हिंसा ही एक कृती आहे. बहुतांश वेळा ती ताकतवर पक्षाकडून बळाचा वापर करून दुबळ्या पक्षावर त्याची सत्ता, नियंत्रण, असमानता टिकवून ठेवण्यासाठी केली जाते. हिंसेचा विचार करताना शारीरिक इजा, मालमत्तेचे नुकसान इत्यादी गोष्टींकडे पाहिले जाते. मुख्यतः हिंसेचा विचार करताना खून, बलात्कार, दरोडा, अत्याचार, कौटुंबिक हिंसा इत्यादींशी संबंधित केला जातो. यातून हिंसेची संकुचित व्याख्या पुढे येते आणि हिंसेची संकुचित व्याख्या केल्याने अनेक आवाज, अनुभव अथवा हिंसेचे प्रकार वगळले जातात. बहुतांश वेळा हिंसेचे दृश्य प्रकार चटकन लक्षात येतात; मात्र अदृश्य अथवा सूक्ष्म प्रकार लक्षात येत नाहीत. त्यामुळे विविध लोकांचे अनुभव, त्यातील गुंतागुंत समजणे सोपे होण्यासाठी हिंसेची व्यापक व्याख्या करणे आवश्यक आहे.
हिंसेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे बरेच प्रकार आहेत. उदा., संरचनात्मक हिंसा, सामाजिक हिंसा, सांस्कृतिक हिंसा, प्रतिकात्मक हिंसा, आर्थिक हिंसा, राजकीय हिंसा इत्यादी. या प्रकारांतून उद्भवणारी हिंसा ही संथगतीने काम करते आणि त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहणारा असतो; कारण हे हिंसेचे प्रकार सामाजिक असमानता यातून व्यक्त होत असतात. यातच प्रतिकात्मक हिंसा या प्रकाराचा समावेश होतो. फ्रेंच विचारवंत पिअर बोर्द्यू यांनी प्रतिकात्मक हिंसा ही संकल्पना लोकप्रिय केली. त्यांच्या मते, प्रतिकात्मक हिंसा ही सर्व प्रकारच्या हिंसेचे मूळ आहे; कारण या हिंसेमुळे शारीरिक व मानसिक हिंसा आकाराला येते. प्रतिकात्मक हिंसेच्या मागे सत्तासंबंध दडलेले असतात. आपण जे काही करत आहोत ते बरोबर आहे, हे लादण्यासाठी वर्चस्ववादी प्रतिकांचे चर्चाविश्व उभे केले जाते.
प्रतिकात्मक हिंसा ही दुय्यमत्व टिकवून ठेवणारी रचना आहे. अनेकदा हे दुय्यमत्व लोकांना दुय्यमत्व वाटत नाही, तर ती एक सर्वसामान्य बाब वाटते. प्रतिकात्मक हिंसा ही दैनंदिन सामाजिक व्यवहार आणि संस्थात्मक प्रक्रियामार्फत पुनरुत्पादित केली जाते. थापर, सॅमेलिएस आणि संघेरा या अभ्यासकांच्या मते, प्रतिकात्मक हिंसा अभेद्य आणि अदृश्य असून समाजामध्ये सूक्ष्म स्वरूपात काम करते. ती हिंसाचाराच्या इतर प्रकारांना अधिमान्यता देते आणि टिकवून ठेवते. त्यामुळे प्रतिकात्मक हिंसा समजून घेताना हिंसेचे पारंपरिक चर्चाविश्व समजून घेणे आवश्यक आहे; कारण हे चर्चाविश्व हिंसा कशी काम करते व हिंसेचे संकल्पिकरण करण्यासाठी नवीन मार्ग व महत्त्वाची आंतर्दृष्टी त्याच प्रमाणे हस्तक्षेपाचे नवीन डावपेच उपलब्ध करून देते.
