यूरोप खंडातील बाल्टिक समुद्राचा अती पूर्वेकडील फाटा. याचा पूर्व-पश्चिम विस्तार ४०० किमी., दक्षिणोत्तर विस्तार १९ ते १३० किमी. आणि क्षेत्रफळ ३०,००० चौ. किमी. आहे. तुलनेने हे आखात उथळ असून त्याची सरासरी खोली ३८ मी. आणि कमाल खोली पश्चिम भागात ११५ मी. आहे. फिनलंड आखाताच्या उत्तरेस फिनलंड, पूर्वेस आणि दक्षिणेस रशिया; तर दक्षिणेस एस्टोनिया हे देश आहेत. हे आखात पश्चिमेस बाल्टिक समुद्रात विलीन होते, तर पूर्वेस नीव्हा उपसागरात त्याचा शेवट होतो. नीव्हा उपसागराची खोली ६ मी. पेक्षाही कमी आहे. त्यामुळे सुरक्षित वाहतुकीसाठी नीव्हा उपसागराचा तळ खोदला आहे. या आखातास नीव्हा, नार्व्हा, कूमी, लूगा, सिस्ता इत्यादी नद्या मिळतात. आखातात येणाऱ्या एकूण गोड्या पाण्यापैकी दोन तृतीयांश पाणी एकट्या नीव्हा नदीचे असते. साइमा कालव्याने हे आखात फिनलंडच्या आग्नेय भागात असलेल्या साइमा सरोवर प्रणालीशी जोडलेले आहे. ‘श्वेत समुद्र-बाल्टिक कालवाप्रणाली’ द्वारे फिनलंडचे आखात लॅडोगा व ओनेगा सरोवरांच्या माध्यमातून श्वेत समुद्राशी जोडलेले आहे. या सरोवरात अनेक उंचवटे व बेटे आहेत. त्यांपैकी कॉटलन, हॉगलँड (सुर्सरी), लाव्हनसारी ही प्रमुख बेटे आहेत. रशियाने इ. स. १७०० पासून या आखातात तटबंदीयुक्त १९ कृत्रिम बेटे बांधली आहेत. ‘ग्रेट नॉर्दर्न वॉर’ (इ. स. १७०० ते इ. स. १७२१) या युद्धकाळात सागरी हल्ल्यांपासून संरक्षण करणे, हा त्यांच्या निर्मितीचा मुख्य हेतू होता.

नद्यांद्वारे आणि बर्फ वितळून मोठ्या प्रमाणावर गोड्या पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे आखातातील पाण्याची लवणता बरीच कमी, म्हणजे दर हजारी केवळ ६ आहे. पाण्याचे सरासरी तापमान हिवाळ्यात ०° से. पर्यंत, तर उन्हाळ्यात ते १५° ते १७° से. पर्यंत असते. आखात तुलनेने उथळ व गोड्या पाण्याचे असल्याने त्यातील पाणी लवकर गोठते. वर्षातील तीन ते पाच महिने, सामान्यपणे नोव्हेंबरअखेर ते एप्रिलअखेरपर्यंत ते गोठलेले असते. जानेवारीच्या अखेरीस ते पूर्णपणे गोठते; परंतु हिवाळा सौम्य असेल, तर मात्र ते पूर्णपणे गोठत नाही. येथील हवामान आर्द्र खंडीय प्रकारचे असते. उन्हाळे सौम्य व हिवाळे कडक थंडीचे असतात. जोरदार पश्चिमी वाऱ्यांमुळे आखातात तरंग निर्माण होतात आणि पाण्याला उधाण येते. अनेकदा आखातातील पाण्याची पातळी वाढून नीव्हा नदीच्या त्रिभुज प्रदेशात पूरपरिस्थिती निर्माण होते. काही वेळा बर्फ वितळूनही तेथे पूरपरिस्थिती निर्माण होते. किनारी प्रदेशात सूचिपर्णी आणि पानझडी अरण्ये आहेत. त्यांत स्फ्रूस, बर्च, पाइन, विलो इत्यादी वृक्षप्रकार आढळतात. आखातात हेरिंग, कॉड, सामन, पर्च इत्यादी जातींचे मासे सापडतात.

फिनलंड आखाताच्या किनाऱ्यावर चुनखडकाचे तुटलेले कडे आहेत. काही ठिकाणी त्यांची उंची ५५ मी. पर्यंत आढळते. उत्तर किनाऱ्यावर अनेक लहान लहान उपसागर आहेत. तीन ते पाच महिने आखात गोठलेले राहत असल्यामुळे, तसेच त्यातील वालुकाभित्ती व खडकांमुळे जलवाहतुकीत अडथळे येतात. याच्या किनाऱ्यावर फिनलंडची कॉट्का, हेल्सिंकी, पॉर्कला; रशियाची व्हीबॉर्ग, सेंट पीटर्झबर्ग (लेनिनग्राड), क्रॉनश्लट (क्रोनस्टॅट); एस्टोनियाचे टाल्यिन ही प्रमुख बंदरे व शहरे आहेत. या बंदरांच्या दृष्टीने फिनलंडचे आखात हा महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. फिनलंड आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावरील प्रदेश १३ सप्टेंबर १९९४ पासून रामसर पाणथळ परिसर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.

समीक्षक : नामदेव स. गाडे