(लिंक). संगणकशास्त्रातील हायपरलिंक (Hyperlink) या इंग्रजी शब्दाचे लिंक हे संक्षिप्त रूप. याचा वापर दोन किंवा अधिक माहितीशी/डेटाशी संबंध दर्शविण्याकरिता करण्यात येतो. दुवा ही दिलेल्या माहितीला संदर्भांकित करते. अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण त्यावर टिचकी अथवा हलकीशी थाप मारून माहितीचा पाठलाग करू शकतो.

‘लिंक’ हा शब्द संगणकीय परिभाषेत टेड नेल्सन यांनी  1965 (किंवा शक्यतो 1964) झानाडू प्रकल्पाच्या (Project Xanadu) प्रारंभी तयार केला.

दुवा ही एचटीएमएल (HTML; Hypertext Markup Language) अशी संगणकीय वस्तू (ऑब्जेक्ट; Object) आहे. ती संपूर्ण दस्तऐवज किंवा दस्तऐवजातील विशिष्ट घटकाकडे निर्देशित करते. हायपरलिंकसह असणारा मजकूर हा हायपरटेक्स्ट असतो. ज्या मजकुराला अधिक माहिती जोडायची असते, त्याला गळ मजकूर (अँकर टेक्स्ट; Anchor text) असे म्हणतात. तसेच ज्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये हायपरटेक्स्ट तयार करण्यात येतो किंवा पाहण्यात येतो त्याला हायपरटेक्स्ट प्रणाली (Hypertext system) म्हणतात. संगणकावरील हायपरटेक्स्टचा शोध घेता किंवा निर्देशित करता येतो. हायपरलिंकसह असणारा दस्तऐवज हा प्राथमिक अथवा मूळ दस्त असतो. हायपरलिंकचा वापर हा सहसा अधिक संदर्भ या अर्थाने वापरता येतो. उदा., तक्ता, तळटीपा, ग्रंथसूची, अणुक्रमणिका, शब्दावली यांकरिता त्याचा वापर होतो. ग्राफिकल यूजर इंटरफेसमध्ये (वापरकर्ताभिमुख आलेखिकी) माउस हा कर्सरचे स्वरूप घेऊन दुवा दर्शविण्यासाठी हाताच्या आकृतिबंधात बदलू शकते.

महाजालकावरील बहुतेक प्रत्येक पृष्ठावर दुवा असते. त्यामुळे महाजालकावरील विविध पृष्ठांचे निर्देशन करणे सुलभ होते. दुवा ही माहिती, फोटो (चित्र) किंवा इतर एचटीएमएल घटकांसोबत जोडता येते. महाजालकावर दुवा प्रदर्शित करण्याकरिता निळा रंग मानक म्हणून मजकुराला वापरण्यात येतो. परंतु जर त्या दुव्याला आपण भेट दिली असल्यास त्यांचा रंग जांभळा अधोरेखित होतो. तथापि,  एचटीएमएल किंवा सीएसएस (CSS) मजकुराची शैली वापरून दुवे कोणत्याही रंगानी सानुकूलित केली जाऊ शकते.

जेव्हा आपण एखाद्या प्रतिमेला (फोटोला) दुवा म्हणून वापरतो, तेव्हा ती त्या संपूर्ण प्रतिमेला वेष्टणासारखी (टॅग; Tag; पृष्ठ प्रदर्शित झाल्यावर प्रथमदर्शनी दिसणारी माहिती) प्रदर्शित होते. प्रतिमा वेष्टण (Image tag) ही दुवा वेष्टणात समाविष्ट असल्याने संपूर्ण प्रतिमा दुवा बनते. जेव्हा वापरकर्ता एखादी दुवा सक्रिय करतो, तेव्हा ब्राउझर दुव्याचे लक्ष्य दर्शवितो.