बोर्द्यू यांनी १९७० च्या दशकामध्ये ही संकल्पना आपल्या लिखाणामध्ये वापरली. शारीरिक बळाचा कमीत कमी वापर करून प्रतिकात्मक वर्चस्वाचे प्रकार वापरून कशाप्रकारे सामाजिक उतरंडी आणि असमानता टिकविली जाते, हे बोर्द्यू यांनी या संकल्पनेच्या माध्यमातून दाखवून दिले. वर्चस्ववादी प्रतिकांची संरचना आणि अर्थ लोकांवर अशाप्रकारे लादले जातात की, लोकांना ती वैध अथवा नैसर्गिक बाब वाटते. याबाबत भारतामध्ये स्त्रियांवर प्रतिकात्मक हिंसा ही सामाजिक नियम, मूल्ये जसे की, सौभाग्यवती हे सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतिक मानणे व विधवा स्त्रियांनी सामाजिक, धार्मिक (हळदी कुंकू, पूजेला बसणे, प्रसाद बनविणे इत्यादी) इत्यादी कार्यात सहभागी होऊ न देणे यांसारख्या सांस्कृतिक पद्धतीमधून चिरस्थायी केली जाते. बरेचदा या प्रकाराला दैनंदिन व्यवहार म्हणून मान्यता व स्वीकृतीही मिळते. यामागे वर्चस्ववादी विचारसरणी म्हणजेच पितृसत्ता काम करत असून असमान सत्तासंबंध व संसाधनांचे असमान वाटप यांना अधिमान्यता देतात. परिणामी ज्यांच्या हातामध्ये अमर्याद सत्ता असते, ते प्रतिके नियंत्रित करतात आणि ती प्रतिके नैसर्गिक, अधिकृत म्हणून इतरांवर लादतात. क्रेईस यांच्या मते, प्रतिकात्मक हिंसा कुटुंबामध्ये व कुटुंबाच्या बाहेर लिंगभाव असमानता टिकवून ठेवून वर्चस्ववादी लिंगभाव नातेसंबंध अबाधित ठेवते. प्रतिकात्मक हिंसा ही एक वर्चस्वाची सूक्ष्म व अदृश्य पद्धत असून तिला सामाजिक मान्यता आहे.
ऋतुपर्णा भट्टाचार्य यांनी २०१८ मध्ये आसाममधील मध्यम वर्गीय स्त्रियांमध्ये असमान लिंगभाव संबंध कशाप्रकारे पुनरुत्पादित आणि चिरस्थायी केले जातात याविषयी मांडणी केली आहे. त्यांच्या मते, प्रतिकात्मक हिंसा ही वर्चस्व या संकल्पनेवर आधारित आहे. आसाम येथील मध्यम वर्गीय समाजात आदर्श सून, पत्नी, माता या चौकटी बहुतांश वेळी स्त्रिया स्वतःहून आत्मसात करतात. यातून त्यांना दुय्यमत्वाला सामोरे जावे लागते; मात्र त्यांना ते दुय्यमत्व वाटत नाही, तर स्त्रीची जबाबदारी अथवा स्त्रीचे हेच काम आहे असे वाटते आणि यातून असमान लिंगभाव संबंध चिरस्थायी होतात. स्त्रिया नेहमीच दुय्यम भूमिका स्वीकारतात असे नाही, तर बहुतांश वेळा त्या सामाजिक स्वीकृती मिळविण्यासाठी या भूमिका निवडतात. जर त्या भूमिका नाकारल्या, तर समाजात त्यांना टोचून बोलणे, बहिष्कृत, अपमानित करणे अशा घटनांना सामोरे जावे लागते. अशाप्रकारे प्रतिकात्मक हिंसा सूक्ष्म रीत्या समाजामध्ये काम करत राहते.
प्रतिकात्मक हिंसा ही अनियंत्रित वर्चस्वाबाबतचे अज्ञान, कायदेशीर अथवा नैसर्गिक बाब मानून मान्यता देणे आणि दैनंदिन जीवनात समावेश करणे या तीन घटकांच्या माध्यमातून समाजामध्ये काम करते. प्रतिकात्मक हिंसा ही सामान्यत: बळाचा अथवा दमनाचा वापर करून घडवून आणली जात नाही. प्रतिकात्मक हिंसा ही व्यक्तीच्या अवचेतनेच्या (सबकॉन्शिअस) पातळीवर काम करते. स्लवोज झिजेक यांच्या मते, प्रतिकात्मक हिंसेमध्ये भाषा महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. आपण दैनंदिन जीवनात एकमेकांशी कसे बोलतो त्यातून नकळत वर्चस्ववादी संबंध प्रस्थापित होतात. प्रमाण भाषेचा आग्रह आणि तिच्या सामान्यीकरणाद्वारे विशिष्ट जाती, वर्ग आपले वर्चस्व निर्माण करून प्रतिकात्मक हिंसेला वाव देतात. ज्ञानग्रहण, संस्कृत भाषा ही उच्च जातीनेच आत्मसात करावी, असादेखील समाजामध्ये आग्रह काही प्रमाणात दिसून येतो; मात्र आता काही कनिष्ठ वर्गातील सुशिक्षित महिलांनी प्रतिकात्मक हिंसेला आव्हान देऊन संस्कृत या विषयामध्ये उच्च शिक्षण घेऊन संस्कृतच्या शिक्षिका झाल्या. यातून प्रतिकात्मक हिंसेला आव्हानदेखील निर्माण करता येते हे दिसून येते.
