भांडवल आणि गुंतवणूक या संदर्भात मालकी हक्क किंवा समानाधिकार देणारा भाग म्हणजे ‘समभाग’ होय. भारतीय कंपनी कायदा १९५६ अनुसार, जो प्राधान्य भाग (प्रेफरन्स शेअर) नाही, तो भाग ‘समभाग’ म्हणून ओळखला जातो. अशा समभागांची कंपनी विक्री करते. आर्थिक ऐपत असणारे, गुंतवणूक करू शकणारे लोक समभाग खरेदी करतात. अशा समभाग विक्रीतून जे भांडवल गोळा होते, त्या भांडवलाला समभाग भांडवल असे म्हणतात. समभाग विक्रीमुळे कंपनीची स्थिर भांडवलाची गरज भागविली जाते, तर गुंतवणूकदारांना भाग भांडवलाच्या प्रमाणात लाभांश मिळतो. प्राधान्य भागधारकांना लाभांश दिल्यानंतर समभागधारकांना लाभांश मिळतो. याचाच अर्थ, इतर सर्व प्रकारची देणी दिल्यानंतर समभागधारकांच्या देय देण्याचा विचार केला जातो. कंपनी विसर्जित झाल्यानंतरही यांचा क्रम शेवटी असतो; कारण समभागधारक हे कंपनीचे मालक असतात. म्हणजेच यावरून असे लक्षात येते की, समभागधारक कंपनीला ‘जोखीम भांडवल’ (रिस्क कॅपिटल) पुरवितात. तसेच कंपनीच्या ध्येयधोरण, उद्दिष्टे आणि कार्यपद्धतींवर नियंत्रण ठेवतात. त्यांची सांपत्तिक भरभराट किंवा नशीब हे कंपनीच्या नफ्या-तोट्यावर अवलंबून असते. समभाग भांडवल याचा सोपा अर्थ सर्व भागांचे दर्शनी मूल्य समान किंवा सारखे असते. उदा., कंपनीला रु. १ लाख इतके भाग भांडवल गोळा करायचे आहे. त्यासाठी कंपनी प्रत्येकी रु. १० इतक्या दर्शनी किमतीचे १०,००० भाग विक्रीस काढते. यालाच समभाग विक्री असे म्हणतात. अशा भागांची खरेदी करणार्या गुंतवणूकदारांना सारखेच आधिकार मिळतात. उदा., मतदानाचा आधिकार, लाभांश, प्राप्तीचा अधिकार, समभागांची पुनर्खरेदी, बक्षीस भाग इत्यादी.
समीक्षक : सुनील ढेकणे