दुय्यम स्रोतांचे अवलोकन करणे ही संशोधन कार्याची पूर्वतयारी असून यास शोधकार्याच्या प्रारंभीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दुय्यम साहित्याला मुख्यतः प्रकाशित लिखित कामाचा संग्रह असल्याचे गृहीत धरले जाते; मात्र अलीकडे दुय्यम साहित्याची व्याख्या अधिक व्यापक झाली आहे. त्यामध्ये अप्रकाशित प्रबंध, मौखिक साहित्य, दृक-श्राव्य माध्यम, वृत्तपत्र, आंतरजाला (इंटरनेट) वरील स्रोत, भाषांतर आणि लिप्यांतर साहित्य यांचादेखील समावेश करण्यात आला आहे; मात्र, हे सर्व वाङ्मय सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध असणे ही दुय्यम स्रोत म्हणून दाखलपात्र होण्याची पूर्वअट आहे. अशा विविध स्रोतांचा आधार घेऊन उपलब्ध साहित्याचे वर्णन, सारांश आणि चिकित्सक मूल्यमापन करणे म्हणजेच दुय्यम संशोधनपर साहित्याचा आढावा घेणे होय.

साहित्याचा आढावा घेताना किती प्रमाणात संदर्भ साहित्याचा वापर करायचा, हे संशोधनाचा हेतू आणि व्यापकता यांवर ठरत असते. संशोधन विषय निवडल्यानंतर आपण संशोधन करत असलेल्या विषयावर आणि प्रश्नांवर इतर कोणी संशोधन केले आहे का, याची पूर्वपडताळणी आवश्यक असते. उपलब्ध संशोधन साहित्याचा आढावा घेतल्यामुळे संशोधकाला त्याने निवडलेल्या संशोधन विषयासंबंधी अधिक स्पष्टता तर येतेच, तसेच पूर्वीच्या संशोधनातील संशोधन प्रश्न, त्यात अवलंबिलेले पद्धतिशास्त्र, पद्धती, संशोधन निष्कर्ष इत्यादी साकल्याने समजतात. संशोधनपर विषयातील कोणत्या बाबींवर संशोधन झाले अथवा नाही हेही उमजते. साहित्याचा आढावा घेतल्याने आपल्या संशोधनाची उद्दिष्ट्ये, दिशा व रोख काय असावा यांबाबत निश्चिती मिळते. या संदर्भात पार्श्वभूमीपर साहित्याचे चिकित्सक मूल्यमापन करता केवळ नकारात्मक बाबींवर प्रकाश न टाकता अस्तित्वात असलेल्या संशोधनातून काय सकारात्मक निष्कर्ष समोर आले आहे, हे मांडणे आवश्यक असते.

साहित्य आढाव्यामध्ये मुख्यत: दोन बाबींचा समावेश असतो. एक, अगोदरच्या संशोधनातून सादर केलेल्या दाव्यांचा अथवा निष्कर्षांचा सारांश प्रस्तुत करणे. दोन, आजवर झालेले संशोधन कशाप्रकारे उपलब्ध ज्ञानामध्ये भर घालणारे ठरले आहे, त्यातील उणिवा कोणत्या आणि संशोधक या नात्याने तुम्ही नव्याने कोणते योगदान देणार आहात यांविषयीची स्थूल दिशादर्शक मांडणी करणे.

संशोधन साहित्याचा आढावा घेताना संशोधकाकडून विविध संदर्भांच्या अभ्यासावर बेतलेले एक सुसंगत विवरण अपेक्षित असते. संशोधनपर विषयासंदर्भात ऐतिहासिक आणि समकालीन कोणत्या चर्चा घडत आहेत, हे याद्वारे संशोधकाच्या लक्षात येते. संशोधनपर विषयाचे इतर उपविषयदेखील आहेत, हे ध्यानात येते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, सर्व प्रकारचे दुय्यम स्रोत व संबंधित कोशवाङ्मय तपशीलवार व बारकाईने नजरेखालून घातल्यानंतर एक प्रारंभिक स्वरूपाची संदर्भग्रंथ सूची (बिब्लिओग्राफी) हाती गवसते, जी उर्वरित संशोधन कालखंडभर मदतकारक ठरू शकते.

गुणात्मक संशोधन करत असताना साहित्याच्या भिन्न पैलूंचा आढावा घेणे आवश्यक असते. उदा., जर संशोधक स्त्रिया आणि आरोग्य धोरण यांविषयी संशोधन करणार असेल, तर कालौघातील विविध आरोग्यविषयक धोरणे, स्त्रियांची आरोग्यविषयक भौगोलिक तफावत, स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम करणारे घटक यांविषयी उपलब्ध साहित्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. या प्रक्रियेमधून आवश्यक माहिती किंवा आकडेवारी उपलब्ध होऊन संशोधन पुढे कसे घेऊन जाता येईल याविषयी कल्पना मिळू शकते. यामुळे संशोधकाने असा अभ्यास शोधणे आवश्यक असते की, ज्यामध्ये स्त्री आरोग्यविषयक बाबींची चर्चा केली असेल अथवा विविध सामाजिक, शासकीय, अकादमिक संस्थांनी स्त्रिया आणि आरोग्यविषयी महत्त्वपूर्ण संशोधन अहवाल सादर केले असतील.