सामाजिक माध्यमे आणि प्रतिकात्मक हिंसा : प्रतिकात्मक हिंसा ही पितृसत्ता आणि स्त्रीद्वेषी विचारसरणीतून रचली किंवा घडविली जाते. ज्या महिला हिंसेला बळी पडल्या आहेत, त्यांच्या विषयी वृत्तवाहिन्या बातमी देताना प्रतिकात्मक हिंसा पुनरुत्पादित करतात. बातमीदार बातमी देताना ज्या स्त्रिया लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या आहेत, त्यांनाच दोष देतात. उदा., देदुहा अल्फीसहरिन या तरुणीचा २०१५ रोजी झालेली हत्या. पितृसत्ता आणि स्त्रीद्वेषी विचारसरणी या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये वर्चस्ववादी विचारसरणी आहे. अनेकदा वृत्तवाहिन्या, त्यांचे बातमीदार, संपादक यांच्याकडून पितृसत्ताक आणि स्त्रीद्वेषी भाषा वापरली जाते, जी हिंसाचाराला स्त्रियांना जबाबदार ठरवितात. याचा अप्रत्यक्षपणे प्रेक्षकांवर परिणाम होतो आणि ते माध्यमांतून मांडलेली मते स्वीकारतात. यासारखे पितृसत्ताक व स्त्रीद्वेषी विचारसरणीवर आधारित वर्चस्ववादी चर्चाविश्व प्रतिकात्मक हिंसा आहे; कारण इतर लोक (प्रेक्षक) आपल्या जीवनात सत्य न पडताळता माध्यमांतून प्रकट केलेल्या विचारसरणीचे पालन करतात.
सामाजिक माध्यमेसुद्धा ‘ट्रोलिंग’च्या माध्यमातून प्रतिकात्मक हिंसा पसरवित असतात. सामाजिक माध्यमातून (उदा., फेसबुक, ट्विटर, व्हाट्स ॲप इत्यादी) विशिष्ट समूहांच्या विरोधात द्वेष पसरविणे अथवा सरकारी कामांवर प्रश्न विचारले, तर व्यक्तींना ट्रोल करण्याचे काम विशिष्ट राजकीय गटांकडून अथवा पितृसत्ताक, अल्पसंख्याक विरोधी, जातीयवादी मानसिकता असलेल्या व्यक्तींकडून केले जाते. ट्रोलिंग हे स्त्रिया, अल्पसंख्याक गट इत्यादींना लक्ष्य करून त्यांना परिघावर ढकलण्याचे काम करतो.
जात, लिंगभाव आणि प्रतिकात्मक हिंसा : बहुतांश वेळा कनिष्ठ जातीतील स्त्रियांवर केलेली हिंसा व बलात्कार हे विशिष्ट जातीतील स्त्रियांना आणि त्यांच्या समुदायातील पुरुषांना धडा शिकविण्यासाठी, त्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी केली जातात. बलात्कार ही स्त्रियांसाठी निश्चितच शिक्षा आहे; परंतु पुरुषांसाठी ती महत्त्वाची आणि प्रतिकात्मक शिक्षा आहे. उदा., भवरीदेवी हत्याकांड (राजस्थान), मुथुम्मा प्रकरण (आंध्र प्रदेश). मुथुम्मा प्रकरण हे स्त्रियांना जातीय सत्तासंबंधातून शिक्षा आणि प्रतिकात्मक रीत्या ‘दलित पुरुषत्वाचे खच्चीकरण’ दर्शविते आणि उच्च जातीय समूहांकडून जाती आधारित हिंसा ही योग्य होती, असे म्हणून तिला अधिमान्यता देते. त्यामुळे आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याने ‘अब्रुच्या’ नावाखाली ठार मारले जाते; मात्र वर्चस्ववादी गटामध्ये या प्रकाराला मान्यता मिळून इतर तरुणांनी (विशेषतः तरुणींनी) असे विवाह केल्यास त्यांनाही शिक्षा मिळेल यासाठी एक प्रतिकात्मक चौकट उभी केली जाते.
