शारीरिक मानवशास्त्राचे आद्य प्रणेते पॉल ब्रोका यांचे मानवमितीमधील योगदान फार मोठे आहे. मानवमितीमध्ये त्यांनी मांडून ठेवलेल्या पद्धती इ. स. १८७० पर्यंत प्रचलित होत्या. त्यानंत व्हॉन इहरिंग यांनी इ. स. १८७४ मध्ये जर्मनीमध्ये भरलेल्या अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटीच्या काँग्रेसमध्ये मानवमितीच्या अभ्यासात सुसूत्रता यावी, काही नवीन मोजमापे असावित आणि तंत्रे वापरावित असे सुचविले होते. त्यानंतर म्यूनिक येथे इ. स १८७७ आणि बर्लिन येथे इ. स. १८८० मध्ये झालेल्या क्रॅनिओमेट्री कॉन्फरन्समध्ये इहरिंग यांनी सुचविलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये मस्तिष्कमिती आणि मानवमिती यांमध्ये वापरण्यात येणारी तंत्रे निश्चित करण्यात आली. या अंतर्गत विविध मोजमापे, त्यांची क्रमवारी, ती मोजमापे कोणत्या निश्चित बिंदुपासून घ्यायची यांचे नियम तयार करण्यात आले. डोक्याच्या/मस्तकाच्या/कवटीच्या मोजमापातील समान पातळी किंवा आकृती प्रतल (एफ. एच. प्लेन) ठरविण्यात आले. जीवशास्त्रीय मानवशास्त्रातील मानवमितीच्या अभ्यासपद्धतीसाठी मुलभूत विवेचन करण्यात आले. त्यानंतर इ. स १८८२ मध्ये फ्रँकफुर्ट येथे भरलेल्या तेराव्या जनरल काँग्रेस ऑफ जर्मन अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटीमध्ये हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. या प्रस्तावाला पारंपरिक मानवशास्त्रात फ्रँकफुर्ट सहमती किंवा ठराव असे संबोधण्यात येते. वास्तविक या प्रस्तावातील बरीचशी मोजमापे ब्रोका यांच्या प्रमाणेच होती. काही मोजमापांच्या व्याख्या निराळ्या होत्या. काही मोजमापांच्या नावात बदल सुचविले होते. आधुनिक मानवमितीमधील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
ब्रोका यांचे सहकारी पॉल टोपिनार्ड यांनीही ब्रोका यांची मोजमापे ही प्रायोगिक होती, असे मत व्यक्त केले; परंतु त्याच बरोबर त्यांनी नवीन मोजमापांचीही गरज असल्याचे मत व्यक्त केले. या सर्व घडामोडींमधून ‘जर्मन स्कूल ऑफ अँथ्रोपोमेट्री’ आणि ‘फ्रेंच स्कूल ऑफ अँथ्रोपोमेट्री’ अशा दोन प्रणाली मानवमितीमध्ये कार्यान्वित झाल्या.
संदर्भ :
- Das, B. M.; Deka, Ranjan, Physical Anthropology Practical, Delhi, 1990.
- Singh, I. P.; Bhasin, M. K., A nthropometry, Delhi, 1989.
समीक्षक : शौनक कुलकर्णी