संशोधन साहित्याचा आढावा घेताना उपलब्ध साहित्याचा आवाका नजरेसमोर ठेवून संकल्पना आणि विश्लेषण यांतील गुंतागुंत कोणत्या प्रकारे अभिव्यक्त झाली आहे अथवा होऊ शकते याचा अंदाज मिळू शकतो. या ज्ञानव्यवहारामुळे संशोधनाला नवी उंची गाठता येणे शक्य बनते.

वैशिष्ट्ये : फिंक आर्लेन यांनी संशोधन साहित्य आढावासंदर्भात काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत.

  • जुन्या साहित्याचा नव्याने अन्वयार्थ लावला जाण्याची अथवा नवीन साहित्याचा जुन्या पद्धती वापरून अन्वयार्थ लावला जाण्याची शक्यता विस्तारते.
  • साहित्य आढावा भविष्यातील संशोधनास दिशादर्शक म्हणून काम करतो.
  • साहित्य आढावा संबंधित क्षेत्रातील मुख्य वादविवाद तसेच सैद्धांतिक, संकल्पनात्मक प्रगतीविषयी माहिती अद्ययावत करतो.
  • साहित्य आढावा पुढील संशोधन करण्यासाठी ठोस पार्श्वभूमी अथवा पाया निर्माण करतो.
  • उपलब्ध संशोधनातील कच्चे दुवे स्पष्ट होण्यास मदत होते.

फायदे : संशोधन साहित्याचा आढावा घेताना संशोधकाला अनेक फायदे होतात.

  • संशोधकाला माहीत असलेल्या व नसलेल्या संशोधनाबाबत सर्वसामान्य माहिती उपलब्ध होते.
  • अगोदरच्या संशोधनामधून काय ज्ञान पुढे आले आहे, याविषयी माहिती कळल्याने संशोधकाला पुनरावृत्ती टाळता येते.
  • नवीन कल्पना किंवा विचार मिळतात, जे संशोधक आपल्या संशोधनामध्ये वापरू शकतात.
  • आजवरील संशोधनामधील कमतरता व त्यापायी न उलगडलेले प्रश्न दृष्टीपथात येतात.
  • संशोधकास सैद्धांतिक आणि पद्धतिशास्त्रीय प्रश्नांचा नव्याने तपास घेण्यास चालना मिळू शकते.

संशोधन साहित्य आढावा घेतानाचे महत्त्वपूर्ण मुद्दे :

  • साहित्याचा आढावा घेत असताना संशोधक म्हणून तुम्ही नवीन असाल तर, इतर संदर्भ साहित्याचा आधार घेऊन त्यांनी कशाप्रकारे साहित्य आढावा पार पाडला, हे पाहणे उद्बोधक ठरू शकते.
  • आजवरील दुय्यम संशोधनपर लिखाणातील वादविवाद, निष्कर्ष, मुख्य युक्तिवाद, सैद्धांतिक व संकल्पनात्मक मांडणी, पद्धतिशास्त्र आणि पद्धती यांविषयी सारांश रूपात मूल्यमापन मांडणे.
  • साहित्य आढावा घेताना वाचनात आलेल्या प्रत्येक लिखाणाविषयी लिहिणे आवश्यक नसते. जे विषयाशी किंवा संशोधन विषयाच्या उद्दिष्टांशी निगडित आहे, त्याविषयी लिहिणे अपेक्षित असते. त्यामुळे निवडक साहित्य विचारात घ्यावे आणि मांडणी करत असताना उपलब्ध संशोधन साहित्य तुम्ही करत असलेल्या संशोधनाशी कसे निगडित आहे, यावर भर द्यावा. त्याच प्रमाणे आढावा लिहिताना एक पुस्तक आणि त्यातील महत्त्वाचे युक्तिवाद, दुसरे पुस्तक व त्यातील युक्तिवाद असे न करता सर्व वाचलेल्या साहित्यामध्ये क्रम लावून अथवा दुवा प्रस्थापित करून लिखाण करावे.
  • उपलब्ध संशोधनातील कमतरता अधोरेखित करत, तुम्ही करत असलेले संशोधन कशाप्रकारे अस्तित्वात असलेल्या ज्ञानामध्ये भर घालणारे आहे, कोणते विषय तुम्ही कशाप्रकारे हाताळणार आहात यांविषयी मांडणी करावी.

संदर्भ :

  • संत, दु. का., संशोधन : पद्धती, प्रक्रिया, अंतरंग, पुणे, १९६६.
  • Arlene, F., Conducting Research Literature Reviews : From the Internet to Paper, London, 2005.
  • Knopf, J., Political Science & Politics, London, 2006.
  • Silverman, D., Doing Qualitative Research : A Practical Handbook, London, 2005.

समीक्षक : महेश गावस्कर