सहस्रदल पद्म हे पद्मकमळाचा एक कृषिप्रकार (कल्टीव्हर) आहे. याचा समावेश निलंबोनेसी या वनस्पती कुटुंबात होतो. निलंबो या प्रजातींमुळे या कुटुंबाला निलंबोनेसी हे नाव प्राप्त झाले. निलंबो या शब्दाची उत्पत्ती निलंबी या सिंहली प्रादेशिक नावापासून झाली. जगभरात या कुटुंबात निलंबो ही एकच प्रजाती असून त्यामध्ये निलंबो न्युसीफेरा आणि निलंबो ल्यूटिया या दोन जाती आहेत. पद्मकमळ (Nelumbo nucifera) हे भारतातील तसेच भारताबाहेरील उष्णकटिबंधीय प्रदेशात आणि ईशान्य ऑस्ट्रेलियात नैसर्गिकरित्या वाढते.
पद्मकमळांची विविधता, त्यांच्या लागवडीचा आणि पैदाशीचा इतिहास पाहता संपूर्ण जगामध्ये चीन हा देश पद्मकमळ कृषिप्रकार तयार करणारा अग्रेसर देश मानला जातो. समाजमाध्यमावर फिरत असलेले पद्मकमळ हेनिलंबो न्युसीफेराचा कृषिप्रकार आहे. या कृषिप्रकाराचे नाव ‘झीझून खियांबान’ (Zhizun Qianban) असे असून याचे नामकरण साऊथ चायना बोटॅनिकल गार्डनचे वनस्पती संशोधक डैके टियान (Daike Tian) यांनी केले (२००९). झीझून म्हणजे सर्वोच्चस्थान आणि मान असणारा किंवा महाराजा होय आणि खियांबान म्हणजे हजार पाकळ्या होय. ‘झीझून खियांबान’ याचा इंग्रजी अर्थ ‘अल्टिमेट थाऊजंड पेटल’ असा आहे.
वनस्पती संशोधक डॉ. ली चेन यांनी हे पद्मकमळ मि. चांगझीन चेन यांच्या नर्सरीतून कंद रूपात आणले. हे पद्मकमळ १९६६ ते १९७६ या काळात चीनमध्ये झालेल्या क्रांतीमधून वाचले होते. या काळात खाजगी बाग व वनस्पती बाळगण्यावर बंदी होती. त्यामुळे तेथील लोकांकडे असणाऱ्या शोभिवंत वनस्पती नष्ट झाल्या होत्या. या पद्मकमळाचे एक झाड पारंपरिक दगडी भांड्यामध्ये लावल्यामुळे बचावले होते. त्याच्या बाह्यरूपात्मक गुणवैशिष्ट्यावरून त्याला “झीझून खियांबान” असे नाव दिले जाऊन तशी नोंद इंटरनॅशनल वॉटर लिली अँड वॉटरगार्डन सोसायटीकडे केली गेली.
झीझून खियांबान या पद्मकमळाचे वैशिष्ट्य : अत्यंत सुंदर, आकर्षक, शोभिवंत पाणवनस्पती आहे. याची उंची १५६ ते २०७ सेमी., पाने ४२ ते ७६ सेमी. लांब आणि ३१ ते ६६ सेमी. रुंद असतात, तर फूल ८ ते १२ सेमी. व्यासाचे असते. या कृषिप्रकारामध्ये दले आणि दलाभ पुं- केसर (एकूण पाकळ्या) १६५० असतात आणि पुष्पासन नसते. ४ ते ५ दिवसात याची फुले पूर्णपणे उमलतात. फुलल्यानंतर साधारपणे ७ दिवस पद्मकमळे टिकतात. ही पद्मकमळे वंध्य (स्टराइल) असतात; कारण यामध्ये पुं-केसर आणि स्त्री-केसर नसते. याची लागवड पुनरुत्पत्ती कंदाद्वारे करता येते. हे पद्मकमळ ‘झोन्गशन होंगताई (Zhongshan Hongtai) आणि खियांबान लायन (Qianban Lian) या दोन्ही कृषिप्रकाराशी साधर्म्य साधते. ‘झोन्गशन होंगताई’ यापासून नैसर्गिकरित्या उत्परिवर्तित झाले असण्याची शक्यता आहे. भारतात सन २०२१ च्या जुलै महिन्यात केरळमध्ये विविध ठिकाणी हे पद्मकमळ उमलेले पाहावयास मिळाले.
संदर्भ :
- Daike, T. ‘Zhizun Qianban’: A Recognition of an Obscure Lotus (Nelumbo) Cultivar with an Interesting Legend. Hort. Science. 46 (7):1044–1045, 2011.
- Daike, T. Nelumbo nucifera ‘Zhizun Qianban’ (also ‘Ultimate Thousand-petals’) International Water lily and Water Gardening Society : Water Garden Journal. 28 (2): 9, 2013.
समीक्षक : शरद चाफेकर