धातू आवेष्टित मध्यम दाबाकरीता अंतर्गेही स्विचगिअरचे कार्य, प्रकार, रचना इत्यादी मूलभूत माहिती भाग – १ विस्तारित केली आहे. या भागात सुरक्षा वैशिष्ट्ये/गरजा, मानके आणि परीक्षण, उभारणी व देखभाल, निष्कर्ष यांचे वर्णन केले आहे.

कार्यार्थ सुरक्षा वैशिष्ट्ये/गरजा (Operational safety features/requirements) : अ)  बसबार, केबल आणि ट्रकच्या कप्प्यातील शिरोभागी वायू दाब निवारण करण्यासाठी झडपा असतात. या कप्प्यात अंतर्गत प्रज्योती प्रदोषामुळे (Internal Arc Fault) ज्वलनशील पदार्थ व गरम वायू तयार होण्याची शक्यता असते. त्यासंबंधी अधिक माहिती पुढे दिली आहे.

ब) दालनात प्रभागाच्या वर तसेच पुढील व मागील बाजूस जादा जागा पाहिजे असते.

क) प्रभागाच्या अंतर्गत दृश्य तपासणीसाठी पुढल्या दरवाजावर आणि मागील बाजूच्या आच्छादनावर जाड काचा बसवलेल्या असतात.

ड) प्रभागाची संरक्षण श्रेणी आयपी-फिफ्टीवन (IP 51) असल्यास धुळीपासून व शिरोभागावर पडणाऱ्या पाण्यापासून बचाव होतो.

ई) ट्रकची प्रभागातील स्थिती व त्यामुळे कोणत्या क्रिया (Operations) शक्य नाहीत असे विपरीत कर्म (Mal- operation) टाळण्यासाठी तार्किक आंतरपाशांचा (Logical Interlocks) उपयोग केला जातो.

फ)  परिकर्मीची सुरक्षा : सुरक्षित, तणावमुक्त व दीर्घायुष्यासाठी मार्गदर्शक कृती सूचनांचे (OIM) पालन करावे लागते.

ग) ट्रक सेवा स्थितीतून चाचणीसाठी मागे घेतला जातो, तेव्हा सरक झाकणे बंद झालेली आहेत हे पडताळून पहावे लागते.

ह) बहिर्गामी प्रदायीच्या (Downstream) बाजूवर काम करतांना भूमी स्विच बंद (ON/Close) करावा लागताे.

आ. १ : अंतर्गत प्रज्योती दोषातील वायूत प्रवाह बदल.

अंतर्गत प्रज्योती प्रदोष (Internal Arc Fault) : कमी दाबाच्या प्रभागापेक्षा मध्यम दाबातील प्रभागात अंतर्गत प्रज्योती प्रदोषांची ऊर्जा आणि तीव्रता ३० ते ९० टक्क्यांनी अधिक असते. जेव्हा एखाद्या कप्प्यात प्रज्वलन (Flashover) होते, तेव्हा प्रज्योतीने हवा तापते आणि तिचा विस्तार होतो. परिणामी प्रज्योती विझेपर्यंत अंतर्गत दाब वाढतो आणि हा दाब प्रभागाच्या संरचनेवरही (Structure) पडतो. प्रभागाचा दरवाजा, आच्छादन इत्यादी उघडल्यास स्त्रावाचा दाब कमी होण्याचा मार्ग मोकळा होतो. पण त्यामुळे परिकर्मिला (Operator) धोका पोहचू शकतो. यासाठी बसबार, केबल आणि ट्रक या कप्प्यांच्या शिरोभागी हलक्या झडपा असतात. त्यामुळे त्या कप्प्यातून ज्वलनशील पदार्थ व गरम वायू बाहेर पडतात व परिकर्मिला धोका पोहोचत नाही. (आ. १).

हे सिद्ध करण्यासाठी मानांकित लघु परिपथ प्रवाह आणि त्याचा कालावधी १०० मिलीसेकंद ठेवून व द्रुतगती कॅमेरा वापरून प्रयोगशाळेत चाचण्या घेतल्या जातात. अधिक सुरक्षित राहण्यासाठी काही ग्राहक हा कालावधी वाढवून मागतात. वास्तविकपणे, जलदगतीने काम करणाऱ्या अभिचलित्र (Relay) किंवा दाब स्विच (Pressure Switch) वापरून 100 मिलीसेकंदात मंडल खंडक उघडता येतो. अशा तऱ्हेने प्रज्योत त्या कप्प्यापुरतीच मर्यादित राहते व विझते.

मानके व परीक्षण (Standard & Evaluations) : आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल संस्थेने (International Electrotechnical Committee) IEC 62271-200 हे मानक 2003 पासून उच्च दाबाच्या स्विचगिअर व कंट्रोल गिअरसाठी अंमलात आणले आहे. भारतीय मानक संस्थेने (Beauro of Indian Standard, BIS) हे मानक स्वदेशी उपयोगासाठी अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. BIS/IEC 62271-200 या मानकानुसार सर्व मध्यम दाबाच्या स्विच गिअरचे मानांकन होणे बंधनकारक आहे.

हे मानांकन केंद्रीय विद्युत अनुसंधान (Central Power Research Institute, CPRI) व इलेक्ट्रिकल संशोधन आणि विकसन संस्था (Electrical Research and Development Association, ERDA) यांसारख्या विद्युत प्रयोग व मूल्यमापन केंद्रात केले जाते. यशस्वी मानांकनानंतर तसे प्रशस्ती पत्रक दिले जाते. अशा प्रशस्ती पत्रकाविना स्विचगिअर उपकरणांचा वापर करता येत नाही.

उभारणी (Installation) : १) दालनाची रचना करावयाच्या अगोदर त्या भागातील भूकंप परिस्थिती, समुद्रसपाटीपासून उंची, प्रदूषण पातळी, तापमान इत्यादीचा अभ्यास केला जातो आणि त्याप्रमाणे स्विचगिअर व उपकरणे विनिर्दिष्ट (Specify) केली जातात. २) कृती सूचनांच्या पुस्तिकेत (Operating Instruction Manual, OIM) दाखवल्याप्रमाणे, मांडणी दालनात प्रत्येक प्रभागावर तसेच पुढील व मागील बाजूस जादा जागा पाहिजे असते. तसे प्रभाग पुरवठादाराकडून अभियांत्रिकी चित्रलेखनात सूचित केले जाते.

स्विचगिअरचे दोन प्रभाग एकत्रितपणे वाहतूक करून ते इच्छित स्थळी पाठवले जातात व उभारण्याच्या जागी ते इतर प्रभागाबरोबर जोडण्यात येतात.

स्विचगिअर दालनाची प्रभागाचा भार सहन करण्याची क्षमता, मध्यम व कमी दाबाच्या केबलचे मार्ग, भू-संपर्कन (Earthing), विद्युत प्रकाश, पाणी व्यवस्था, सिमेंट तलाधर (Foundation Plan) इत्यादी योजनेप्रमाणे बनवलेले आहे. याची खात्री करावी लागते. चौथऱ्याचा पृष्ठभाग समतल असावा लागतो.

लाकडी खोक्यातून बाहेर काढल्यावर फोर्क लिफ्ट वापरून इच्छित स्थळी प्रभाग आणावेत. दरवाजे व आच्छादने उघडून सर्व भाग शाबूत आहेत याची खात्री करावी. ट्रक बाहेर काढून आंतर प्रभागातील बसबारची आणि मध्यम व कमी दाबाच्या केबलची जोडणी करावी. अवकाश तापक (Space Heater) चालू आहे हे पहावे. मंडल खंडकाची तपासणी करावी. प्रत्येक प्रभागातील अनावश्यक छिद्रे व फटी बंद कराव्यात. प्रभागाच्या टपावर कधीही चढू नये. नंतर प्रभागांची परीक्षा करून ते प्रभारीत (charge) करावेत. अशा सर्व कामासाठी पुरवठादाराने पाठविलेल्या कृती सूचनांचे पालन करावे.

देखभाल (Maintenance) : दालनात उभारणी केल्यामुळे स्विचगिअरची फारशी देखभाल करावी लागत नाही. प्रभागातील मंडल खंडकाच्या चालक यंत्रणेची निदान वार्षिक देखभाल जरूर करावी व त्यात निर्मात्याच्या सुचनेनुसार वंगण घालावे. तसेच निरोधकावरील धूळ साफ करावी. बसबार, केबल आणि ट्रक कप्प्यातील झडपा व सरक झाकणे सुस्थितीत आहे याची खात्री करावी. वरील सर्व कामासाठी पुरवठादाराने पाठविलेल्या कृती सूचनांचे पालन करावे.

निष्कर्ष : मध्यम दाबावर अनेक विद्युत भार चालू असतात. त्यांचे मध्यवर्ती केंद्रातून नियंत्रण करणे जरुरीचे असते. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिकर्मिंची सुरक्षा आणि कारखान्यातील निष्क्रिय वेळ कमी ठेवण्याची दुहेरी जबाबदारी देखभाल अधिकाऱ्यांची असते. त्यासाठी ट्रकवर बसवलेल्या मध्यमदाबाच्या स्विचगिअरची आवश्यकता असते. त्याची वेळोवेळी उत्तम देखभाल करून त्यापासून जास्तीत जास्त सेवा करून घेता येते.

संदर्भ :

  • Muelle, A. B., Switching transient levels relevant to medium voltage switchgear and associated instrumentation, International Conference and Exhibition on Electromagnetic Compatibility,  EMC York 1999.