
विसाव्या शतकातील अत्यंत सोयीस्कर, सुरक्षित व वापरण्यास सुलभ असा गृहोपयोगी उपकरणाचा शोध म्हणजे अति सूक्ष्मतरंगावर आधारित विद्युत भट्टी होय. या उपकरणात सूक्ष्म विद्युत लहरींचा वापर केला जातो. या लहरींची वारंवारता (Frequency) २,४५० मेगाहर्ट्झ (२.४५ गिगाहर्ट्झ) इतकी असते, अशा लहरींची एक विशिष्ट गुणवत्ता म्हणजे असे तरंग पाणी, चरबीयुक्त व शर्करायुक्त पदार्थांत सहज सामावले जातात, अशा तऱ्हेने त्या पदार्थात अंतर्गत उष्णता निर्माण होते आणि पदार्थ आतील बाजूने गरम होऊन शिजण्याची क्रिया घडते, त्यामुळे पदार्थ सर्व बाजूने सारख्या प्रमाणात गरम होतो आणि व्यवस्थित शिजवला जातो. हे विद्युत तरंग काच, प्लॅस्टिक अथवा तत्सम पदार्थात मिसळत नाहीत. तसेच हे तरंग धातूच्या आवरणावरून परावर्तित होतात. या सर्व गुणधर्मांचा उपयोग करून ही भट्टी निर्माण करण्यात आली आहे.

रचना व कार्य : सूक्ष्मतरंगावर आधारित विद्युत भट्टीची मूलभूत रचना आ. २ मध्ये दाखवली आहे.
मुख्य भाग : (१) अंतर्गत एकदिशकारक (Internal DC power supply) : सूक्ष्म व मोठ्या प्रमाणात वारंवारता असणाऱ्या विद्युत लहरी निर्माण करण्यासाठी मॅग्नेट्रॉनचा उपयोग करावा लागतो. या मॅग्नेट्रॉनसाठी उच्च दाबाच्या एकदिश प्रवाहाची (High voltage DC) गरज असते. अंतर्गत एकदिशकारकामार्फत (DC converter) हा पुरवठा केला जातो.
(२) मॅग्नेट्रॉन : या भट्टीचे केंद्रस्थान म्हणजे मॅग्नेट्रॉन होय. हे उपकरण निर्वात नळी (Vacuum Tube) व शक्तिशाली चुंबक (High Power magnet) वापरून निर्माण केले आहे. निर्वात नळीत उच्च दाबामुळे निर्माण होणारे ऋणाग्र (Electron) चुंबकावर बसवलेल्या विशिष्ट आकाराच्या धनाग्राकडे (Anode) आकर्षित होतात. धनाग्राचा विशिष्ट आकार व चुंबकीय क्षेत्र यामुळे या ऋणाग्रांना गती प्राप्त होते आणि उच्च क्षमतेचे अतिसूक्ष्म विद्युत तरंग निर्माण होतात.
(३) तरंग दिशाकारक : (Wave Guide). मॅग्नेट्रॉनद्वारे निर्माण झालेले विद्युत तरंग दिशाकारकामार्फत भट्टीत वितरण केले जातात.
(४) भट्टी : भट्टीच्या भिंती धातूच्या पत्र्यापासून बनवलेल्या असतात. त्यामुळे दिशाकारकामार्फत वितरित केलेले विद्युत तरंग परावर्तित होऊन मधोमध फिरणाऱ्या तबकडीवर केंद्रित केले जातात. अशा तऱ्हेने तबकडीवर ठेवलेला पदार्थ अंतर्गत उष्णता निर्माण होऊन शिजवला जातो.
पदार्थ गरम करताना अथवा शिजवताना काचेच्या, चिनी मातीच्या अथवा विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकच्या (Microwave safe plastic) भांड्यांचाच उपयोग करावा लागताे. धातूच्या भांड्यांचा उपयोग धोकादायक आहे.
मॅग्नेट्रॉन कार्यरत असताना त्याचे तापमान वाढत असते तेव्हा तो थंड ठेवण्यासाठी पंख्याची सोय केलेली असते. पदार्थ सर्व बाजूंनी गरम होण्यासाठी भट्टीच्या मधोमध एक फिरती तबकडी असते. त्याचप्रमाणे पदार्थ हवा तेवढाच गरम करण्यासाठी वेळनियंत्रक (Timer) बसवलेला असतो. सुनिश्चित वेळेनंतर (Set time) प्रवाह खंडित केला जातो.
उपयुक्तता : अत्यंत सोयीस्कर, सुरक्षित , स्वच्छ व वेळ आणि वीज वाचवण्यासाठी या भट्टीचा घरगुती व औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वापर वाढत आहे.
पहा : गृहोपयोगी उपकरणे.
संदर्भ :
समीक्षक : अंजली धर्मे