अध्यापनाचे तंत्र म्हणजे अध्यापन विषयक घेतलेला पवित्रा. अध्यापन कार्यात विविध पद्धतींबरोबरच तंत्रेही वापरली जातात. यामध्ये प्रश्नोत्तर, नाट्यीकरण, बुद्धिमंथन, चर्चा, सांघिक अभ्यास यांसारख्या अनेक अध्यापन तंत्रांचा समावेश असतो. पाठ प्रभावी व मनोरंजक करण्याचे ते तंत्र आहे. प्रश्नांचा उपयोग शिक्षक व विद्यार्थी दोघेही करतात. प्राचीन काळापासून अध्ययन-अध्यापनात प्रश्नांचा उपयोग होत आला आहे. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करणे, त्यांच्यात अभिरुची निर्माण करणे, विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करणे, विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार दृष्टिकोण, माहिती सांगण्यास प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांच्या आकलनन क्षमता माहित करून घेणे इत्यादी हेतूने ही तंत्रे अध्यापनात वापरली जातात.

बुद्धिमंथन तंत्र : बुद्धिमंथन हे लहान गटातील चर्चेचा एक प्रकार आहे. एखाद्या समस्येची उकल करण्यासाठी जी सृजनात्मक समूह क्रिया केली जाते, तिला बुद्धिमंथन असे म्हणतात. औसबर्न यांनी १९७५ मध्ये सर्वप्रथम या तंत्राचा अवलंब सुचविला. बुद्धिमंथन तंत्रात विशिष्ट गट काम करीत असताना या गटात जेवढ्या अधिकाधिक आंतरक्रिया होतील, तेवढे हे तंत्र यशस्वी होते. या तंत्राचा वापर केल्याने विद्यार्थ्यांना सामूहिक विचार करता येतो. आवश्यक माहिती मिळवून विश्लेषण करता येते. इतरांचे विचार समजून घेण्याची शक्ती प्राप्त होते. इतरांच्या विचारांत सुधारणा करण्याची संधी मिळते. म्हणजेच अगदी कमी कालवधीत एखाद्या समूहाकडून खूप मोठ्या संख्येने कल्पना प्राप्त करण्याचे साधन म्हणजे बुद्धिमंथन होय.

सांघिक अभ्यास तंत्र : एखादा विषय एखाद्या शिक्षकाने पूर्णपणे शिकविण्याऐवजी विषय घटकांची विभागणी करून एकाहून अधिक अध्यापकाच्या गटाने तो शिकविणे म्हणजे सांघिक अभ्यास तंत्र होय. जे. लाईड ट्रम्प यांनी या तंत्राची सुरुवात केली. सांघिक अध्यापन तंत्राचा अनेक देशांत प्रसार झाला आणि त्यात स्थानिक परिस्थितीनुसार फेरफारही करण्यात आले. या तंत्रातील मुलभूत तंत्रे महत्त्वाची असल्याने शाळा, महाविद्यालयांतून सांघिक अध्यापनासाठी हे तंत्र राबविले जाते.

स्वयंअध्ययन तंत्र : आंतरराष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष एडगर फॉर यांनी १९७२ मध्ये युनेस्कोला ‘अस्तित्वासाठी शिक्षण’ हा अहवाल सादर केला. या अहवालात त्यांनी स्वयंअध्ययनावर विशेष भर दिला. ज्ञानाच्या कक्षा झपाट्याने रुंदावत असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतः शिकले पाहिजे, यास महत्त्व प्राप्त झाले. म्हणजेच निव्वळ माहिती देण्यापेक्षा ज्ञानप्राप्तीची कौशल्ये विद्यार्थ्यांत विकसित करणे महत्त्वाचे आहे. स्वयंअध्ययनाचे विविध मार्ग म्हणजे बहुमाध्यम संच, अभिक्रमित अध्ययन, घटकनिहाय अध्ययन, संगणक सहायक अनुदेशन इत्यादींच्या माध्यमाने विद्यार्थ्यांचे श्रवण, वाचन, मनन, लेखन, उपयोजन कौशल्य विकसित होतात.

