मद्रास क्रोकोडाईल बँक ट्रस्ट अॅन्ड सेंटर फॉर हर्पेटोलॉजी : (स्थापना – १९७३) ‘Herpeton’ या ग्रीक शब्दावरून हर्पेटोलॉजी हा शब्द तयार झाला आहे. या शब्दाचा अर्थ उभयसरिसृप म्हणजे सरपटणारे प्राणी असा होतो. चेन्नई (मद्रास) पासून चाळीस किलोमीटर अंतरावर तामिळनाडू राज्यात मद्रास क्रोकोडाईल बँक ट्रस्ट या न्यासाची स्थापना झाली. याचा अधिकृत प्रारंभ २६ ऑगस्ट १९७६ या दिवशी प्रसिद्ध सरीसृपतज्ञ रोम्युलस व्हिटेकर व जाई व्हिटेकर यांचे संस्थेमध्ये आगमन झाल्यानंतर झाला. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणने या संस्थेस प्राणिसंग्रहालय म्हणून मान्यता दिली आहे. संस्थेचा उद्देश भारतातील गोड्या पाण्यातील मगर, खाडी पाण्यातील मगर आणि गंगा, ब्रम्हपुत्रा, चंबळ, कोशी, व गोदावरी नद्यातील घडियाल मगर यांचे संवर्धन करणे हा होता. एकोणिसाव्या शतकात कातड्यासाठी मगरींची मोठ्या संख्येने शिकार करण्यात आल्याने १९७० पर्यंत तीनही नद्यांतील मगरींची संख्या धोक्याच्या पातळीखाली आली होती.
मगर बँक सागरी किनाऱ्याच्या विस्तृत प्रदेशावर तयार केलेली आहे. या ठिकाणी पूर्वीपासून नैसर्गिक पाणपक्ष्यांचे प्रजनन आणि सागरी ऑलिव्ह रीडले कासव यांच्या अंडी घालण्याच्या जागा होत्या. वालुकामय किनाऱ्याला पुरेसा गोड्या पाण्याचा स्त्रोत होता. महाबलिपुरम पर्यटन केंद्रामुळे दरवर्षी भरपूर पर्यटक केंद्रास भेट द्यायला येतील असा विचार करून ३.४ हेक्टर जागा केंद्रासाठी संरक्षित केली गेली. या केंद्रामध्ये जगातील सर्वांत मोठे मगर व अॅलिगेटर केंद्र आहे. जगातील २३ पैकी १४ मगरी (यामध्ये भारतातील तीन प्रजाती) सांभाळून ठेवलेल्या आहेत. २०११ च्या आकडेवारीनुसार येथे एकूण २४८३ प्राणी असून यामध्ये १४ मगर प्रजाती, १० सागरी कासवे आणि तीन साप प्रजाती व एका सरड्याचा समावेश आहे.
मगरींच्या संवर्धंनामध्ये एक महत्त्वाचा टप्पा १९७५ साली केंद्र शासन व संयुक्त राष्ट्र संघाचा विकास कार्यक्रम (युनायटेड स्टेटस डेव्हलपमेंट प्रोग्राम) आणि अन्न व कृषी व्यवस्थापन (फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन) बरोबर झालेल्या सहयोगामुळे घडून आला. न्यासातर्फे संकटग्रस्त झालेल्या मगरींची संख्या वाढ आणि साप पकडणे असा संयुक्त प्रकल्प सुरू झाला. व्हिटेकर आणि त्यांचे समविचारी राजमणी यांनी एकत्र येऊन मगर, घरियाल आणि खाडी पाण्यातील मगर (Crocodylus palustris, Gavialis gangeticus, Crocodylus porosus) या तीनही मगरींच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू करण्याचे ठरवले.
क्रोकोडाईल बँकेमार्फत १९८१ साली बंदिस्त ठिकाणी गोड्या पाण्यातील कासवांचे प्रजनन केंद्र सुरू केले. जगात सर्व प्रथम घरियाल मगरींचे प्रजनन घडून यायला १९८९ साल उजाडले.
युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ डाकोटा येथील जे. डब्ल्यू. लॅन्ग यांनी मगरीच्या प्रजनन विज्ञानावर प्रकल्प सादर केल्यावर या प्रकल्पासाठी अद्ययावत प्रयोगशाळा सेंटर फॉर सेल्ल्युअर अॅन्ड मॉलेक्युलर बायॉलॉजी (सी.सी.एम.बी., हैद्राबाद) यांच्या सहकार्याने उभी राहिली. लॅन्ग यांच्या मार्गदर्शनाखाली हॅरी अॅन्ड्र्यूज यांनी १९८४ पासून १९९४ पर्यंत या केंद्राचे काम पाहिले. लॅन्ग या प्रकल्पास दर वर्षी भेट देत असत. मगर प्रजनन, मगरीची अंडी उबवणे आणि नियंत्रित तापमानास मगरीच्या पिलांची लिंग निश्चिती याच्या संशोधनावर त्यांनी भर दिला. तीन वर्षांच्या अभ्यासानंतर संरक्षित केंद्राबाहेर तामिळनाडू राज्यातील भवानीसागर येथील मोयार नदीच्या काठावर एका स्थानिक केंद्रात मगरींचे यशस्वी प्रजनन केले आहे.
