वाऱ्याच्या झीज (अपक्षरण) कार्यामुळे निर्माण होणारे भूमिस्वरूप. याला ज्यूजेन नावानेही ओळखले जाते. उष्ण वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या झीज कार्यामुळे वेगवेगळी भूमिस्वरूपे निर्माण होतात, त्यांपैकीच झ्यूजेन हे एक भूमिस्वरूप आहे. वाऱ्याचे खनन कार्य त्याच्या वेगावर व त्यात सामावलेल्या वाळू, रेती इत्यादी पदार्थांच्या प्रमाणावर अवलंबून असते. वाऱ्याच्या खालच्या थरातून वाळूचे मोठे कण, तर वरच्या थरातून बारीक कण वाहत जाऊन ते खडकांवर आदळतात. त्यामुळे खडक फुटतात किंवा गुळगुळीत होतात. बहुतेक खडकांमध्ये सांधे (भेगा) आणि विभंग असतात. वाळवंटात ज्या ठिकाणी कठीण व मृदू खडकांचे थर एकमेकांना समांतर असतात, त्या ठिकाणी कायिक विदारणाच्या वेगवेगळ्या अपघर्षकांमुळे आणि प्रक्रियांनुसार खडकांचे सांधे अधिकाधिक रुंद होत जातात. उष्ण वाळवंटी प्रदेशात दिवसा प्रखर उष्णता आणि रात्री कडाक्याची थंडी असे विषम हवामान आढळते. थंडीच्या काळात खडकाच्या सांध्यांमध्ये साचलेले पाणी गोठून त्याचे बर्फ बनते. बर्फाचे आकारमान वाढत असल्यामुळे त्याचा दाब सांध्यातील खडकांवर पडून, ते सांधे रुंद होऊन खडकांची झीज होण्यास मदत होते. तसेच दिवसा प्रखर उष्णतेमुळे खडक प्रसरण पावतात आणि रात्री कडाक्याच्या थंडीमुळे ते आकुंचन पावतात. सततच्या या आकुंचन-प्रसरणामुळे खडक ठिसूळ होत जाऊनही त्यांतील सांधे रुंदावण्यास मदत होते. वाऱ्याचे अपघर्षण कार्य तर चालू असतेच. सातत्याने होणाऱ्या या कायिक प्रकारच्या विदारणामुळे खडकांतील सांधे अधिकाधिक रुंदावत जाऊन, कठीण खडकाच्या थराखालील मृदू खडक उघडा पडतो. वाऱ्याच्या अपघर्षण कार्यामुळे मृदू खडकाची झीज जास्त होते आणि कठीण खडकाचे भाग सावकाश व कमी झिजतात. त्यामुळे सांधे बरेच खोल होत जाऊन मूळ भूमिस्वरूपातील अपघर्षणरोधक कठीण खडक झाकण असलेल्या दौतीसारखे किंवा टेबलासारखे तसेच उभे असलेले दिसतात, त्यांनाच ‘झ्यूजेन’ असे म्हणतात. सातत्याने चालणाऱ्या वाऱ्याच्या घर्षण कार्यामुळे झ्यूजेनचा आकार हळूहळू कमी होत जातो आणि मधले खिंडार अधिकाधिक मोठे होत जाते. कालांतराने झ्यूजेनचे तळही लहान व कमकुवत बनत जाऊन त्यांचे माथे खाली कोसळून पडतात. विभंगांच्या तळापासून झ्यूजेन सुमारे ३ ते ३० मी. उंचीचे आढळतात.

वारा जर सतत एकाच दिशेने वाहत असेल, तर त्या वाताभिमुख बाजूने झ्यूजेन जास्त प्रमाणात झिजतात. त्यामुळे तिरप्या आकाराचे झ्यूजेन तयार होतात, त्यांना ‘यारदांग’ असे म्हणतात.

अबू धाबी, बहारीन, ईजिप्त, अरबस्तान, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील उटा राज्य इत्यादी प्रदेशांत  झ्यूजेन आढळतात.

समीक्षक : वसंत चौधरी