श्रीलंकेतील सर्वाधिक लांबीची नदी. तिला सिंहली भाषेत ‘ग्रेट सँडी रिव्हर’ या नावाने ओळखले जाते. या नदीची लांबी ३३५ किमी. आणि जलवाहन क्षेत्र १०,४४८ चौ. किमी. आहे. ही नदी देशाच्या मध्य आणि पूर्व भागांतून वाहते. तिचा उगम श्रीलंका बेटाच्या दक्षिणमध्य भागातील उच्चभूमी प्रदेशातील हॅटन पठारावर होतो. उगमानंतर प्रथम चहा आणि रबर उत्पादक प्रदेशातून उत्तरेस व ईशान्येस वाहत जाऊन कँडी शहराजवळ ती पूर्ववाहिनी बनते आणि त्यानंतर ती सखल प्रदेशांतून पुन्हा उत्तरेस वाहू लागते. या भागात तिला आंबन गंगा ही तिची प्रमुख उपनदी येऊन मिळते. हॅटन ओया व कोटमाली ओया या तिच्या इतर प्रमुख उपनद्या आहेत. पोलोन्नरुव या ठिकाणापासून पुढे वाहत गेल्यानंतर शेवटी ती त्रिंकोमाली बंदराच्या दक्षिणेस ११ किमी. वर कोड्डियार उपसागरमार्गे बंगालच्या उपसागराला मिळते.

महावेली गंगा नदीचे शीर्षप्रवाह श्रीलंकेच्या आर्द्र प्रदेशातून वाहत असल्यामुळे ती बारमाही वाहते. त्याचा फायदा देशाच्या पूर्व भागातील शुष्क प्रदेशातील शेतीसाठी चांगला होतो. १९६० च्या दशकात या नदीची जलसिंचन आणि जलविद्युतनिर्मितीची उपयुक्तता वाढविण्यासाठी आणि व्यापक विकास साधण्याच्या दृष्टीने ‘महावेली गंगा विकास कार्यक्रम’ ही बहुउद्देशीय धरण योजना हाती घेण्यात आली. त्याअंतर्गत महावेली गंगा व तिच्या उपनद्यांवर अनेक धरणे बांधण्यात येणार होती. शुष्क प्रदेशाला जलसिंचन, कृषिउत्पादन वाढविणे व रोजगाराच्या संधी उपलब्ध

करून देणे, आर्थिक व सामाजिक विकास साधणे, जलविद्युतनिर्मिती, पूरनियंत्रण अशी व्यापक उद्दिष्टे या कार्यक्रमात अंतर्भूत होती. त्यासाठी जागतिक बँकेचे सहकार्य घेऊन सर्व योजना १९९० पर्यंत पूर्ण करण्याचा मानस होता; मात्र बोवाटेनी प्रकल्प (१९७६ मध्ये पूर्ण), पॉल्गोला बॅरेज (१९७६), कोटमाली (१९८५), व्हिक्टोरिया (१९८५), मदुरू ओया (१९८६), रांदेनिगला (१९८६), रान्ताम्बे (१९९०), मोरागाहाकांडा (२०१८) एवढेच प्रकल्प पूर्ण झाले असून अजूनही काही प्रकल्प प्रस्तावित आहेत. महावेली गंगा नदीप्रणालीतील सहा जलविद्युतनिर्मिती प्रकल्पांद्वारे देशाच्या एकूण वीजनिर्मितीच्या चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक वीज निर्मिती केली जाते.

समीक्षक : नामदेव स. गाडे