दुवे हे प्रामुख्याने तीन प्रकारांचे असतात : एकओळीय दुवा (इनलाइन लिंक्स; Inline Link), गळ दुवा (Anchor link) आणि भरीव दुवा (Fat Link)

एकओळीय दुवा : यामध्ये मजकुरातील ओळीत आवश्यक असा दूरस्थ मजकूर समाविष्ट न करता त्याच ओळीत प्रदर्शित करण्यात येतो. दूरस्थ मजकुराला वापरकर्ता ओळीतील दुव्यासह किंवा दुव्याशिवाय वापरू शकतो. एकओळीय दुव्यामध्ये दूरस्थ मजकूर सुधारित आवृत्तीच्या स्वरूपात प्रदर्शित करण्यात येते. उदा., एखाद्या माहितीची प्रतिमा प्रदर्शित करण्याऐवजी त्या माहितीची छोटी प्रतिमा, कमी क्षमता असलेली प्रतिमा, लहान केलेला एखादा भाग किंवा विस्तारित स्वरूपाचा भाग दाखविण्यात येतो. ज्यावेळेस दूरस्थ मजकुराची आवश्यकता अथवा मागणी असल्यास तेव्हाच उपलब्ध होतो.

गळ दुवा : ही दुवा दस्तऐवजातील एखाद्या अक्षराला, वाक्याला, शीर्षकाला अथवा प्रतिमेच्या विशिष्ट भागाला (Hot area) तयार करण्यात येते. त्या अक्षराला किंवा वाक्याला तुकडा (फ्रॅग्मेन्ट; Fragment) असे म्हणतात. दस्तऐवजातील तुकड्याला गळाने चिन्हांकित करण्यात येते, त्यामुळे त्याला गळ दुवा असे म्हणतात. ही दुवा संगणकीय वापरता वेगवेगळ्या पद्धतीने दर्शविता येते. उदा., एक्सएमएल भाषेत <anchor id=‟name”/>, विकी मार्कअपमधे {{anchor name}} या पद्धतीने लिहून गळ दुवा तयार करण्यात येते.  तसेच वर्ड प्रोसेसर ॲपमध्ये मजकुरातील इच्छित ठिकाणी गळ दुवा तयार करता येते, त्याला बुकमार्क (Bookmark) असे म्हणतात, तर महाजालकावरील पत्त्यासाठी युआरएल (URL; Uniform Resourse Locator; एकसमान स्रोत निर्धारी) द्वारे मजकुरातील तुकड्याकरिता गळ अक्षरापुढे हॅश (#) या चिन्हाचा वापर करण्यात येतो. प्रतिमेतील सीमांना दर्शविणाऱ्या सहनिर्देशकांच्या यादीद्वारे प्रतिमेतील मुख्य भाग तयार करता येऊ शकतो. गळ दुव्याद्वारे मजकूर दुवा (Text link), प्रतिमा दुवा (Image link), बुकमार्क दुवा (Bookmark link) आणि ई-मेल (e-mail link) तयार करता येते.

भरीव दुवा : याला एकास-अनेक अथवा वर्धित दुवा असेही म्हणतात. भरीव दुवा ही ही अनेक अंतबिंदूकडे जाते. या दुव्याचे बहुमूल्य असे कार्य आहे.

माहिती तंत्रज्ञान व संगणकविज्ञान या क्षेत्रात दुवा ही संज्ञा खालील कोणत्याही बाबीसाठी वापरण्यात येते.

1. संदेशनाच्या बाबतीत दुवा ही दोन उपकरणांमधील जोडणी दर्शविते 2. माहिती व्यवस्थापनात किंवा फाइल प्रणालीमध्ये दुवा ही संज्ञा सामाईक करण्यात आलेल्या माहितीच्या सामाईकतेबाबत आणि पाहण्याच्या क्षमतेबाबत वापरण्यात येते. 3. आंतरजालावर दुवा ही एक जालक-पृष्ठ दुसऱ्या जालक-पृष्ठाशी जोडण्याच्या संदर्भात वापरण्या येते. 4. स्प्रेडशीट आज्ञावलीमधे, एखादा सेल इतर वर्कशीटमधील माहितीशी तयार केलेली दुवा असते. 5. एचटीएमएल मध्ये <a> या प्रकारांनी तयार करण्यात आलेले वेष्टण संकेतस्थळावरील विविध वस्तूंना आणि जालक-पृष्ठांना जोडण्याकरिता तयार करण्यात येतो. तसेच एचटीएमएलमधील <link> या प्रकारचे वेष्ठण जालक-पृष्ठ आणि बाह्यस्रोताबरोबर जोडण्याकरिता वापरण्यात येतो.

कळीचे शब्द : #ग्राफिकल #हायपरलिंक

संदर्भ :

समीक्षक : अक्षय व्यंकटराव क्षीरसागर