डोडसन, जेम्स : (अंदाजे १७०५ मध्ये ते २३ नोव्हेंबर १७५७) जेम्स डोडसन इंग्लंडमध्ये जन्मले. सुप्रसिद्ध फ्रेंच गणिती अब्राहम द मॉयव्हर हे त्यांचे आधी अध्यापक आणि नंतर मित्र होते. लंडनमध्ये डोडसन शाळेत गणित आणि विमा हे दोन्ही विषय शिकवीत. अर्थार्जनाला पूरक म्हणून विम्यासंबंधांतील आर्थिक बाबींवरही ते सल्ले देत. डोडसन यांचे १७४२ मध्ये ॲन्टि-लॉगॅरिदमिक कॅनन (‘The Anti-Logarithmic Canon’) हे पुस्तक प्रकाशित झाले. यात लॉगॅरिदम्सची तोंडओळख आणि एक-लाखाहून लहान असलेल्या सर्व संख्यांचे बारा दशांश स्थळांपर्यंतचे लॉगॅरिदम्स मूल्य दिलेले होते. अशी विस्तारित एकमेव सारणी त्या काळी उपलब्ध होती. १७४७ मध्ये डोडसननी सात दशांश स्थळांपर्यंतचे लॉगॅरिदम्स असलेल्या अनेक लहान सारण्यांचे द कॅल्क्युलेटर: ॲडाप्टेड टू सायन्स, बिझनेस ॲण्ड प्लेझर्स इ. प्रकाशन केले. यानंतर त्यांनी तीन खंडात ‘द मॅथेमॅटिकल रिपॉझिटरी’ हा गणिताच्या विविध शाखांतील असंख्य समस्यांची वैश्लेषिक आणि बीजगणितीय उकल करणारा ग्रंथ प्रकाशित केला. यांपैकी खंड-पहिला १७४८ मध्ये तर दुसरा खंड १७५३ मध्ये प्रकाशित झाला. दोन्हीत दैनंदिन आयुष्यातील वैविध्यपूर्ण समस्या आणि मनोरंजक प्रश्नांची उत्तरे गणिती तपशिलासह दिली होती. सन १७५० मध्ये त्यांचे ‘अकाउंटंट’ हे बुककीपिंगवरील पुस्तक प्रकाशित झाले. १७५१ मध्ये त्यांनी विख्यात गणिती, एडमंड विंगेट (Edmund Wingate) लिखितॲरिथमॅटिक या पुस्तकाचे संपादन केले.

आजीव-वार्षिकी (annuities), उत्परिवर्तन (reversions), विमा, जीवन भाडेपट्टी (leases on life) इत्यादीना वाहिलेला १७५५ मध्ये प्रकाशित झालेला तिसरा खंड हा फारच महत्त्वपूर्ण ठरला. डोडसन यांच्या या महत्त्वाच्या कार्यासाठी १७५५ मध्ये त्याना रॉयल सोसायटीचे अधिछात्रत्व मिळाले तसेच त्यांची रॉयल मॅथेमॅटिकल स्कूलच्या आणि त्याजवळच्या स्टोन स्कूलच्या मुख्याध्यापकपदी निवड झाली.

डोडसन यांना १७५५ मध्ये त्यांचे वय ४५ हून अधिक असल्याने ॲमिकेबल लाईफ ॲश्युरन्स सोसायटीच्या धोरणानुसार विमा नाकारण्यात आला होता. त्यामुळे एक नवी, अधिक न्याय्य (equitable), कोणत्याही वयाला सामावणारी, आश्वासक विमा योजना निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्याकाळी जीवन आश्वासक विम्यासाठी (Whole Life Insurance) निर्धारीत केलेल्या वयोमर्यादेतील सर्वांनाच सरसकट ५% वार्षिक दराने हप्ता भरावा लागे. यातूनच डोडसनना जीवन आश्वासक विम्याचे मूल्य वयाच्या तर्कावर ठरवण्याची प्रेरणा मिळाली. नव्या योजनेसाठी त्यांनी एडमंड हॅले यांच्या १६९३ मधील मृत्युदर-सारण्या वापरल्या. त्याकाळी जीवन आश्वासक विमा केवळ अल्प मुदतीचा, बरेचदा वर्षभराचाच, असल्यामुळे या व्यवसायाची मागणी अगदीच सीमित होती. शिवाय, प्रामुख्याने व्यावसायिक सावकार किंवा तत्कालिन विख्यात व्यक्तींच्या मृत्युच्या अंदाजावरील जुगारावर विमे उतरविले जात. सामान्य माणसांचे विमे उतरविण्याची पद्धत तेव्हा नव्हतीच.