चर्चा तंत्र : शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना चर्चा करण्याची संधी द्यावी. चर्चेत एखाद्या विषयासंबंधी किंवा समस्येसंबंधी विद्यार्थी स्वतःचा दृष्टिकोण थोडक्यात मांडत असतो. ते एकमेकांच्या दृष्टिकोणास आव्हान देऊ शकतात किंवा त्याचा पुरस्कार करू शकतात. चर्चा तंत्र कार्यान्वित करताना चर्चेचे प्रकार, आशय आणि विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन करावे लागते. यामध्ये गटचर्चा, अनौपचारिक चर्चा, वादविवाद, परिसंवाद अशा प्रकारांपैकी योग्य त्या प्रकाराची निवड करून चर्चा तंत्राचा उपयोग प्रभावीपणे करता येतो.

नाट्यीकरण तंत्र : नाट्यीकरण म्हणजे नाट्यातून शिक्षण देण्याचा प्रयत्न. अध्यापनात नाट्यीकरण तंत्राचा उपयोग करून अध्यापन प्रभावी, रोचक करता येते. हे केवळ शिक्षकानेच अवलंबण्याचे तंत्र नव्हे, तर या तंत्रामध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेता येते. त्यांच्याकडून काव्यवाचन, नाट्यवाचन, कथाकथन करून घेता येते. नाट्यीकरण या तंत्राचा भाषा व इतिहास या विषयांत विशेष उपयोग होतो. या तंत्रातून विद्यार्थ्यांच्या आत्मविष्काराला संधी मिळून भाषण-संभाषण, आंतरक्रियात्मक व अभिव्यक्तीस पूरक क्षमता विकसित होतात.

पर्यवेक्षित अभ्यास तंत्र : विहित तासिकेत विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकाने स्वतः हजर राहून त्यांना व्यक्तिगत मदत व मार्गदर्शन करून अभ्यास कसा करावा, हे शिकविण्याचे तंत्र म्हणजेच पर्यवेक्षित अभ्यास तंत्र होय. या अध्ययन तंत्राद्वारे विद्यार्थ्याला अध्ययन प्रक्रियेत, उत्तेजन, मार्गदर्शन आणि मदत करून त्यास स्वावलंबी व कार्यक्षम बनविले जाते. पर्यवेक्षित अभ्यासात विद्यार्थी शाळेतच राहून शिक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या पाठ्यांशाचा अभ्यास करतात. विद्यार्थ्यांच्या शंका वैयक्तिक पातळीवर दूर करण्याचा प्रयत्न शिक्षक करतात.

क्रमन्वित अध्ययन तंत्र : एका विशिष्ट दिशेने, विशिष्ट क्रमाने सुनियंत्रित स्वरूपात यशदायी प्रतिसाद घेत जाण्याच्या पद्धतील क्रमन्वित अध्ययन म्हणतात. या अध्ययन तंत्रामुळे शिक्षकाला विशिष्ट उद्दिष्टे साधण्यासाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या गतीने अभ्यास करण्यासाठी पडताळा घेता येतो. उत्तर बरोबर आल्यास प्रोत्साहन देऊन प्रेरणा मिळते. क्रमन्वित अध्ययन तंत्राचे एकमार्गी, बहुमार्गी आणि प्रतिगामी (मॅथेटिक) कार्यक्रम ही तीन उपप्रकार आहेत. यांमध्ये आशयाचे विश्लेषण करून त्याचे लहान लहान उपघटकांत विभाजन केले जातात आणि त्याचे रूपांतर क्रमबद्ध मांडणीत केली जाते. प्रत्येक पायरीवर विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग आणि त्यावर प्रत्याभरण देऊन योग्य ते प्रबलन देत पुढील पायरीकडे जायचे असते.

सहकार्यात्मक अध्ययन तंत्र : सहकार्यात्मक अध्ययन तंत्रात हेतुपुरस्सर भिन्न जिन्सी अध्ययनात खूप गती असलेले, मध्यम गती असलेले आणि कमी गती असलेले विद्यार्थ्यांचे गट करून विद्यार्थ्यांना आंतरक्रियांची संधी दिली जाते. यातून त्यांचे स्वतःचे तसेच गटातील इतरांचे अध्ययन साध्य होते. यामध्ये समूह अन्वेषण, विद्यार्थी संघ-संपादन अशा प्रकारची सहकार्यात्मक अध्ययन तंत्रे विषयानुसार तसेच कोणत्याही इयत्तेसाठी अवलंबिली जातात. अशा वेगवेगळ्या आणि प्रभावी तंत्राचा उपयोग अध्यापनात प्रभावीपणे करता येते.

संदर्भ :

  • सप्रे, एन.; पाटील, पी., शिक्षणातील विचारप्रवाह, कोल्हापूर, २००५.

समीक्षक : अनंत जोशी