वर्चस्वाचे चर्चाविश्व म्हणून प्रतिकात्मक हिंसेकडे पाहिले जाऊ शकते. सत्ताहीन अथवा वर्चस्वहीन समूहांच्या विरोधात त्यांना परिघाबाहेर ढकलण्यासाठी वर्चस्ववादी दृष्टिकोण वापरले जातात. ही वर्चस्ववादी मूल्ये, संस्कृती, धर्म, असमान लिंगभाव संबंध, जातीभेद यांच्या माध्यमांतून अधिकृत केली जातात. समाजामध्ये सत्तेच्या प्रभावी वापरासाठी केवळ दमणकारी शक्तीचा वापर करून उपयोग नाही, तर शारीरिक भाषा, पेहराव, स्वसादरीकरण, सौंदर्यशास्त्र, आवडी-निवडी इत्यादी प्रतिकात्मक माध्यमांतून लोक एकमेकांतील सामाजिक सारखेपणा आणि फरक चिन्हांकित करतात. यातून अभिजन समूहाची सत्ता टिकविली जाऊ शकते. भारतामध्ये शुद्धता व पावित्र्य, सौंदर्यशास्त्र, चालीरीती, अन्न या संकल्पनांचा आधार घेऊन प्रतिकात्मक हिंसा कशी काम करते हे समजू शकते. ब्राह्मणी पितृसत्ताक प्रतिके व संस्कृतीला प्राधान्य देऊन इतर संस्कृती आत्मसात करणाऱ्या गटांना दुय्यम मानले जाते. त्यांच्या चालीरिती, अन्न शिजविणे व खाण्याच्या पद्धतींना रानटी अथवा मागास ठरविले जाऊन त्यांच्यात न्यूनगंडाची भावना वाढविली जाते. त्यामुळे प्रतिकात्मक हिंसा या संकल्पनेचा चिकित्सक वापर करून समाजामध्ये एखाद्या विशिष्ट गटाचे, लिंगभाव अस्मितांचे दुय्यमीकरण अथवा शोषण कशाप्रकारे अधिक मजबूत आणि अबाधित राखण्याचे काम केले जाते, हे समजून येते.
बोर्द्यू यांच्या प्रतिकात्मक हिंसेच्या संकल्पनेमुळे दृश्य आणि अदृश्य हिंसेचे स्वरूप आणि समाजामध्ये ती का टिकून राहते, तसेच आणखी मजबूत होते हे समजण्यास मदत होते. प्रतिकात्मक हिंसा ही गैरसमज आणि संमती यांच्या माध्यमांतून अधिक घट्ट केली जाते. समाजामध्ये परिघावरील लोक किंवा सत्ताहीन लोक वर्चस्ववादी सत्तासंबंध, धारणा, रूढी इत्यादी स्वीकारून स्वतःचे दुय्यमत्व अधिक घट्ट करतात. त्यामुळे सामाजिक सत्तासंबंधांचे सर्वसामान्यीकरण थांबविल्यास प्रतिकात्मक हिंसेला आळा घालता येईल.
संदर्भ :
- पावडे, कुमुद, अंत:स्फोट, पुणे, २०१६.
- लेले, म.; मोहिते, ऊ., आकाश पेलताना…परिवर्तनाच्यावाटेने, पुणे, २०१७.
- Bourdieu, P, Acts of Resistance : Against the New Myths of Our Time, Cambridge, 1998.
- Bourdieu, P., Masculine Domination, London, 2001.
- Chaturvedi, S., I am a Troll, India, 2016.
- Datta, Anindita, Gender, Space and Agency in India : Exploring Regional Genders capes, India, 2020.
- Rao, Anupama, Gender & Caste, New Delhi, 2005.
- Calhoun, Craig; LiPuma, Edward; Postone, Moishe, Bourdieu : Critical Perspectives, Cambridge, 1993.
समीक्षक : स्वाती देहाडराय