राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एन.सी.सी.एस): (स्थापना: सन १९६८) केंद्र शासनाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेचा प्रारंभ झाला. या संस्थेचा इतिहास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेल्या राष्ट्रीय ऊती संवर्धन केंद्राच्या प्रकल्पापर्यंत जातो. संस्थेचे पहिले संचालक डॉ. यू. व्ही. वाघ यानी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे (इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च) पेशी जतन करण्यासाठी (Cell Repository Program) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान बोर्डाकडे (National Biotechnology Board (NBTB) प्रकल्प सादर केला.
खऱ्या अर्थाने १९८८ साली नॅशनल फॅसिलिटी फॉर अॅनिमल टिश्यू अॅन्ड कल्चर कलेक्शन (NFATCC) या नावाने संस्थेची नोंदणी झाली. याच वर्षी केंद्र शासनाच्या जैवतंत्रज्ञान विभागाने नॅशनल सेल रेपॉझिटरी रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट हा विभाग पुणे विद्यापीठाच्या बाहेर अन्यत्र हलवला. १९९६ साली संस्थेचे नाव बदलून राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र असे केले. आधुनिक पेशी विज्ञान संशोधनासाठी सर्व अद्ययावत सुविधा केंद्रामध्ये केल्या. कर्करोग, मधुमेह, संसर्गजन्य आजार आणि पुनर्जननी/पुनरुत्पन्न औषधविज्ञान (regenerative medicine) यावर अधिक संशोधन करावे असे ठरवले गेले.
केंद्र शासनाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे उभ्या केलेल्या राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेला स्वायत्त दर्जा दिलेला आहे. संस्थेचा उद्देश देशात पेशी विज्ञानात उच्च दर्जाचे संशोधन व्हावे हा आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रांगणात संस्थेची स्वतंत्र इमारत आहे. प्रारंभापासून राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था पेशीविज्ञानात भरीव व आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करीत आहे. संस्थेमध्ये विविध प्राण्यांच्या पेशींचा मोठा साठा आहे. विविध शैक्षणिक आणि प्रशिक्षण शिबिरे घेण्यात संस्था पुढाकार घेते. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था आधुनिक पद्धतीचे आंतरपेशी संपर्क विज्ञान (cell signaling), मूळ पेशी तंत्रज्ञान (stem cell technology), प्रतिक्षमता, जनुकीय क्रमनिर्धारण, प्रथिन ओळख, प्रथिन रचना (proteomics), सूक्ष्मजीव पारिस्थितिकी/सूक्ष्मजीव परिसंस्था (microbiological ecology), रचनात्मक जीवविज्ञान अशा विविध क्षेत्रात संशोधन करते. नुकतेच कोरोना साथीच्या काळात जिवंत कोरोना-१९ विषाणू मिळवून त्याची हाताळणी व त्याचे क्रमनिर्धारण संस्थेच्या संशोधकांनी यशस्वीपणे केले आहे. तसेच महाराष्ट्रात आढळलेल्या दोन कोविड -१९ उत्परिवर्तीत विषाणूचे क्रमनिर्धारण करण्यात व त्याची संसर्गक्षमता ठरवण्यात संस्थेने यश मिळवले आहे.
राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेतील वैज्ञानिकांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेमध्ये प्रसिद्ध होतात. या वैज्ञानिकांना त्यांच्या संशोधनाबद्दल पद्मश्री, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, नॅशनल बायोसायन्स अॅवार्ड व स्वर्ण जयंती फेलोशिप मिळालेल्या आहेत. या राष्ट्रीय संस्थेतून पेशींची उच्च दर्जाची छायाचित्रे मिळवण्यासाठी संस्थेमध्ये अत्याधुनिक व्यवस्था केली आहे. पुणे बायोक्लस्टरमध्ये माहिती आदान प्रदान करण्यात संस्था पुढाकार घेते. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, आयसर ही केंद्र शासनाची विज्ञान संस्था आणि परसिस्टंट सिस्टीम ही आयबीएमच्या सहकार्याने सुरू झालेली संगणक तंत्रज्ञानावर आधारित कंपनी या माहिती तंत्रज्ञान वापरून मानवी ॲटलास बनवण्याच्या कामात सहभागी आहेत. संगणक आधारित या कामासाठी पुणे विभागातील अनेक संगणकतज्ञ सहभागी झाले आहेत. या संस्थेतून आणखी एक राष्ट्रीय पातळीवरील संस्था सुरू झाली आहे त्याचे नाव राष्ट्रीय सूक्ष्मजीव संपदा केंद्र.
संदर्भ :
समीक्षक : किशोर कुलकर्णी