या पार्श्वभूमीवर, विम्याचे आश्वासन एकाच वर्षापुरते मर्यादित न ठेवता ते विमाधारकाच्या उर्वरित आयुष्यालाही लागू असावे, हे तत्त्व डोडसननी नव्या योजनेत आणले. तसेच, अत्यंत दुर्दैवी परिस्थितीत मिळणारी भरपाई, एवढ्याच दृष्टीकोनातून अल्प-मुदतीच्या विमा योजनेकडे न पाहता, खात्रीपूर्वक एका स्थिर रकमेची हमी विमाधारकाला मिळेल, अशी व्यवस्थाही त्यांनी नव्या योजनेत केली. संपूर्ण जीवन आश्वासक विम्याची रक्कम नियमित सममूल्य हप्त्यांत कशी भरता येईल, ते त्यांनी आपल्या १७५६ मध्ये प्रकाशित केलेल्या फर्स्ट लेक्चर्स ऑन इन्शुरन्स या पुस्तकात अधिक विस्ताराने स्पष्ट केले.

वयानुसार मृत्युदर वाढत असल्याने, विमाकराराच्या सुरुवातीच्या वर्षांतील हप्त्याची रक्कम एका वर्षाच्या मुदतीच्या विमा करारात ठरलेल्या हप्त्याच्या रकमेहून अधिक ठेवावी, या डोडसन यांच्या कल्पकतेमुळे विमा करारानुसार सोसायटीकडे जमा होणारी अतिरिक्त रक्कम, एका अर्थाने दीर्घकालीन राखीव निधी ठरे. या राखीव निधीचा अंशतः उपयोग बऱ्याच वर्षांनंतर उद्भवणाऱ्या दाव्यांचे निराकरण करण्यासाठी होई, जेव्हा खरे तर त्या वर्षांचे नियमित देय हप्ते, धारकाच्या विमासुरक्षा कवचासाठी अपुरे पडत. संपूर्ण जीवन विम्याच्या डोडसन यांच्या नव्या संकल्पनेमुळे अल्पकालीन जीवन विम्याचे रुपांतर एकपरीने दीर्घकालीन बचत योजनेत झाले. डोडसन यांची विमाशास्त्रातील ही नवीनतम कल्पना उदयोन्मुख पगारदार आणि विवेकी मध्यमवर्गांना इतकी आकर्षून घेणारी ठरली, की त्यामुळे विमा व्यवसाय भरभराटीला आला.

आपल्या विमा-योजनेची कार्यवाही व्हावी म्हणून डोडसन यांनी एक नवीन विमा-संस्था स्थापन करण्याचे योजले. परंतु त्यांना आवश्यक परवानग्या मिळाल्या नाहीत. १७५७ मध्ये त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या मृत्युपश्चात काही विख्यात गणितींच्या पाठपुराव्यांमुळे १७६२ मध्ये ‘द इक्विटेबल लाइफ ॲश्युरन्स सोसायटी’ अस्तित्वात आली आणि डोडसन यांची विमायोजना प्रत्यक्षांत उतरली. प्रतिष्ठित इन्शुरन्स हॉल ऑफ फेममध्ये त्यांची १९६५ साली नोंद घेण्यात आली.

विमा क्षेत्रातील दूरदर्शी योगदानामुळे डोडसन यांना जगभर जीवन विम्याचे पिता ही ओळख मिळाली.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर