एकाच भूप्रदेशात उगम पावलेल्या, पण विरुद्ध दिशांत वाहणार्‍या जलप्रवाहांचे (उदा., नद्यांचे) उगम एकमेकांपासून अलग करणार्‍या उंच भूभागाला जलविभाजक म्हणतात. पर्वतरांग, डोंगराचा कणा, कटक (टेकड्यांची रांग) ही जलविभाजकाची उदाहरणे आहेत. सह्याद्री, सातपुडा, विंध्य, अरवली, हिमालय, अँडीज, रॉकी इत्यादी पर्वतरांगा जलविभाजक आहेत. मोठ्या खोर्‍यांत अनेक लहान खोरी व दुय्यम जलविभाजक असू शकतात.

अशा विरुद्ध दिशांना वाहणार्‍या नद्यांच्या उगमाकडच्या भागांतील क्षरणकार्याचे (झिजेचे) प्रमाण सारखे असल्यास तेथील जलविभाजक स्थिर स्वरूपाचा असतो. याउलट, नद्यांच्या उगमाकडील क्षरणकार्याचे प्रमाण भिन्न असल्यास जलविभाजकाचे स्थानांतरण होते. म्हणजे जास्त प्रभावी क्षरणकार्याच्या बाजूकडून त्या भागातील कमी प्रभावी क्षरण होत असलेल्या बाजूकडे जलविभाजक सरकत असतो. जलविभाजकाच्या उताराचे स्वरूप, खडकांची संरचना, क्षरणक्रियेचे प्रमाण व नदीप्रणालीचा विस्तार यांच्यावर जलविभाजकाच्या स्थलांतराचे प्रमाण अवलंबून असते. जलविभाजक अगदी सरळ व सारख्या स्थलाकृतींचा नसतो. एकाच प्रदेशातून वाहणार्‍या दोन वेगळ्या उपनद्यांच्या भूभागाला पार्श्वजलविभाजक म्हणतात.

नदी अपहरण हा जलविभाजकाच्या स्थलांतराचा एक परिणाम आहे. खोर्‍यांचा विकास होताना नद्यांच्या उगमाकडील भागांचे शिरःक्षरण होते. एखाद्या प्रदेशातील उपनद्या त्याच प्रदेशातून वाहणार्‍या दुसर्‍या मुख्य नदीच्या उपनद्यांच्या उगमापर्यंत खोदत जातात आणि त्यांचे पाणी आपल्या खोर्‍यात आणतात. ही क्रिया म्हणजेच नदीचे अपहरण, जलापहरण अथवा नदीचौर्य होय. डोंगराळ भागात डोंगराच्या विरुद्ध उतारांवरून वाहणार्‍या नद्यांच्या बाबतीत पुढील प्रकारे जलापहरण घडते. या क्रियेमध्ये त्या नद्यांदरम्याम असलेल्या जलविभाजकाची झीज होऊन त्याचे स्थलांतर होते. त्याला स्थलांतरित जलविभाजक म्हणतात. डोंगराच्या एका बाजूचे पर्जन्यमान अधिक असल्यास किंवा त्या बाजूचा उतार जास्त असल्यास अथवा त्या उताराच्या भागातील खडक दुसर्‍या बाजूकडच्या उतारावरील खडकांच्या मानाने अधिक मऊ असल्यास अशा उतारावरून वाहणार्‍या नद्या विरुद्ध बाजूच्या उतारावरून वाहणार्‍या नद्यांपेक्षा अधिक क्रियाशील म्हणजे अधिक झीज करणार्‍या असतात. परिणामी त्यांच्या शिरःक्षरणामुळे जलविभाजक पुढेपुढे सरकत जातो. कालांतराने शेवटी अधिक क्रियाशील नदीचे उगमस्थान दुसऱ्या बाजूवरून वाहणाऱ्या नदीच्या उगमस्थानाला येऊन मिळते. अशा प्रकारे तेथील जलविभाजकाचा भाग नाहीसा होतो आणि दुसर्‍या बाजूवरील नदीच्या पाण्याचे अपहरण होते.

समीक्षक : वसंत चौधरी