१९८७ पासून भारतातील घोरपडीच्या (Indian monitor lizard) प्रजननाचे प्रयत्न इंग्लंड व जर्मन संशोधकाच्या सहकार्याने चालू होते. याच्या जोडीला १९८९ ते १९९१ मध्ये राना हेक्झाडॅक्टिला (Rana hexadactyla) या उभयचर बेडकाचा समावेश करण्यात आला. या बेडकाची माहिती बीबीसी वाइल्ड लाईफ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाली होती. एमसीबीटी न्यासाची प्रगती अव्याहत चालू होती. १९९० साली चालू केलेल्या संस्थेच्या विज्ञान नियतकालिकाने शोधनिबंध प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. पाणथळ जागांचे सर्वेक्षण व दूरस्थ संवेदन पद्धतीने वन्यजीव शोधणे सुरू झाले. या पाठोपाठ समुद्र सर्प, सागरी कासवे, वटवाघळे आणि लहान सस्तन प्राण्यांचा अभ्यास सुरू केला.
केवळ तीस प्रौढ मगरींपासून चालू झालेल्या या केंद्रामध्ये १९९० साली आठ हजार मगरी संरक्षित क्षेत्रात होत्या. या केंद्रामधून प्रजजन केलेल्या मगरी पुन्हा वन्य ठिकाणी सोडण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. सध्या योग्य परिसर उपलब्ध होत नसल्याने मगरींचे पुनर्वसन कार्यक्रम थांबला आहे. १९८९ साली एक उपकेंद्र दक्षिण अंदमान मधील वानडूर बेटावरील दोन हेक्टर जागेवर चालू केले गेले. याचा उद्देश अंदमानमधील प्राणी व वनस्पतींचा अभ्यास आहे. २००३ मध्ये मद्रास येथील न्यासामध्ये सागरी कासव, सरडे आणि साप यांची भर पडल्यापासून हे जगातील सर्वात मोठे उभयचर प्राणी संग्रहालय बनले आहे.
सन २००५ मध्ये रोम्युलस व्हिटेकर यांना अगुंबे वर्षावन संशोधन केंद्रातील केलेल्या कामाबद्दल व्हिटले पारितोषिक देण्यात आले. पश्चिम घाटातील जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठीचे हे एकमेव केंद्र आहे. २००६ साली त्यांना सॅंक्चुअरी एबीएन अॅम्रो जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. व्हिटेकर यांना २०१८ साली केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
भारतातील सापाचे विष गोळा करणारे हे एकमेव केंद्र आहे. पिढ्यान् पिढ्या साप पकडून त्यावर उपजीविका करणाऱ्या इरूला जातीच्या लोकांनी सहकारी तत्त्वावर चालवलेल्या संस्थेची नोंदणी १९ डिसेंबर १९७८ ला केली. प्रत्यक्ष सापाचे विष गोळा करणे मात्र १६ डिसेंबर १९८२ पासून चालू झाले. सुरुवातीला २६ सभासदांची असलेली संख्या २००१ सालापर्यंत ३५० हून अधिक झाली आहे. या केंद्रातून दरवर्षी १५,००० डॉलर किमतीच्या सर्प विषाची विक्री करण्यात येते.
इतर प्राणिसंग्रहालयांच्या सहकार्याने येथे आता डेन्मार्क शासनाकडून ग्रीन अॅनाकोंडा, म्हणजे दलदलीतील मगर, न्यूयॉर्क येथील ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयाकडून देणगी दाखल मिळालेले कोमोडो ड्रॅगन यांची भर पडली आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये या संग्रहालयाचा दहा कोटी रुपये खर्चून अद्ययावतीकरण करण्याचा आराखडा मान्य करण्यात आला आहे. तीन पातळ्यांवर म्हणजे जमिनीवर, पाण्यात व पाण्याखाली सरपटणारे प्राणी पर्यटकांना पाहता यावेत व त्यांच्या संशोधनाचे कार्य चालू रहावे याची योजना सध्या कार्यान्वित आहे.
संदर्भ :
- The Madras Crocodile Bank Trust & Centre for Herpetology
- madrascrocodilebank.org
समीक्षक : किशोर कुलकर्णी