडीजनरेटिव्ह डिसीजेस’ या नावाची एक संस्था सुरू केली. या संस्थेच्या समाजोपयोगी संशोधनातून या रोगांवरील उपचार आणि इतर आरोग्य-उत्पादने बनवण्याच्या उद्देशाने त्यांनी २००१ मध्ये ‘इनप्रो बायोटेक्नॉलॉजी’ ही कंपनी स्थापन केली. आज सुमारे ६०० शोधनिबंध, सत्तरेक अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय पेटंट्स, शंभरेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मान हे प्रूसनर यांच्या अविरत संशोधनाचे फलित आहे.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1997/prusiner/biographical/
- https://en.wikipedia.org/wiki/Stanley_B._Prusiner
- https://ind.ucsf.edu/ind/aboutus/faculty/prusiners
- http://www.bu.edu/amyloid/events/prusiner-bio/
- https://www.theguardian.com/science/2014/may/25/stanley-prusiner-neurologist-nobel-doesnt-wipe-scepticism-away
समीक्षक : मोहन मद्वाण्णा